संवादी कुटुंब हवे 

ऋता बावडेकर
गुरुवार, 17 मे 2018

संपादकीय
 

वेगवेगळ्या दिनांचे प्रस्थ आपल्याकडे चांगलेच वाढू लागले आहे. मदर्स डे, फादर्स डे, स्माइल डे वगैरे वगैरे.. फेसबुक वगैरेसारख्या समाजमाध्यमांमुळे तर हे डेज आता आपल्याकडेही रुजू लागले आहेत; किंबहुना बरेच दिवस रुजले आहेत. या दिवसांपैकीच ‘कुटुंब दिवस’ हा दिवस नुकताच म्हणजे १५ मे रोजी साजरा करण्यात आला. हे सगळे दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर साजरे केले जातात. 

अनेकजण असे दिवस साजरे करण्याला ‘फॅड’ म्हणतात. तरी सगळेच नाही, तरी अनेकांचा कल असे बहुतेक दिवस साजरे करण्याकडे असतो. पण हे साजरे करणे म्हणजे नेमके काय? हे बघायला हवे. खूप जणांना तर समाजमाध्यमावर त्याबद्दल टिपण्णी करण्याइतपतच रस असतो. खोलात तर कोणी जातच नाही. या दिवसांचे महत्त्व इतके वरवरचे राहिले आहे. तरीही ‘नेमेचि येतो..’ या धर्तीवर हे दिवस साजरे केले जातात. मात्र, असे काही दिवस आले, की वाटते त्या व्यक्तीचे, त्या कारणाचे महत्त्व या एका दिवसापुरतेच आहे का? उदा. १५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन असतो, म्हणून फक्त त्याच दिवशी कुटुंबाची आठवण ठेवायची का? इतर दिवशी काय? अर्थातच उत्तर नकारार्थी आहे. 

असे असले, तरी कुटुंब, नातेसंबंध या गोष्टींवर विचार करण्याची वेळ आली आहे हे नक्की. आपल्याकडील समाजरचनेत ‘कुटुंब’ या घटकाला फार पूर्वीपासून खूप महत्त्व आहे. पूर्वी तर एकत्र कुटुंब पद्धती होती. चुलत-निलत अशी बहुतेक सगळी मंडळी एकत्र राहायची. कुटुंबप्रमुखाचे म्हणणे सगळे ऐकायचे. तेव्हाही मतभेद होत असतीलच, पण ते क्वचित व्यक्त होत असत. झाले तरी घरची मोठी माणसे त्यावर तोडगा काढत. घर पुन्हा नांदते होई. अर्थात हे सगळे आदर्श म्हणावे असे अजिबात नाही. पण तरी माणसांना ‘घरा’चा आधार होता. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्टीने तो या ‘घरा’वर अवलंबून असे आणि त्याला हा आधार तिथे मिळेही. पण पुढे औद्योगीकरणामुळे स्थिती बदलत गेली. सामाजिक स्थिती बदलली. शिक्षणाचे प्रमाण वाढले. काही घरांतील मुलीही शिक्षण घेऊ लागल्या. उत्पन्नाचे साधन पुरेनासे झाले. या बदलत्या परिस्थितीत घरातील स्त्रीने माजघराचा उंबरा ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल ठेवले. घरासाठी ती कमवू लागली. आतातर पुरुषांच्या बरोबरीने; अनेक ठिकाणी पुरुषांपेक्षाही अधिक ती कमवू लागली. मात्र आता प्रश्‍न केवळ आर्थिक कमाईचा नव्हता, तर तिने समाजातही आपले स्थान निर्माण केले. या सगळ्या स्थित्यंतरात कुटुंबव्यवस्था कशी तीच जुनी राहील? तीही बदलली. एकत्र कुटुंबे आकाराने हळूहळू लहान होऊन आई, वडील, एक किंवा दोन मुले एवढ्यावर मर्यादित झाली. विभक्त कुटुंबात दोन्ही पालक अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागले. समाजातील बदलाला साजेसाच हाही बदल होता. पण त्यामुळे कुटुंबाचे वेगळे प्रश्‍न उभे राहिले. या प्रश्‍नांचा कोणी विचारही केला नव्हता. तो म्हणजे, आईवडील बाहेर गेल्यावर मुलांचा सांभाळ कोण करेल? पूर्वी असा प्रश्‍न कधीच उपस्थित राहिलेला नव्हता. कारण मुख्य म्हणजे, त्या मुलांची आईच घरात असे. सोबतीला आजी-आजोबा, इतर बक्कळ नातेवाईक मुलांकडे बघायला असत. हे ‘बघणे’ म्हणजे मुलांवर ‘संस्कार’ करण्यापर्यंत सर्व काही असे. बदलत्या काळात या संदर्भात फार मोठा प्रश्‍न निर्माण केला. संस्कार ही फार मोठी संकल्पना झाली; पण मुलांचे ‘संगोपन’ हाच मूलभूत प्रश्‍न उभा राहिला. बदलता समाज, वाढती महागाई, उत्पन्नाचे कमी होणारे स्रोत अशा सगळ्या घटकांमुळे पालकही एक मुलावर थांबू लागले. कुटुंब आणखी लहान झाले. या मुळे मुलांच्या एकलकोंडेपणाचा प्रश्‍न निर्माण झाला... 

प्रश्‍नांची अशी साखळीच निर्माण झाली. अर्थात, एकत्र कुटुंबपद्धती असतानाही प्रश्‍न होतेच. पण त्याचे स्वरूप वेगळे होते. मुख्य म्हणजे, हे प्रश्‍न आहेत याची जाणीव खूप कमी लोकांना होती.. आणि असली तरी हे प्रश्‍न सोडवायला आसपास माणसे होती. आज माणसांची कमतरता जाणवते आहे. अनेक ठिकाणी तर बोलायलाही माणसे नसतात. 

कुटुंब पद्धतीचे हे असे फायदे-तोटे आहेत. तरीही कुटुंबाशिवाय माणूस तसा एकटाच असतो. कारण माणूस हा प्राणी समाजप्रिय आहे. कोणाला कितीही एकटे राहावेसे वाटले तरी वेळेला कुटुंबातील सदस्य बरोबर असावेत असे वाटते. केवळ दुःखातच नाही, तर सुखात माणसांची गरज अधिक भासते. त्यामुळे ज्याचे कुटुंब चांगले, तो भाग्यवान! ज्याला हे सुख नाही, तो समविचारी माणसे एकत्र करतो आणि आपला मार्ग आखतो. 

आज समाजात कधी नव्हे इतकी अस्थिरता जाणवते आहे. परिस्थितीत सतत बदल होताना दिसत आहेत. अशावेळी कुटुंबाची आठवण होणे, त्याची उणीव भासणे स्वाभाविक आहे... आणि कुटुंब म्हणजे तरी काय? आपण माणसेच ना! आपण माणसे मिळूनच कुटुंब तयार होते. या सगळ्यांत एकवाक्‍यता असेल तर, मेळ असेल, संवाद असेल तर तिथे आनंद नांदायला वेळ लागत नाही. पण आपण सगळे माणसेच आहोत. सतत इतकी चांगली वागू शकत नाही. ते स्वाभाविकही नाही. भांड्याला भांडे लागणारच. अशावेळी समजूतदारपणाची अपेक्षा असते. भांडण, वाद जितके स्वाभाविक, तितकाच हा समजूतदारपणा सहज असायला हवा. कोणीतरी पुढाकार घेऊन सगळ्यांस सामंजस्य निर्माण करायला हवे. मुख्य म्हणजे कुटुंबात संवाद हवा. तोच अलीकडे कमी होताना दिसतो आहे. वाढत्या आत्महत्या, व्यक्तींमध्ये - अगदी लहान मुलांमध्येही आढळणारे नैराश्‍याचे प्रमाण, अत्याचार अशा सगळ्या गोष्टींचे मूळ हे ‘संवादाचा अभाव’ यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने मोकळे राहिले पाहिजे. मन मोकळे केले पाहिजे. मनातील गोष्टींचा निचरा केला नाही, तर त्याचे शरीरावर परिणाम होतात. कुटुंब म्हणजे केवळ चार भिंती, एक छप्पर नव्हे, तर आत राहणारी माणसे आहेत. ती जोपर्यंत परस्परांशी संवाद साधताहेत तोपर्यंत कुटुंबपद्धतीला धोका नाही.

संबंधित बातम्या