कुत्र्याचा चावा आणि आपण 

ऋता बावडेकर
गुरुवार, 24 मे 2018

संपादकीय
 

माणसांना प्राण्यांविषयी प्रेम असते, हे खरे आहे. त्यातूनच कुत्रा, मांजर, पोपट वगैरेसारखे प्राणी-पक्षी माणूस पाळत असतो. हे योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा, पण आपले प्राण्यांवरचे प्रेम माणूस असे व्यक्त करत असतो. मात्र असे करताना काही काळजी घ्यायला तो विसरतो. उदाहरणार्थ. या प्राण्यांना लसी देणे, त्यांना सवय असलेले वातावरण निर्माण करणे वगैरे... तसे न केल्यास त्या प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. 

पुण्यात नुकतीच श्‍वानदंशाची एक घटना घडली. अर्थातच ही काही पहिली किंवा एकमेव घटना नव्हे, पण त्यातून श्‍वानदंशाचे भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले सकाळी चालण्यासाठी म्हणून बाहेर पडल्या आणि काही अंतरावरच त्यांच्यावर तीन मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. एकाने त्यांच्या डाव्या हाताचा पंजा फाडला, दुसऱ्याने उजव्या हाताची करंगळी चावली आणि तिसऱ्याने त्यांच्या दोन्ही मांड्यांवर, पायांवर असंख्य चावे घेतले. या संदर्भात त्यांनी वर्तमानपत्रांकडे हा अनुभव लिहून पाठवला आहे. त्या लिहितात, ‘इतर महिलांच्या तुलनेत माझे वजन, उंची अधिक असल्याने मी या हल्ल्यात खाली पडले नाही. तसे झाले असते तर या कुत्र्यांनी माझा चेहरा, डोळे यांनाही इजा केली असती. माझ्या जागी एखादे लहान मूल, लहान चणीची बाई असती तर या हल्ल्यात मेलीच असती.’ मंगलाताईंच्या एका परिचिताने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्या म्हणतात, ‘या रुग्णालयात सुमारे चार तास माझ्यावर उपचार झाले. सर्व डॉक्‍टरांनी उत्तम साह्य केले. पण सुमारे चाळीस हजार रुपये खर्च आणि पुढील आठवडाभराच्या वेदना ही किंमत मोजावी लागली.’ त्यांनी त्यानंतर त्यांच्या भागाच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांना सर्व प्रकार कळवला. तासाभरात त्या स्वतः, पालिकेचे दोन वैद्यकीय अधिकारी व एका सहायिकेला घेऊन मंगलाताईंच्या घरी आल्या. त्या सर्वांनी त्यांना सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्‍वासन दिले, तरीही ‘सुरक्षिततेचा प्रश्‍न उरतोच’ हे मंगलाताईंचे म्हणणे पूर्णपणे खरे आहे. त्या पुढे म्हणतात, ‘या समस्येसंदर्भात बोलताना पालिकेचे अधिकारी म्हणाले, की ‘प्राणिमित्र’ म्हणवणारे लोक आमच्या कामात अडथळा आणतात. थेट दिल्लीत तक्रारी करून आमच्या नोकऱ्या धोक्‍यात आणतात.’ हेही फार गंभीर आहे. याबरोबरच मंगलाताईंनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे श्‍वानदंशानंतर देण्यात येणाऱ्या इंजेक्‍शन्सचा. त्या म्हणतात, ‘जवळच्या अनेक मोठ्या रुग्णालयांच्या औषधविक्री विभागात ती ठेवत नाहीत. कुत्रा चावल्यावर तातडीने देण्याची इंजेक्‍शन्स मिळणार नसतील, कुठून कुठून दोन-चार अशी गोळा करावी लागणार असतील तर काय अर्थ आहे? या खोळंब्याने एखाद्याला प्राणास मुकावे लागायचे! पालिकेने याची गंभीर दखल घ्यावी. कुत्री आवरता येत नसतील तर श्‍वानदंशविरोधी लस तरी सर्वत्र, मुबलक उपलब्ध करावी. नाहीतर सर्व नागरिकांना सर्व नागरी करांतून मुक्त करावे.’ 

मंगलाताईंचा हा अनुभव वर्तमानपत्रात (सकाळ) प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. कोणत्याही विषयाला किमान दोन बाजू असतात. यातील दुसरी बाजू म्हणजे, पालिकेची - त्यांच्या संबंधित विभागाची भूमिका. यासंदर्भात श्‍वानदंशानंतर देण्यात येणाऱ्या इंजेक्‍शनची कमतरता पडणार नाही, असे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठीही प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कुत्र्यांचे वाढणारे प्रमाण आटोक्‍यात राहू शकेल. मात्र या शस्त्रक्रियाही किती खोट्या असतात हे पालिकेच्याच सर्वसाधारण सभेत स्पष्ट करण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्याची कानावर खूण असलेल्या कुत्रीनेच पिलांना जन्म दिल्याचे एका नगरसेविकेने सांगितले. त्यामुळे यासंदर्भात किती प्रामाणिकपणे काम होत असेल हे दिसले. सध्या खाण्याच्या हातगाड्या वाढल्या आहेत. त्यातही चायनीज गाड्यांभोवती कुत्री अधिक असल्याचे एका नगरसेविकेने निदर्शनास आणून दिले. मांसाहार केल्यानंतर कुत्री हिंसक होतात, असा एक समज आहे. 

या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाने दिलेला आदेश. कुत्री मारण्याला मनाई आहे, त्याऐवजी त्यांची नसबंदी करून त्यांचे प्रमाण आटोक्‍यात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र या कामातही ‘प्राणिमित्र’ म्हणवणाऱ्यांचा अडथळा येतो, असे संबंधित काम करणाऱ्यांचे म्हणणे - अनुभव आहे. हे तथाकथित प्राणिमित्र कुत्री उचलण्यास मनाई करतात. गळ्यात पट्टा असेल ते कुत्रे पाळीव समजले जाते. त्यामुळे अनेक मोकाट कुत्र्यांच्याही गळ्यात पट्टे अडकवले जातात. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची अडचण होते. तसेच या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या तक्रारी थेट दिल्लीत करण्यात येतात. तेथून फोन आला की पहिल्यांदा काम बंद पडते आणि पुढे कदाचित त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवरच गदा येऊ शकते, असा या कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. 

याबाबतीत ‘प्राणिमित्रां’ची फारशी प्रतिक्रिया आलेली नाही. जे खरे प्राणीमित्र आहेत, त्यांची भूमिका नेहमीच सामंजस्याची आणि सहकार्याची असते. पण यातही अनेक जण असे दिसतात ज्यांना केवळ काम अडवण्यात रस आहे. हे योग्य नाही. कारण प्राण्याला वाचवताना एखाद्या माणसाच्या जिवावर बेतू शकते हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हौस म्हणून कशाचाही विचार न करता वेगवेगळ्या जातीची कुत्री पाळली जातात. पण काही दिवसांनी त्यांना सांभाळणे अवघड होऊन बसते. मग ही कुत्री रस्त्यावर, टेकडीवर वगैरे सोडून दिली जातात. त्यांचा त्रास वेगळाच! 

ही सार्वत्रिक समस्या आहे. तिच्यावरचे उत्तरही सर्वांनी मिळूनच शोधायचे आहे. प्राणिमित्रांनी विरोध करायचा, प्रशासनाने पळवाटा शोधायच्या आणि त्रास मात्र सामान्य माणसाने सहन करायचा, हे योग्य नाही. शत्रू असल्याप्रमाणे परस्परांची उणी दुणी काढण्यापेक्षा एक दिशा ठरवून काम केल्यास मार्ग नक्कीच मिळेल, तो मार्ग शोधायला हवा.

संबंधित बातम्या