कोणता अभ्यासक्रम निवडावा? 

ऋता बावडेकर
बुधवार, 30 मे 2018

संपादकीय
 

पालक, विद्यार्थी, शिक्षक अशा संबंधित सगळ्यांचा ‘करिअर’ हा शब्द जिव्हाळ्याचा असतो. प्रत्येकाने त्याचा लावलेला अर्थ, त्याचे महत्त्व हे सापेक्ष असते. पण हा जिव्हाळ्याचा विषय आहे, हे नक्की. शिक्षणासंदर्भात आयुष्यात तुम्ही कोण होणार, हे हा शब्द ठरवत असतो. 

दहावी - बारावी हे या बाबतीतले आपल्याकडचे महत्त्वाचे टप्पे. पण त्या आधीच, म्हणजे आठवीतच करिअर, शिक्षण, अभ्यासक्रम याबाबतीत घराघरांत चर्चा सुरू झालेली असते. पण त्यामध्ये खूप वेळा मुलांच्या (यात मुलीही आहेत) आवडीनिवडीपेक्षा पालकांच्या इच्छा-आकांक्षांचाच अंतर्भाव अधिक असतो. पालकांची एखादी इच्छा अपूर्ण राहिली किंवा त्यांच्या मते त्यावेळी एखादा अभ्यासक्रम खूप यशस्वी (हे यश आर्थिकदृष्ट्याच बघितलेले असते) असतो; अशावेळी ते आपल्या मुलांना तोच अभ्यासक्रम निवडण्याचा आग्रह धरत असतात. यातूनच मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर... असे त्या त्या वेळी पेव फुटते. मग क्षमता असो-नसो, आवड असो-नसो सगळी झुंबड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उडते. मग पाठोपाठ त्याचे कोचिंग क्‍लास सुरू होतात. चकचकीत जाहिराती येऊ लागतात. आर्थिक भरभराट देणाऱ्या या अभ्यासक्रमांच्या नावांनीच पालकांचे डोळे दिपलेले असतात. ते आपल्या पाल्यांच्या मागे लागून त्यांची मानसिकता तशी करू लागतात. पण अखेर प्रश्‍न त्या अभ्यासक्रमात यश मिळविण्याचा येतो तेव्हा, सगळे उघडे पडू लागते. त्या अभ्यासक्रमातील इतरांचे यश बघून, मित्रमैत्रिणी ठरवतात म्हणून किंवा पालकांच्या अतिआग्रहामुळे ठराविक अभ्यासक्रम निवडणाऱ्या अनेकांचा तिकडे प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसांतच भ्रमनिरास होतो. अनेकांना तर प्रवेशही मिळू शकत नाही. मग पालकांचे बोलणे ऐकावे लागते. यातून एखाद्याला न्यूनगंडही येऊ शकतो. त्यातून नैराश्‍य येऊ शकते. पण अभ्यासक्रम निवडताना आर्थिक यशापलीकडे पाहायला फार कमी लोक तयार असतात. 

काही वर्षांपूर्वी मेडिकल आणि इंजिनिअरिंग या पलीकडे काही अभ्यासक्रम आहेत, हेच अनेकांना माहिती नव्हते. आजही फार वेगळी परिस्थिती आहे असे नाही, तरी थोडी तरी फरक पडला आहे. 

वास्तविक, अभ्यासक्रम कोणते आणि किती आहेत याची माहिती घेण्यापेक्षा प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचा कल ओळखायला हवा. त्याला किंवा तिला काय आवडते, त्यांना कोणत्या विषयात गती आहे.. या गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात. शिक्षकांनी या कामात त्यांना मदत करायला हवी. असे केले तर खूप प्रश्‍न मार्गी लागू शकतील. आपला मित्र किंवा मैत्रीण एखादा अभ्यासक्रम निवडते म्हणून तो निवडण्यापेक्षा पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजे. आज माहितीचे इतके स्रोत उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर, टॅब, मोबाईलमुळे माहिती तुमच्या अगदी हातात - बोटात आली आहे. अशा वेळी त्याचा उपयोग करायचा नाही तर कशाचा? मार्गदर्शन करायला तज्ज्ञही असतात. याशिवाय कलचाचणीद्वारे आपल्या मुलांचा कलही ओळखता येऊ शकतो. आपल्या पाल्याच्या आयुष्याचे नुकसान होऊ नये यासाठी पालकांनी इतके सजग तर व्हायलाच हवे. एवढेच नव्हे तर स्वतः विविध अभ्यासक्रमांची माहिती काढून ती मुलांसमोर मांडायला हवी. 

पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांचे हे काम आम्ही दरवर्षी थोडे सोपे करत असतो. हे वर्ष तरी त्याला अपवाद कसे असेल? ‘सकाळ साप्ताहिक’च्या ‘करिअर विशेष’ या अंकात आपल्याला अशी विविधांगी माहिती वाचायला मिळणार आहे. कोणत्याही अभ्यासक्रमाच्या मागे धावण्यापेक्षा आपली आवड बघून अभ्यासक्रम निवडावा. तसे न केल्यास काय होऊ शकते, याची माहिती डॉ. श्रीराम गीत यांच्या लेखात आहे. तसेच त्यांनी पालकांनाही मार्गदर्शन केले आहे. स्पर्धा परीक्षा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि युनिक ॲकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी हा विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे फार मोलाचे मार्गदर्शन असेल. या शिवाय विविध विषयांत कोणकोणत्या संधी आहेत तेही या अंकात देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, कृषी म्हटले की शेती एवढेच अनेकांना समजते. पण या क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत हे डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सविस्तर सांगितले आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय (डॉ. अविनाश भोंडवे), पोलिस क्षेत्र (पांडुरंग सरोदे), ग्राफिक्‍स डिझाईन (संतोष रासकर) या विषयांतील संधीही दिल्या आहेत. वेळ, कौशल्य आणि कष्ट करण्याची तयारी या बळावर छोट्या व्यवसायापासून सुरवात करणाऱ्या धनश्री बेडेकर या तरुण उद्योजिकेची यशोगाथाही या अंकात आहे. तसेच दत्तात्रय अांबुलकर यांनी रोजगाराच्या संधींचा मागोवा घेतला आहे. 

याशिवाय विज्ञान, कला, वाणिज्य या क्षेत्रातील करिअरच्या अक्षरशः असंख्य संधींची सविस्तर माहिती, या क्षेत्रातील तज्ज्ञ सुरेश वांदिले यांनी दिली आहे. ही सगळी माहिती वाचून कोणता अभ्यासक्रम निवडावा हा प्रश्‍न खूप सोपा होईल. हा अंक तुमच्या निवड प्रक्रियेचा भाग होईल. दरवर्षीप्रमाणे ‘सकाळ साप्ताहिका’चा हा अंक संग्रही ठेवावा असाच आहे.

संबंधित बातम्या