हसऱ्या-नांदत्या घरासाठी... 

ऋता बावडेकर
गुरुवार, 7 जून 2018

संपादकीय
 

आजीआजोबा हा मागची पिढी आणि आताची पिढी यातील दुवा असतो. कुटुंबव्यवस्थेतील हा महत्त्वाचा घटक असतो. जगण्याच्या रेट्यातून निर्माण झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीत हा दुवा कुठेतरी मागे फेकला गेला आहे. दुर्लक्षित राहिला आहे. मात्र, वेळ आली की आजही त्यांची प्रकर्षाने आठवण होते.. कधी प्रेमाने, तर कधी गरज म्हणून! 

काही दिवसांपूर्वी कौटुंबिक न्यायालयात एक प्रकरण दाखल झाले. आजीआजोबांनी नातवंडांना सांभाळावे अशी याचिका एका महिलेने दाखल केली होती. मात्र, ‘आजीआजोबा राजीखुशीनं नातवंडांना सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी, पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे अशी बळजबरी त्यांच्यावर करता येणार नाही,’ असा निकाल कौटुंबिक न्यायालयाने दिला. या प्रकरणातील संबंधित महिला घटस्फोटित असून मुलांना आपल्या सासूसासऱ्यांनी सांभाळावे अशी तिची अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने आजीआजोबांच्या बाजूने निकाल दिला. 

आज हा प्रश्‍न खूपच गंभीर होत चालला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत मी, माझा नवरा (किंवा बायको) आणि मुले एवढेच असतात. तिथे आजीआजोबांना क्वचितच स्थान असते. अशा परिस्थितीत आजी-आजोबा स्वतंत्र राहू लागले. पण वाढते वय, त्यातून येणाऱ्या व्याधी, इतर समस्या यांमुळे क्वचितच ते मुलाच्या (किंवा मुलीच्या) संसारात समाविष्ट होऊ लागले. एरवी त्यांच्यासाठी समाजात वृद्धाश्रमे तयार होऊ लागली - झाली.. आणि विभक्त कुटुंबातील मुलांसाठी पाळणाघरे! वास्तविक, आजीआजोबा आणि नातवंडे हे नाते खूपच वेगळे आहे. दोघांचेही एक प्रकारचे ते बालपणच! परस्परांच्या सहवासातून त्यांना आनंदाने काळ घालवता येतो, पण ही कल्पना अनेकांना पटत नाही आणि हे दोन्ही घटक एकेकटे मार्गक्रमणा करत राहतात. मात्र प्रत्येकाला पाळणाघर परवडते किंवा पटतेच असे नाही, अशावेळी अनेकांना आपल्या आईवडिलांची किंवा सासूसासऱ्यांची आठवण येते. न्यायालयाने या ‘जुलमाच्या रामराम’लाच नकार दिला आहे. ते योग्यही आहे. 

असे असले तरी ही समस्या फार गंभीर आहे. बदलत्या परिस्थितीनुसार अनेक समीकरणे आज बदललेली दिसतात. नोकरी-धंद्यासाठी मुले घराबाहेर पडतात. त्यातील काही परदेशी उडतात. मागे राहतात त्यांचे आईवडील! उमेद असते तोपर्यंत तेही व्यवस्थित राहात असतात. पण वय बोलू लागल्यावर त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज वाटू लागते. अगदी आधार म्हटले नाही तरी सहवासाची गरज जाणवू लागते.. आणि नेमके मनाच्या त्या अवस्थेत त्यांची मुले दूर कुठेतरी असतात. नियमाला अपवाद असतात; पण अनेकदा ही मुले त्यांना गरज असेल तेव्हा आपल्या आईवडिलांना आपल्याकडे बोलावून घेतात. उदा. बायकोचे किंवा मुलीचे बाळंतपण असेल तेव्हा आईवडील किंवा सासूसासऱ्यांना परदेशात आपल्या घरी बोलावले जाते. दीड-दीड महिना राहून त्यांना परत पाठवले जाते. प्रत्येकाला इतका रुक्ष अनुभव येत नसेल कदाचित, पण थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती असते. अशावेळी प्रेम कुठे असते, असतो तर केवळ व्यवहार, असे जर आईवडील म्हटले तर त्यांना चूक कसे म्हणता येईल? अर्थात प्रत्येकजण असा वागतो असे नाही, पण बहुतेकांना येणारे हे अनुभव आहेत. 

मात्र, या समस्येला अनेक कंगोरे आहेत. आजीआजोबांची जशी बाजू आहे, तशीच मुलांची (मुलगीही), सुनेचीही बाजू आहे. एकत्र राहिले की भांड्याला भांडे लागणारच; त्यातच आपल्याकडे सासू-सुनेच्या नात्याला खूप बदनाम करून ठेवले आहे. त्यातही सासूला नेहमीच काळे रंगवण्यात आले आहे. एकत्र राहताना अर्थातच संसार एकच असतो. सासूला वाटते हा माझा संसार आहे, सुनेला वाटते आता हा माझा संसार आहे, ह्यांनी बाजूला व्हावे. त्यातून समजून न घेता वाद वाढत जातात आणि बघता बघता टोक गाठतात. सून नोकरी करणार असेल तर मग बघायलाच नको. तिने घरातील सगळे करून जावे अशी सासूबाईंची अपेक्षा असते. तर सासूबाईंनी थोडातरी हातभार लावावा अशी सुनेची अपेक्षा असते. त्यात घरात कुळाचार असतील तर बघायलाच नको. हे सासू-सुनेचे झाले.. अनेकदा मुलाचेच आपल्या आईवडिलांबरोबर - विशेषतः वडिलांबरोबर पटत नसते.  अशावेळी सगळी जबाबदारी घरातील बाईवरच येऊन पडते. आजीआजोबांनी मुलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली, तर मोठी जबाबदारी आजीचीच असते. मुलाचे खाणेपिणे, त्याची अंघोळ, शी-शू, कपडे बदलणे, भरवणे, खाणे करणे, पाणी उकळून घेणे, कपडे धुणे, गोष्टी सांगणे, त्याला झोपवणे.. अशा सगळ्या जबाबदाऱ्या आजीबाईंवरच प्रामुख्याने पडत असतात. क्वचित आजोबाही मदत करतात. एरवी बाळाला फिरायला नेणे, त्याच्याबरोबर खेळणे, गोष्टी सांगणे एवढ्यापुरतीच ही मदत मर्यादित असते. तसेच आजीआजोबांनी मुलांची जबाबदारी घेण्यास नकार दिला तर हीच सगळी जबाबदारी त्या मुलाच्या आईवर येते. त्यात ती नोकरी करणारी असेल, तर ‘नोकरी, की मुलांचे संगोपन?’ असा प्रश्‍न तिच्यापुढे उभा राहतो. परत अपवादाने मुलाचे बाबाही जबाबदारी घेतात, पण बरेचदा ती वरवरचीच असते. आता चित्र बदलू लागले आहे. बाबालोकही मुलांचे चांगले पालनपोषण करू लागले आहेत. 

मात्र, अशा प्रसंगांत कोणाचे चूक, कोणाचे बरोबर असा तराजू घेऊन आपण बसू शकत नाही. कारण प्रत्येकाचेच थोडे थोडे बरोबर थोडे थोडे चुकत असते. आजीआजोबांचे वय झाल्यामुळे त्यांना बाळाचे इतके करणे झेपतेच असे नाही. तर आईवडिलांना कामधंदा करून बाळाचे करायला होतेच असे नाही.. अशावेळी मध्यममार्ग काढायला हवा. बळजबरी करण्यापेक्षा सुसंवादाने मार्ग काढायला हवा. परस्परांशी बोलले की सगळ्यांनाच एकमेकांच्या भूमिका समजतात. त्यातून मार्ग निघतो.. मुख्य म्हणजे सगळ्यांना नांदते ‘घर’ मिळते...

संबंधित बातम्या