हत्या करून साधले काय? 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 15 जून 2018

संपादकीय
 

काय केले, काय झाले म्हणजे माणसे सुधारतील? हा प्रश्‍न खूप पूर्वीपासून प्रत्येक पिढीला पडत आला आहे. आता तर हा प्रश्‍न रोजच पडू लागला आहे. माणसे एकमेकांच्या जिवावर का उठताहेत? कुठून येतो हा खुनशीपणा? कशासाठी? आणि असे माणसे मारण्यातून नेमके मिळते तरी काय? प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न... त्याची उत्तरे कधीतरी मिळणार आहेत का? एक वेळ उत्तरे मिळाली नाहीत तरी चालेल पण हे प्रकार थांबायला हवेत. माणसाच्या आयुष्याला काही किंमतच उरलेली नाही. 

काही दिवसांपूर्वी एक जोडपे त्यांच्या मित्र आणि त्याच्या बायकोबरोबर महाबळेश्‍वरला फिरायला गेले. या जोडप्याचे एखादा आठवडा आदीच लग्न झाले होते. नवरीला वाटेत त्रास होऊ लागला म्हणून ते एका ठिकाणी थांबले. त्यानंतर परत पुढे निघाले. पसरणी घाटात तिला पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून ते पुन्हा थांबले. तिचा नवरा तिच्यापाठोपाठ गेला. मित्र आणि त्याची बायको घाटात फोटो काढत होते. दरम्यान एका दुचाकीवरून दोघे येऊन त्यांच्या गाडीच्या मागे थांबले. पाठोपाठ आणखी दोघे आले आणि त्यांनी नवऱ्याच्या पाठीत सपासप वार केले. कोणालाच काही कळेना. तो कसाबसा गाडीपर्यंत आला आणि कोसळला. कसेबसे सावरत मित्राने पाचगणी गाठले. मात्र तो तरुण ठार झाला होता. प्रकरण काय आहे काहीच कळेना. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे सत्य बाहेर आले. त्या मुलीला हे लग्न मान्य नव्हते. तिचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते. पण घरच्यांच्या दबावापुढे तिचे काहीच चालले नाही. तिला लग्न करावे लागले. मात्र आपल्या मित्राच्या मदतीने तिने नवऱ्याचा काटा काढला. सध्या ते दोघे आणि त्यांनी ज्यांना सुपारी दिली होती ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दुसऱ्या घटनेत, आपल्या पत्नीला आणि आठ महिन्यांच्या मुलाला घरी आणताना मारेकऱ्यांनी पत्नी आणि मुलाचा खून केल्याची घटना घडली. संबंधित महिला अधिकमासानिमित्त माहेरी आली होती. पण त्या रात्री तिचा पती तिला घरी आणण्यासाठी गेला. त्यांची मुलगी मावशीकडे गेली होती म्हणून हे तिघेच परत निघाले. वाटेत ही घटना घडली. पोलिसांना संशय आल्याने कसून चौकशी केली असता, खरा प्रकार उघड झाला. या तरुणाचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा होता. दरम्यान फेसबुकवर त्याची एका तरुणीबरोबर ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पत्नी-मुलांची अडचण वाटू लागली. म्हणून त्यांनी हा प्लॅन आखला. दोन-अडीच लाखाची सुपारी दिली गेली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड झाला. सध्या हे सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

यापेक्षा वेगळा प्रकार नागपूरमध्ये घडला. आई, मुलगा, सून, दोन लहान मुले अशा संपूर्ण कुटुंबाचीच हत्या झाल्याचे उघड झाले. दोन लहान मुली तेवढ्या वाचल्या. हा काय प्रकार आहे तेच सुरुवातीला कळत नव्हते. नंतर लक्षात आले, की जावयानेच सासू, मेहुणा, त्याची पत्नी, त्यांची मुलगी यांची हत्या केली. या हत्याकांडात जो लहान मुलगा बळी पडला तो या हल्लेखोराचा मुलगा होता. त्यालाही त्याने सोडले नाही. या संदर्भातील हकिगत अशी, की काही वर्षांपूर्वी या व्यक्तीने आपल्या आईची हत्या केली होती. त्यानंतर पत्नीची डोक्‍यात दगड घालून हत्या केली. मात्र यातून तो निर्दोष सुटला. एका कंपनीत नोकरीही करू लागला. त्या दिवशी तो आपल्या सासरी जेवायला गेला होता. त्यानंतरच त्याने हे हत्याकांड केले असावे, असा संशय आहे. 

काही मित्र एका हॉटेलमध्ये एकत्र भेटले. सगळे काही व्यवस्थित सुरू होते.. आणि अचानक गोळीचा आवाज आला. एका तरुणाच्या कपाळावर गोळी लागली होती. त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याची तक्रार संबंधित तरुणाच्या वडिलांनी केली आहे. या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या एका घटनेत, बहिणीचे फोटो गलिच्छपणे वापरले म्हणून भावाने एकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पण पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. हा भाऊ एसटीने जात असताना, संबंधिताने त्याच्यावर कोयत्याने वार करून ठार केले आणि फरारी झाला. 

अशा कितीतरी घटना सांगता येतील. पुणे भागात गेल्या काही दिवसांत या घटना घडल्या आहेत. माणसाचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? मतभेद, मनभेद, भांडण, परस्परांशी न पटणे, वैर.. सगळे समजू शकते; पण म्हणून एखाद्याचा जीव घ्यायचा? हे काही समजू शकत नाही. इतक्‍या थंड डोक्‍याने या सगळ्या हत्या झालेल्या आहेत, की थरकाप उडावा. यात आपल्या पोटच्या पोरांना मारतानाही या 

व्यक्तींचे हात थरथरले नाहीत; इतकी कसली धुंदी, झिंग होती कळत नाही. नातेसंबंध जाऊ दे, पण समोरचा माणूसच आहे, त्याला कसे आणि का मारायचे असा प्रश्‍न एकदाही यांना पडला नसेल? एखाद्याचे आयुष्यच संपवायचे म्हणजे काय? ही कसली झिंग, हा कसला राग? आपले पट नाही, तर सामोपचाराने 

प्रश्‍न सोडवता येतात यावरचा विश्‍वास खरेच उडाला आहे का? संवाद इतका महाग झाला आहे का? की आपल्याला आपलीच भीती 

वाटते - संवाद यशस्वी झाला नाही तर? समोरच्या माणसाने आपल्या मनासारखे वागण्याचे नाकारले तर? तर परत त्यांच्याबरोबरच राहावे लागणार.. 

या सगळ्यात एक प्रश्‍न पडतो, या हत्याकांडांतून साध्य काय झाले किंवा होते? समोरच्याचा हकनाक बळी जातोच; पण बळी घेणाराही वाचत नाही. आता उरलेले सगळे आयुष्य या सगळ्या लोकांना तुरुंगात घालवावे लागणार. मग या हत्याकांडांतून यांनी साध्य काय केले? काही दिवसांपूर्वी एका मुलीचा असाच मनाविरुद्ध विवाह झाला. पण तिने आपल्या पतीला सत्य सांगितले. या पतीने आपल्या पत्नीच्या मित्राशी संपर्क साधून

दोघांचा विवाह करून दिला. तीन आयुष्ये वाचली. असा सकारात्मक विचार का होऊ नये? माहेरच्यांनीही मुलीला इतका टोकाचा विरोध का करावा? सगळेच विचार करण्यासारखे आहे. हा विचारच खूप कमी झाला आहे.. हत्याकांडाचे एक कारण तेच आहे. विचार व्हायला हवा, संवाद वाढायला हवा.

संबंधित बातम्या