नात्याची बूज राखा...

ऋता बावडेकर
गुरुवार, 21 जून 2018

संपादकीय
 

आपल्या समाजात, आपल्या संस्कृतीत नात्यांना अतिशय महत्त्व आहे. केवळ रक्ताचीच नाही, तर मैत्रीची, मानलेली नातीही अगदी जिवापाड जपली जातात. त्याचा कोणी उल्लेख करेलच असे नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असते. पण हल्ली हे महत्त्व कमी होऊ लागले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. 

पाठोपाठ मुलगीच झाली म्हणून नाराज असणारी मंडळी आपल्याला माहिती आहेत. पण सलग चौथी मुलगीच झाली म्हणून तिला थेट अनाथालयात दाखल करणारे आईवडील कोणी कधी बघितले नसतील. पुण्यात ही घटना घडली आहे. मुलाचा हव्यास किती टोकाचा असू शकतो याचे हे उदाहरण म्हणायला हवे. या दांपत्याला प्रथमपासूनच वंशाला दिवा हवा होता. पण पहिली मुलगीच झाली. नंतर मुलगा होईल या आशेने त्यांनी तीन चान्स घेतले, पण तीनही मुलीच झाल्या. त्यामुळे निराश होऊन हे दांपत्य चौथ्या मुलीला घेऊन थेट अनाथालयात पोचले. अशी घटना प्रथमच घडत असल्याने अनाथालयातील मंडळीही गोंधळली. प्रकरण बालकल्याण समितीकडे गेले. त्यांनी या आईवडिलांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यात सर्वांत अनाकलनीय भूमिका आईची होती. ती बोलत नव्हती पण मुलीला घेऊन जाते असेही म्हणत नव्हती. आईने अशा पद्धतीने आपले अपत्य नाकारण्याची ही पहिलीच घटना असावी. ‘आमची परिस्थिती सामान्य आहे. मुलीला वाढवणे शक्‍य होणार नाही,’ अशी या दांपत्याची भूमिका होती. त्यांच्यावर जर दबाव आणला तर मुलीच्या जिवाशीच संबंध आहे, हे त्यांच्या बोलण्यातून नंतर जाणवू लागल्यावर या मुलीला अनाथालयात दाखल करण्यात आले. हे चौथे अपत्य मुलगा असते, तर आईवडिलांना त्याला वाढवायला काही हरकत नव्हती. पण पुत्रप्राप्तीसाठी अंध झालेल्यांना हे कसे कळणार आणि कसे समजावून सांगणार? ‘सकाळ’मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेकजण पुढे आले. मात्र, मुलीच्या पालकांना अजून एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ते आपल्या भूमिकेवरच ठाम राहिले तर मुलीच्या भवितव्याविषयी विचार केला जाणार आहे. 

गरीब असो श्रीमंत असो आपल्या समाजात ‘मुलगा’ फार महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामुळे वंशाचा दिवा मिळतो, आपला वंश तो पुढे नेतो, मुलगा हा म्हातारपणाची काठी असतो, अंतिम संस्कार मुलाने केले तर मोक्ष मिळतो.. वगैरे भाबडे विचार त्यामागे असतात. वास्तवात मात्र वेगळेच चित्र दिसते. मुलगे खरोखरच ही सगळी कर्तव्ये पार पाडतात? अपवाद आहेतच, पण बहुतांश वेळा चित्र वेगळेच दिसते. मुलगा उनाडक्‍या करत हिंडत असतो. आई-बहीण-वडील काम करून पैसे कमवतात आणि हा ‘वंशाचा दिवा’ कसलाही विचार न करता ते पैसे उडवत असतो. अर्थात यालाही जबाबदार आईवडिलांचे लाडच असतात. ‘मुलगा’ ‘मुलगा’ करत त्याला डोक्‍यावर बसवायचे, मुलींचे हक्क नाकारून त्याची कौतुकं करायची; तो शेफारेल नाही तर काय? काही दिवसांपूर्वीच याबाबतीत टोकाचे उदाहरण घडले. आईवडील वाटण्या करत नाहीत म्हणून एका मुलाने नारळाच्या पाण्यात विष घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यात आई बचावली पण वडील मात्र मृत्युमुखी पडले. काही दिवसांपूर्वीच या मुलाचे लग्न झाले होते. हे एक उदाहरण, तर आईवडिलांना सांभाळण्यास नकार देणारी, त्यांचे पैसे हडप करण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास देणारी अशा मुलांची असंख्य उदाहरणे सांगता येतील. तरीही आपला मुलाचा हट्ट संपत नाही. वास्तविक, कष्ट करून, चांगले शिकून, चांगली नोकरी व्यवसाय करून आईवडिलांना सांभाळणाऱ्या मुली असंख्य आहेत. काहीजणी त्यासाठी स्वतःचा संसार थाटायचा विचारही मागे सारतात. तरीही ‘मुलगा व्हावा’ हा हट्ट कमी होताना दिसत नाही. अनेक घरांत एक किंवा दोन्ही मुलीच असतात. अनेक जण ‘या मुलीच आमचे मुलगे आहेत’ असे म्हणतात. पण असे का? त्यांना मुलगी म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे? खरे तर मुलीचे नाते खूप छान असते. मुलगा काळजी घेत नाही असे नाही, पण काळजी घेण्याची मुलीची पद्धतच वेगळी असते. या नाते समजून घ्यायला काय हरकत आहे? 

ही रक्ताची नाती झाली. त्या पलीकडे मैत्रीची, मानलेली, माणुसकीची ही नातीही आहेत. अनेकदा रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती वरचढ ठरताना दिसतात. पण अलीकडे या नात्यांना सुरुंग लागतो आहे की काय असे वाटू लागले आहे. आपल्या विहिरीत पोहले, अंघोळ केली म्हणून विहिरीतील पाणी खराब झाले याकरता दोन मुलांना नग्न करून प्रचंड मारहाण करण्यात आली. माणूस हा माणूस आहे.. जातीपातीचे राजकारण तिथे कशासाठी करायचे? आणि असे पाणी बाटते का? वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या कुटुंबांत धर्माच्या, जातीच्या नावावरून कटुता कशी येते? कोण आणते? आपण त्याला बळी का पडतो? असे अनुत्तरित प्रश्‍न खूप आहेत... 

आपला तीस वर्षांचा मुलगा आपल्या घरातून बाहेर पडत नाही. नोकरी-व्यवसाय करत नाही. आमच्यावरच अवलंबून आहे.. या कारणासाठी अमेरिकेतील एक दांपत्य अखेर न्यायालयात गेले. न्यायालयाने त्या मुलाला मुदत देऊन घराबाहेर पडण्यास सांगितले. अमेरिकेत खूप लहान वयात मुले-मुली घराबाहेर पडून स्वतंत्रपणे राहू लागतात. त्यामानाने या मुलाचे वय खूपच आहे. खूप प्रयत्न करूनही तो दाद देईना तेव्हा त्याचे आईवडील न्यायालयात गेले. ही तिकडचा संस्कृती आहे. आपण अजून त्यापासून बरेच दूर आहोत. 

अर्थात एखाद्या उदाहरणामुळे काही सिद्ध होत नाही. पण हळूहळू नात्यात कोरडेपणा येऊ लागल्यासारखे वाटते. त्यात अशी काही उदाहरणे ऐकण्या-वाचण्यात आली तर अस्वस्थ व्हायला होते. नाती जोडणे, टिकवणे हे आपले वैशिष्ट्य आहे.. नात्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. केवळ आई, वडील, भाऊ, बहीण.. अशी सांगायला नाती नसतात. नात्यांतून फार मोठे बळ मिळू शकते, म्हणूनच ती जपायला हवीत...

संबंधित बातम्या