वय वाढते म्हणजे काय? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 28 जून 2018

संपादकीय
 

अाम्ही तुझ्या वयाचे असताना..’ हा डायलॉग आपल्यापैकी कोणालाही नवीन नाही. प्रत्येक पिढीतील प्रत्येकाने कधी ना कधी हा डायलॉग ऐकला आहे - अनुभवला आहे.. हेच पिढीतील अंतर! पिढीतील अंतराची याहून सोपी व्याख्या कोणती नसेल. फरक इतकाच की पूर्वी हे अंतर दहा-बारा वर्षांचे होते, आता बदलांच्या झपाट्यामुळे ते एका वर्षावर आले आहे की काय अशी शंका यावी. 

मात्र, जोपर्यंत हटवादीपणाने आपण आपल्याच भूमिकांना चिकटून राहात नाही, तोपर्यंत पिढीतील या अंतरात नकारात्मक काहीच नाही. उलट बदलत्या समाजाची चाहूल यातून लागते. हे बदल समजून घेता येतात. त्याप्रमाणे वाटचाल करणे सोपे होते. फक्त ही प्रक्रिया एकतर्फी नको. ‘जुने ते सगळे टाकाऊ, नवे तेच चांगले’ ही भूमिका नको. दोन्ही पिढ्यांनी परस्परांना समजून घेतले की हे ‘अंतर’ अंतर वाटत नाही. तर प्रत्येकाची वाटचाल अधिक समृद्ध, समतोल होऊ शकते. 

केरळमधील एका प्रकरणावर तेथील उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आणि संबंधितांना सांगितलेल्या समजुतीच्या गोष्टींमुळे या विषयावर चर्चा करावीशी वाटली... बीए झालेली एक मुलगी आपले आईवडील आणि बहिणीबरोबर राहात होती. शेजारी राहणाऱ्या एका मुलाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच एक दिवस ती घरातून निघून गेली. तिच्या घरच्यांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली. खरे काय ते लक्षात आल्यावर त्यांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही मुलीला शोधून न्यायालयात दाखल केले. पण प्रियकराबरोबर जाण्याची इच्छा मुलीने व्यक्त केली. पुढे घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मुलीने त्या मुलाबरोबर २०१७ मध्ये लग्न केले. नव्याचे नऊ दिवस चांगले गेले. नंतर मुलाचे खरे रूप तिच्या लक्षात आले. तो काहीही काम करत नव्हता. तो चालक होता, पण कामावर जायचाच नाही. तो व्यसनीही होता. झटपट पैसा मिळविण्यासाठी तो अंमली पदार्थांचीही विक्री करायचा. काही बोलले की मारहाण करायचा. त्याच्या मारहाणीमुळे एकदा या मुलीचा गर्भपातही झाला होता. त्याचे आईवडीलही त्याला घाबरत होते. हे सगळे बघून संबंधित मुलगी आपल्या आईवडिलांकडे परत आली. त्यांनीही तिला परत घेतले. त्यानंतर आईवडिलांच्या विरोधात जाऊन ज्याच्याबरोबर लग्न केले त्याच्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी मुलीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रेमभंगानंतर होणाऱ्या हिंसक घटनांच्या, हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर मुलीचा अर्ज स्वीकारण्यात आला. 

इथपर्यंत सगळे ठीक आहे. मात्र या घटनेच्या निमित्ताने केरळ उच्च न्यायालयाने त्या मुलीला जे खडे बोल सुनावले ते सर्वच मुलांसाठी (मुलीही) आहेत. सर्वांनाच हे बोल अंतर्मुख करणारे आहेत. 

न्यायालय म्हणते, ‘मुले-मुली सज्ञान होतात. त्याआधी किंवा नंतर प्रेमात पडतात. त्यानंतर आईवडिलांशी बोलायलाही तयार नसतात. एवढेच नाही तर त्यांच्याकडे बघायलाही तयार नसतात. कायद्याच्या दृष्टीने सज्ञान होण्याला महत्त्व आहेच, पण आयुष्यात कधी फसगत होऊ शकते. अशावेळी पालकांनी पाल्यांना मार्गदर्शन केले तर ते चुकीचे नसते. केवळ वय वाढले म्हणजे आपण परिपक्व झालो असे नाही, हे मुलांनी समजून घ्यायला हवे.’ 

अतिशय योग्य आणि स्पष्ट शब्दांत न्यायालयाने संबंधित मुलीला समज दिली आहे. मात्र ही समज केवळ त्या मुलीपुरती नाही, तर सर्वच मुला-मुलींसाठी आहे. तारुण्यात पाऊल टाकले, की मुलांचे भावविश्‍वच बदलून जाते. त्यांचे हे जग स्वप्नांचे असते. त्यात काहीच वाईट नसते. पण वास्तव त्यापेक्षा फार वेगळे, वाईट, कठोर असू शकते. ही जाणीव घरातील वडीलधारी मंडळी त्यांना वेळोवेळी करून देत असतात. पण ना ते ऐकण्याचे त्यांना भान असते ना समजून घेण्याचे.. त्याबरोबरच वयाप्रमाणे बंडखोरीही स्वभावात येऊ घातलेली असते. त्यामुळे आपण आणि आपले जग तेवढे योग्य, आईवडील हे जुन्या पिढीचे त्यांना नवीन जगातील काय कळते, अशी काहीशी मग्रुरी, बेपर्वाई स्वभावात येऊ शकते. हा काळच खूप नाजूक आणि सांभाळून - त्यांच्या कलाने त्यांना समजावण्याचा असतो. आईवडिलांची, घरातील थोरांची कसोटी येथे लागते. हे करताना त्यांनी आपलाही तरुणपणाचा काळ आठवायला हरकत नाही. त्याचवेळी आपल्या मुलांना समजवताना, सावरताना मुलांची कितीही चूक असली तरी आपल्याकडे समजुतीची भूमिका असल्याची जाणीव पालकांनी सतत ठेवणे आवश्‍यक आहे. हे सोपे नाही. पण पालकांनी समजूतदारपणा सोडता कामा नये. अन्यथा प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते. शेवटी काय, आपण मोठे असतो, आपल्या मुलांपेक्षा चार-पाच पावसाळे आपण नक्कीच जास्त बघितलेले असतात. पण आपली सांगण्याची पद्धत योग्य हवी. 

वयाप्रमाणे मुलांनाही स्वातंत्र्य हवे असते. एकांत हवा असतो. कोणाची लुडबूड नको असते. मी मोठी/झाले आहे, ही भावना असते. त्यांच्या या सगळ्या भावना, जाणिवा लक्षात घेऊन ‘तू मोठा/मोठी झाला/झाली आहेस, बरोबर; पण जग असे आहे. तुला वाटतात त्यापेक्षा वेगळे अनुभवही तुला येऊ शकतात. त्यासाठी शरीर-भावना-मनाने तू तयार हवास/हवीस, ही जाणीव त्यांना करून 

द्यायला हवी. मात्र तो त्यांना उपदेश वाटता कामा नये. कारण या वयात मुलं नेमके या उपदेशालाच कंटाळलेले असतात. ‘मोठे होणे म्हणजे नेमके काय?’ हे त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता त्यांना सांगायला हवे. या गप्पांत त्यांनाही सहभागी करून घ्यायला हवे. म्हणजे त्यांचे - नवीन पिढीचे विचार आपल्यालाही कळू शकतील. शेवटी, ‘वय वाढले म्हणजे आपण परिपक्व झालो असे नाही’ हे जसे मुलांना लागू आहे, तसेच मोठ्यांनाही लागू आहेच ना!

संबंधित बातम्या