ऑनलाइनची ‘जबाबदारी’

ऋता बावडेकर
गुरुवार, 5 जुलै 2018

संपादकीय
 

आधुनिक होणे चुकीचे नाही. कोणत्याही वयात आपण आधुनिक पद्धती वापरून स्वतःला ‘अपडेट’ ठेवू शकतो. पण आधुनिक होणे म्हणजे नेमके काय? त्यासाठी कोणती तयारी करायला हवी? काय काळजी घ्यायला हवी?.. याचाही विचार व्हायला हवा. तसे केले तर आपण कोणापेक्षाही कमी नसणार आणि कोणी आपली फसवणूकही करू शकणार नाही. 

अलीकडे ‘ऑनलाइन’चे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ‘ऑनलाइन व्यवहार’ हा त्याचाच भाग आहे. नीट, डोळे उघडे ठेवून, सावधगिरीने केला, तर हा व्यवहार खूप चांगला, सोयीचा आहे. त्यामुळे खूप वेळ वाचतो आणि कामेही पटापट होतात. मात्र त्यासाठी आपण सतत सजग असले पाहिजे. कारण व्यवहार - तोही आर्थिक व्यवहार म्हटला, की त्यात पळवाटा - चोरवाटा शोधणारे, लुबाडणूक करणारे असणारच. त्यामुळेच असे व्यवहार करताना करणाऱ्याने खूप काळजीपूर्वक हे व्यवहार केले पाहिजेत. 

गेल्या अनेक दिवसांत अशा व्यवहारात फसवणूक झालेली अनेक प्रकरणे आहेत. त्यापैकी अगदी अलीकडल्या एका घटनेत तर थेट निवृत्त पोलिस अधिकाऱ्यालाच फसवण्यात आले आहे. मुंबई पोलिस दलातून निवृत्त झालेले सोपान चौधरी वर्षभर रुग्णालयात उपचार घेत होते. मुलगा-सून परदेशात, मुलीचे लग्न झालेले, त्यामुळे फक्त पत्नी सोबत होती. बरे झाल्यानंतर त्यांनी एक दिवस आपले खाते तपासले, तर खात्यातील तब्बल १८ लाख १९ हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली. शोध घेतल्यानंतर चौधरी यांच्या ड्रायव्हरनेच चौधरी यांचे डेबिट कार्ड, बॅंक खाते क्रमांक मिळवून पैसे चोरल्याचे उघडकीस आले. कात्रजला राहणाऱ्या एका चाळीस वर्षांच्या गृहिणीला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ‘घर घेण्यासाठी आम्ही वीस लाख रुपयांचे कर्ज तत्काळ देतो,’ असे त्या व्यक्तीने महिलेला सांगितले. त्यानंतर पुन्हा फोन करून त्या व्यक्तीने कर्जाच्या प्रक्रियेसाठी ठराविक रक्कम महिलेला भरावयास सांगितली. त्यानंतर महिलेने सव्वा लाख रुपये त्या बॅंक खात्यात जमा केले. नंतर ना त्या व्यक्तीचा फोन आला ना त्या फोन क्रमांकावरून काही प्रतिसाद मिळाला. 

असे कितीतरी प्रकार आपल्या आजूबाजूला घडलेले आपल्याला माहिती असतात. अशा प्रकारांच्या बातम्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असतात. त्याही आपण वाचत असतो. पण अशा घटनांत लक्षणीय नाही, तरी वाढच होते आहे की काय अशी परिस्थिती आहे. अशा वाढत्या घटनांमुळे काळाची पावले ओळखून पोलिस खात्याने सायबर सेलचीही निर्मिती केली आहे. मात्र आपल्या तक्रारी वेळेत केल्या तर या खात्यातील कर्मचाऱ्यांना जलद तपास करणे सोपे जाते. घटनेला अधिक दिवस उलटून गेले तर तपास करणे अवघड होते. अशा प्रकारांत आतापर्यंत फसवणूक झालेल्यांची रक्कम ६ कोटी ६२ लाख ८० हजार आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर परत मिळालेली रक्कम ३ कोटी ६७ लाख २५ हजार आहे. हे प्रमाण बघता, अशा प्रकरणांतील रक्कम परत मिळवणेही शक्‍य असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी विलंब न करता तातडीने तक्रार नोंदवायला हवी. 

अशा फसवणुकीचीही एक पद्धत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना टार्गेट केले जात असल्याचे लक्षात आले आहे. कारण उघड आहे. समाजातील हे दोन घटक दुर्बल मानले जातात. वयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ‘महिलांना तर काही व्यवहार कळत नाही’ हा दृढ समज! वास्तविक भाजी, कपडे वगैरे खरेदी करताना घासाघीस करण्यात महिलांचा हात फार थोडे लोक धरू शकतात. पण अशावेळी त्यांना काय होते कळत नाही.. आत्मविश्‍वासाचा अभाव हेच मुख्य कारण आहे. त्याला जबाबदारही आजूबाजूची मंडळीच आहेत.. तपशिलात जायला नको, ते विषयांतर होईल. पण या दोन्ही घटकांकडे आत्मविश्‍वास कमी असतो. त्यातही अलीकडे बहुतेक घरटी एक मूल परदेशात असते. सगळे व्यवहार ऑनलाइनवरच होत असतात. स्काइपवर गप्पा, ऑनलाइन ट्रांझॅक्‍शन्स यामुळे ज्येष्ठांनीही स्वतःला बदलले आहे. या आधुनिक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या आहेत. 

पण आधुनिक होणे म्हणजे नेमके काय? तंत्रज्ञान शिकले म्हणजे आपण आधुनिक होतो का? काही प्रमाणात होतो, पण तेवढे पुरेसे नाही. आधुनिक पद्धतीने व्यवहार करता आले तरी त्यातील बारकावेही शिकून घ्यायला हवेत. केवळ व्यवहारापुरती माहिती न घेता, यातून फसवणूक कशी होऊ शकते, ती कशी टाळता येऊ शकते वगैरे गोष्टीही समजून घ्यायला हव्यात. कारण अशा आधुुनिक व्यवहारात आपण चूक केली तरच आपली फसवणूक होऊ शकते, असे तज्ज्ञ म्हणतात. उदा. एटीएम मधून पैसे काढताना आपले कार्ड तिथेच विसरणे, आपला पिन क्रमांक मोठ्याने सांगणे (हॉटेलांमध्ये बिल देताना असे प्रकार हमखास होतात), अज्ञात व्यक्तीला आपली बॅंक डिटेल्स सांगणे, ओटीपी नंबर सांगणे... अशी जर सगळीच माहिती आपणच द्यायला लागलो, तर फसवणूक करणाऱ्याला किती दोष देता येईल? फसवणूक करणे चूकच, पण त्या व्यक्तीला आपणच अशी मदत करू नये ना! अशा फसवणुकीच्या तक्रारी लक्षात घेऊन बॅंकवालेही मेसेज पाठवून आपल्याला सावध करत असतात. त्यामुळे आपली कोणतीही वैयक्तिक, आर्थिक माहिती कोणालाही सांगू नये. 

खरे तर हे आपण लहानपणापासून शिकतो, आपल्या मुलांना शिकवतो. मग वेळ आली की आपण स्वतःच ते का विसरतो? ज्याचे नावही माहिती नाही, त्याच्यावर इतका आंधळा विश्‍वास का ठेवतो. पाच-दहा हजाराच्या गिफ्टसाठी वीस-बावीस लाख रुपये कसे एखाद्याला देऊन टाकतो. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात ते बरोबर आहे, चूक आपली आहे. यापुढे हे ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढणार आहे. इच्छा असो - नसो, आपल्याला ते करावे लागणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वकच सगळेच व्यवहार करायला हवेत. तर आपण खरे आधुनिक, स्मार्ट होऊ...

संबंधित बातम्या