होय, ‘टुगेदर वुई कॅन’ 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

संपादकीय
 

परदेशाबद्दल अनेक भारतीयांच्या मनात सूप्तसे आकर्षण असते. पलीकडची ती भूमी एकदा पाहण्यापासून शिक्षणासाठी तिथे जाणे, तिथेच स्थायिक होणे, परदेशस्थ भारतीयाबरोबर विवाह करणे.. असे आकर्षणाचे विविध प्रकार असतात. त्यापैकी पहिल्या दोन प्रकारांत ‘रिस्क’ खूप कमी असते. म्हणजे, एखाद्या मध्यस्थाच्या माध्यमातून व्यवहार झाला असेल, तर फसवणुकीची शक्‍यता अधिक असते. अन्यथा रिस्क खूपच कमी असते. मात्र, परदेशस्थ भारतीयाबरोबर विवाह करणे अनेकदा खूपच रिस्की ठरू शकते. आतापर्यंत अनेक मुलींनी हा अनुभव घेतला आहे आणि ही संख्या वाढतेच आहे. मात्र आता अशी फसवणूक झालेल्या देशभरातील काही मुली एकत्र आल्या आहेत. ‘टुगेदर वुई कॅन’ असे म्हणत, त्या आपल्या समस्या सोडवू पाहात आहेत. दैनिक सकाळमध्ये या आशयाची वृत्तमालिका नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. 

परदेशात नोकरी करणाऱ्या तरुणाबरोबर लग्न करणे यात खरे तर काहीच चुकीचे नाही. पण तसे करताना संबंधित तरुणीने, तिच्या कुटुंबीयांनी नीट चौकशी करायला हवी. अर्थात अनेकदा कितीही चौकशी केली तरी ती अपुरीच ठरते. अनेकदा लोक ‘आपल्याला काय करायचे?’ म्हणून चौकशी करणाऱ्यांना नीट माहिती देत नाहीत. अनेक गोष्टी दडवून ठेवतात. तसेच बरेचदा संबंधित मुलाचे इकडचे वागणे वेगळे असते. त्यामुळेही दिशाभूल होऊ शकते. परदेशातील चौकशीवर अर्थातच मर्यादा येतात. त्यामुळे हे फसवणुकीचे प्रकार घडतात. 

पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरातील समीराचे (नाव बदलले आहे) लग्न दापोलीतील रशीदबरोबर ठरले. रशीद न्यूझीलंडमध्ये नोकरी करत होता. दरम्यान, रशीदने समीराच्या वडिलांकडून पाच लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर २५ ऑक्‍टोबर २०१५ रोजी समीरा-रशीदचा विवाह झाला. रशीदने तिला पाच महिन्यांनंतर न्यूझीलंडला नेले. सुरुवातीचे एक-दोन महिने ठीक गेले, त्यानंतर रशीदने तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. शिक्षणासाठी आठ वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी रशीदने समीराला एका मॉलमध्ये कामाला लावले. बॅंकेत दोघांच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडून त्यातून स्वतःचे शैक्षणिक कर्ज फेडून घेतले. समीरापासून आणखी आर्थिक फायदा होत नाही, हे पाहून त्याने तिला परत भारतात पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी रशीदही एका समारंभासाठी भारतात आला. त्याने व त्याच्या कुटुंबाने समीराच्या कुटुंबाबरोबर भांडण केले आणि समीराला इथेच सोडून तो निघून गेला. समीरा अजूनही न्यायासाठी लढतेच आहे. समीरासारखी फसवणूक झालेल्या असंख्य तरुणी आहेत. लग्न करून या तरुणी जेव्हा परदेशी जातात, तेव्हा अनेकदा त्यांच्या लक्षात येते की आपल्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे. केवळ घरच्यांच्या आग्रहापोटी त्याने आपल्याबरोबर लग्न केले आहे. या तरुणींचा अनेकदा छळही होतो. सर्वप्रथम त्यांचा पासपोर्ट काढून घेतला जातो. त्यांना घरात डांबले जाते. त्यांची अवस्था मोलकरणीसारखी केली जाते. अनेकजणी स्वतःची कशीबशी सुटका करून घेतात आणि परत येण्यात यशस्वी होतात. 
अर्थात, अशी प्रकरणे काही आज घडत नाहीत. खूप पूर्वीपासून घडत आहेत. सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणांना वाचा फुटत आहे. आता मुलीही तेवढ्या रडूबाई राहिलेल्या नाहीत. स्वतःचे हक्क, अधिकार त्यांना माहिती आहेत. मुख्य म्हणजे अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नाही. अर्थात सगळ्याच मुली इतक्‍या धीट असतील असे नाही, पण धीट मुलींचे प्रमाण वाढते आहे. त्यांना कुटुंबाकडून सहकार्यही मिळते आहे. त्यामुळेच समीराने पुढाकार घेतला. ‘टुगेदर वुई कॅन’ ही चळवळ उभी केली. त्याला उदंड नसला तरी प्रतिसाद मिळतो आहे. समीराने या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांच्याबरोबर ती ट्विटरद्वारे संपर्कात असते. त्याचवेळी तिच्याप्रमाणे फसवणूक झालेल्या काही तरुणी फेसबुक, ट्विटरवर तिच्या संपर्कात आल्या. आता साठहून अधिक तरुणींचा ग्रुप तयार झाला असून या प्रश्‍नावर त्या राष्ट्रीय पातळीवर लढा देत आहेत. संख्या कमी असली, तरी सुरुवात तर झाली आहे.. 

 मात्र, हा प्रश्‍न केवळ कोणा एका समीराचा नसून संपूर्ण देशातीलच तरुणींचा आहे. पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील परदेशस्थित मुलांकडून फसवणूक झालेल्या मुलींची संख्या अधिक आहे. पतीविरुद्ध ठोस कारवाई व्हावी यासाठी या मुलींचा आपापल्या राज्यांत संघर्ष सुरू आहे. पण अनेकदा त्यांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही. मात्र याला अपवाद जालंधरमधील एक पासपोर्ट अधिकारी आहे. जालंधरचे तत्कालीन पासपोर्ट अधिकारी परणीत सिंग यांनी अतिशय संवेदनशीलतेने या प्रश्‍नात लक्ष घातले. फसवणूक झालेल्या प्रत्येक तरुणीची स्वतंत्र फाइल त्यांनी तयार केली. त्यानंतर तब्बल एक हजाराहून अधिक प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर पासपोर्ट जप्तीची कारवाई केली. अर्थातच हे अपवादात्मक उदाहरण झाले. एरवी, कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी महिलेची तक्रार पोलिस दाखल करू शकतात. पण अशा प्रकरणांत ज्यांच्याविरुद्ध तक्रार असते ती व्यक्ती परदेशात असते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई कशी करायची हा पोलिसांपुढे प्रश्‍न असतो. पोसपोर्टही न्यायालयाच्या माध्यमातूनच रोखला जाऊ शकतो. 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘एनआरआय सेल’मध्ये आतापर्यंत साडे तीन हजारापर्यंत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड व संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांबाबत आहेत. मात्र आता केवळ तक्रारी करून गप्प बसण्याची वेळ नाही. या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी या सगळ्या यंत्रणांची मदत घेत समीरा करते तसा संघर्ष करायला हवा. त्यासाठी संपूर्ण समाजाचीही साथ मिळायला हवी. परदेशाचे स्वप्न बघणे चुकीचे नाही, पण म्हणून एवढी मोठी शिक्षा या मुलींना मिळावी? त्याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. आता मुलींनीच स्वतःच्या पायावर उभे राहून आपले परदेशात राहण्याचे स्वप्न स्वतःच पूर्ण करायला हवे. कुटुंबाची, समाजाची साक्ष मात्र त्यांना त्यासाठी मिळायला हवी.

संबंधित बातम्या