सिगारेटचा कश हवा कशाला? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

संपादकीय

आयुष्यातील ताणतणाव वाढले आहेत. ते कसे कमी करावेत, कायमचे घालवावेत, याबद्दल प्रत्येक जण आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असतो. सिगारेटच्या धुराबरोबर आपले ताण, आपल्या नकारात्मक भावना हवेत सोडून देण्याचा त्यापैकी एक प्रयत्न असतो. तो विशेषतः आरोग्याला उपयोगी नसल्याचे सगळ्यांनाच माहिती असले, तरी सिगारेटचा आसरा घेतला जातो. ताण घालवणे, मजा म्हणून, स्टाईलसाठी, बंडखोरपणा म्हणून.. सिगारेट ओढण्याची अशी विविध कारणे आहेत. त्यात आणखी एका कारणाची भर पडल्याची नोंद झाली आहे. ती म्हणजे आपली ‘फिगर मेंटेन’ ठेवण्यासाठी काही तरुणी सिगारेट ओढताना दिसतात. ही संख्या वाढते आहे, हे दुर्दैव. नशाबंदी मंडळाने केलेल्या एका पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

हे स्पर्धेचे जग आहे. या जगात टिकून राहायचे असेल, तर गुणवत्तेबरोबरच इतर अनेक गोष्टी अंगी असणे आवश्‍यक असते अशी अनेक मंडळींची धारणा आहे. त्यातील अनेक जण तर गुणवत्ता नसली तरी चालते, असे म्हणायलाही बिचकत नाहीत. ते किती बरोबर किती योग्य हे जाणकार जाणताच; पण काही मंडळी - विशेषतः काही तरुण मंडळी असे मानतात. त्याप्रमाणेच त्यांचे वागणेही असते. त्यात आता ‘सिगारेटचा कश’ हे नवीन खूळ सध्या त्यांच्या डोक्‍यात घुसले आहे. विशेषतः तरुणींच्या! सिगारेट ओढण्यामुळे फिगर मेंटेन राहते, अशी त्यांची चमत्कारिक धारणा आहे. त्यात किती तथ्य आहे, याची शहानिशा करण्याचीही गरज त्यांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे, सिगारेट ओढल्यामुळे भूक लागत नाही आणि भूक लागली नाही की डाएट करणे सोपे जाते. हे खरे असेलही पण अशा पद्धतीने उपाशी राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य आहे. शरीरावर त्याचे काय आणि कसे विपरीत परिणाम होतात, होऊ शकतात याची त्यांना आज तरी पर्वा दिसत नाही. ही चिंतनीय बाब आहे. 

अर्थातच तरुणींनी सिगारेट ओढण्याचे हे एकमेव कारण नव्हे किंवा तरुणी-महिला सिगारेट ओढतात हीदेखील अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नाही. फिगर मेंटेन करण्यासाठी या कारणाबरोबरच इतर अनेक कारणे या तरुणी देतात. त्यामध्ये घरातील कडक शिस्तीच्या वातावरणातून महाविद्यालयात गेल्यावर मिळालेल्या अतिमोकळेपणामुळे सिगारेट जवळ केली, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पुरुषांच्या तुलनेत आपण कुठे कमी पडू नये, सिगारेटमुळे किक येते, कामाचा उत्साह येतो, चहा आणि सिगारेटच्या कॉम्बिनेशनमध्ये शरीरात धूर राहिल्यावर वेगळा आनंद मिळतो.. अशी अनेक कारणे या तरुणी सांगतात. दादरमधील एका ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी तर सिगारेट ओढणे हाच निकष आहे. 

नशाबंदी मंडळाने ही पाहणी करताना प्रामुख्याने १८ ते २५ हा प्रमुख वयोगट ठेवला होता. तसेच २५ ते ३५ वयोगटातील नोकरदार महिलांबरोबरही त्यांनी संवाद साधला. चर्चगेट, मरिन ड्राईव्ह, अंधेरी, घाटकोपर, दादर इत्यादी भागांतील काही महाविद्यालये, वस्त्या, बचतगट, महिला मंडळे इत्यादी ठिकाणी मंडळाने भेट दिली. पूर्वी तरुण मुलगे लपून छपून सिगारेट ओढताना दिसायची आता मात्र महाविद्यालयांबाहेर, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे सिगारेट ओढणाऱ्या तरुणी सर्रास दिसू लागल्या आहेत. हा बदल का आणि कसा झाला हे शोधताना ‘आपण कुठेच मागे राहता कामा नये; मग ती सिगारेट का असेना अशी मानसिकता तरुणींमध्ये तयार होत आहे,’ असे मंडळाला आढळले. सुरुवातीला ही स्टाइल वाटली तरी पुढे याचे व्यसनात रूपांतर होऊ शकते, याचे भान मात्र या तरुणींना नसते. ‘तरुण वयातील सिगारेट किंवा तंबाखूच्या व्यसनामुळे नंतर; विशेषतः लग्नानंतर गर्भारपणात त्रास होऊ शकतो, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुलींना सांगितल्यानंतर - आयुष्य आताच एंजॉय केले पाहिजे. समस्यांवर प्रतिबंधात्मक औषधे - उपाय आहेतच की - अशी उत्तरे मुलींनी दिली.’ ही परिस्थिती थोड्याफार फरकाने अनेक ठिकाणी दिसते. वस्तीमधील मुलींमध्ये सिगारेटपेक्षा तंबाखूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र त्यांची कारणेही खूप वेगळी आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहातील दुर्गंधी टाळण्यासाठी या मुली तोंडात तंबाखू ठेवतात.त्यामुळे दुर्गंधी सहन करण्याची ताकद-शक्ती मिळते, असे त्यांना वाटते. त्यातून पुढे त्यांना तंबाखूची सवय लागते. तसेच आजी-आईमुळेही अनेकींना तंबाखूचे व्यसन लागल्याचे अनेकींनी सांगितले. केवळ शहरांतच नाही, तर तंबाखूचे असे व्यसन ग्रामीण भागांतील अनेक महिलांमध्येही दिसते. अनेक गावांत विड्या वळण्याचे काम चालते. या विड्या वळणाऱ्यांत स्त्रियांचे प्रमाण मोठे आहे. त्यातूनच तंबाखूचे व्यसन लागते. काही महिला विड्याही ओढू लागतात. 

कारणे काहीही असतील, पण तंबाखू खाणे काय किंवा विड्या-सिगारेटींमधून तंबाखू शरीरात घेणे काय; या गोष्टी शरीराला घातकच. तरुण वयात लक्षात येत नाही. तरुणपणाचा जोश असतो, बेफिकिरी असते, बंडखोरी असते; पण जसे वय उतरणीला लागते तसे या व्यसनांचे दुष्परिणाम जाणवू लागतात. अत्याधुनिक वैद्यकीय ज्ञानाकडेही प्रत्येकवेळी यावर उपाय असतोच असे नाही. त्यामुळे वेळ निघून जाण्याआधीच शहाणे व्हायला हवे. तरुण म्हणजे सदा बहकलेला, वाहवत गेलेलाच असायला हवा असे नाही. त्या वयातही आपण विचार करू शकतो, फक्त इच्छाशक्ती हवी. शहाणपण हवे. समजूतदारपणा हवा. सततची बंडखोरी कुठेही नेत नाही. त्या बंडखोरीलाही काही विचार, दिशा हवी. त्यामुळे मोठी मंडळी म्हणतात ते सगळे चुकीचेच असे गृहीत न धरता त्यावर कधीतरी शांतपणे विचार करायला हवा. कारण शहाणपणाच्या गोष्टी ऐकल्या नाही तर त्याचे परिणाम स्वतःलाच भोगायला लागणार आहेत, एवढा तरी विवेक स्वतःकडे असायला हवा. स्टाइल मारायला, बरोबरी करायला, फिगर मेंटेन करायला इतरही अनेक मार्ग आहेत. कदाचित कष्टाचे असतील, पण त्याचे दुष्परिणाम तरी नसतात आणि स्वतःचा कस बघणारे असतात. माणूस म्हणून स्वतःला पारखून घेण्याचा हा सगळ्यात चांगला मार्ग असतो, तो अंगिकारायला हवा.   

संबंधित बातम्या