चाय गर्रर्रऽऽर्रमऽऽऽ 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

संपादकीय
 

रेल्वेने, बसने तुम्ही प्रवासाला निघालेले असता.. पहाटे पहाटे कोणत्यातरी स्थानकावर तुमची गाडी थांबते. डोळे अजून आळसावलेलेच असतात.. आणि एक हाळी कानावर येते.. ‘चाय अर्रर्रर्रऽऽऽमऽऽ’ झोप कुठल्याकुठे उडून जाते आणि त्या आवाजाला डोळे शोधू लागतात. पहाटे पहाटे ते कढत पेय घशाखाली गेले की कसे एकदम छान वाटते. चेहऱ्यावर आपसूक समाधानाचे एक स्मित येते. दिवसाची सुरुवात छान होते... चहाची गंमतच तशी आहे. त्यामुळेच ‘सकाळ साप्ताहिका’चा हा अंक खास सगळ्या ‘चहाबाजां’साठी आम्ही केला आहे. सगळ्यांना तो नक्कीच आवडेल. 

चहा म्हटले, तरी चेहऱ्यावर तरतरी आली नाही, असा एखादा विरळाच! एरवी प्रत्येकाला कधी ना कधी चहा घ्यायला आवडतोच. कोणाच्याही घरी गेले, की सर्वप्रथम ‘चहा घेणार ना?’ अशी विचारपूस होते. यात प्रश्‍न कमी आणि आलेला पाहुणा चहा घेणारच, असेच अधिक गृहीत धरलेले असते. त्याप्रमाणे प्रतिसाद मिळतोच. बाहेरही कधी आपण भेटलो, की चल घोट घोट चहा घेऊ या.. असे आवतण मिळतेच. कार्यालयांतही चहाचे ब्रेक असतात. मंडळी जेवणाचा ब्रेक कदाचित कमी घेतील, पण चहाचा ब्रेक हवाच असतो; भले तो लहान का असेना! त्यामुळेच मोठे स्टॉल्स असोत वा लहान टपऱ्या; दिवसाचा प्रहर कोणताही असो, चहाचे हे अड्डे कधीही ओस दिसत नाहीत. तिथे सतत गर्दी, हलचल असते. त्यातही कोणत्या ठिकाणचा चहा प्रसिद्ध, त्याप्रमाणे गर्दीत कमी-जास्त होते, पण या ठिकाणी गर्दी कायम असते. हे बघून अनेक ठिकाणी चहाच्या चेन्सही दिसतात. ब्रॅंडेड चहा पावडरवाल्यांनीही अनेक ठिकाणी आपले स्टॉल्स सुरू केले आहेत. 

वास्तविक, पाणी, चहा पावडर (पत्ती), साखर (किंवा बिनसाखर), चहा मसाला, दूध, वेलची, आले वगैरे साहित्यात किंवा केवळ पत्तीवर चहा तयार होऊ शकतो. पण अनेक नवीन मंडळींनी व्हरायटी आणली आहे आणि त्याला प्रतिसादही छान मिळतो आहे. तंदूर चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, ग्रीन टी, काश्‍मिरी कावा ड्रायफ्रुट्‌स चहा, इलायची चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाइट टी... असे चहाचे अनेक नवे-जुने प्रकार मिळू लागले. या सगळ्याची माहिती या अंकात आहे. ‘चहाचे स्टार्टअप’ सुरू करणाऱ्याची यशोगाथा या अंकात आहे. 

चहाबद्दलचे आपल्या सगळ्यांचे ममत्व सर्वश्रुत आहे. पण या चहाचा इतिहास किती जणांना माहिती आहे? या अंकात चहाचा इतिहास आम्ही सविस्तर घेतला आहे. तसेच, इतकी मागणी असणाऱ्या चहाच्या अर्थकारणावरही भाष्य आहे. चहा आवडतो, हे ठीक आहे पण चहाचे फायदे-तोटे काय? यावर आरोग्यविषयक दृष्टिकोनातून लिहिलेला लेखही आहे. चहामुळे होणारे फायदे भरपूर आहेत, तसेच चहाचे प्रकारही खूप आहेत; मात्र त्याचे काही तोटेही आहेत. ते नेमके काय आहेत? चहा पिताना कोणती पथ्ये पाळायला हवीत वगैरे मुद्‌द्‌यांचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे. इतक्‍या लोकप्रिय चहाची क्रेझ फॅशनमध्ये उतरली नसती तरच नवल! किटली लॅंप शेड्‌स, कॅलिग्राफी टी-शर्ट, टी-कोस्टर्स... त्यासाठी वानगीदाखल ही काही उदाहरणे देता येतील. 

चहा कसा करतात, हे हल्ली लहान लहान मुलांनाही माहिती असते. त्यांना चहा करताही येत असतो. पण आपल्याला माहिती आहे, तेवढाच चहा नव्हे, चहाचेही खूप प्रकार असतात. उदा. आईस लेमन टी, ग्रीन टी विथ टर्मरिक, मिंट टी, लेमन जिंजर हनी टी असे चहाचे कितीतरी प्रकार आहेत. ते कसे करायचे याची कृती अंकात दिलेली आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या चहावर पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहे. ‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ या पुस्तकाच्या अनुषंगाने साहित्यातील चहाचे महत्त्वही अंकात दिलेले आहे. टी-टेस्टर या करिअरविषयी अंकात माहिती देण्यात आलेली आहे. 

चहाचा हा प्रवास एका गोष्टीशिवाय अपुरा आहे. ती गोष्ट म्हणजे, अमृततुल्य चहा! वाफाळणारा आणि मसालेदार चव असलेला चहा हा अमृततुल्य चहाच असणार. पुण्यातील ‘अमृततुल्य’ची परंपरा आता शतकात पदार्पण करत आहे. या आद्य अमृततुल्यचा आढावाही अंकात घेण्यात आला आहे. चहावर ब्रिटिश नंदी यांनी त्यांच्या खास शैलीत केलेले मजेशीर भाष्यही आहे. चहाला इतकी मागणी आहे, अशाच काही तरुण ‘चहाबाजां’ची मनोगतेही आम्ही दिली आहेत. 

चहा हे कुठल्याही वेळी चालणारे पेय आहे, काहींना मात्र रात्री चहा प्यायल्याने झोप येत नाही. पण हा अपवाद वगळता चहाला सहसा फारसे कोणी नाही म्हणत नाही. नाही म्हणायला चहाऐवजी कॉफी पिणारेही असतील; पण तुलनेने ‘चहाबाजां’चे प्रमाण अधिक आहे. अर्थातच एखादी गोष्ट कितीही आवडती असली तरी प्रत्येक गोष्टीला मर्यादा हवीच. त्यामुळे चहा चवीने प्यावा, पण त्यामुळे काही त्रास होणार नाही हेही बघायला हवे. असा सर्व अंगाने वेध घेणारा आमचा चहा विशेषांक वाचकांच्या पसंतीस उतरेल, अशी खात्री आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.  

संबंधित बातम्या