संध्याछायेतील स्वतंत्र वाट

ऋता बावडेकर
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

संपादकीय
 

विवाह - लग्न हा फार मोठा जुगार असतो, असे बडेबुजूर्ग सांगतात. हे लग्न प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेले असो; पुढे काय हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. प्रेमाच्या शंभर आणाभाका घेणारे एकमेकांच्या जिवावर उठलेले दिसतात; तर लग्नापूर्वी एकमेकांना मुळीच न ओळखणारे प्रेमाने संसार करताना दिसतात. प्रत्येकवेळी असेच होईल असे नाही; पण या नात्यात इतके चढउतार असतात. नाते कोणतेही असो ते टिकवायचे असेल तर दोन्ही घटकांत मूलभूत समजूतदारपणा हवा. संयम हवा. प्रेम हवे. पण अलीकडे काहीतरी चुकले आहे किंवा आता लोक मोकळेपणाने व्यक्त होऊ लागले आहेत; कारण काहीही असेल अनेकदा नाती पणाला लागताना दिसतात. वैवाहिक जीवनही याला अपवाद नाही. यामध्ये अलीकडे जाणवणारा बदल म्हणजे, तरुण लोक तर हे पाऊल गाठतातच पण अलीकडे ज्येष्ठही घटस्फोटाचे पाऊल उचलताना कचरताना दिसत नाहीत. 

आधी आईवडिलांसाठी, मग पाठच्या बहिणींची लग्नं व्हायचीत म्हणून, मग मुले लहान आहेत म्हणून, मग समाजाची भीती, नातेसंबंध जपण्याची जबाबदारी... अशा असंख्य कारणांमुळे सविताताई (नाव बदलले आहे) आपल्या संशयी आणि बाहेरख्याली नवऱ्याचा जाच सहन करत आल्या. आता या उतारवयात त्यांचा संयम संपला आणि आयुष्यात अखेरच्या दिवसांत तरी दडपणाशिवाय, मुक्तपणे जगता यावे म्हणून त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. पंचवीस वर्षांच्या संसारानंतर साठीतील सविताताईंसाठी हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते. पण त्यांनी कठोरपणे हा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी समजावून पाहिले, समुपदेशकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आता मला या संशयी आणि विक्षिप्त व्यक्तीबरोबर माझे उर्वरित आयुष्य काढायचे नाही, या आपल्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. 

सविताताईंच्या या अर्जामुळे हा वेगळाच प्रश्‍न समाजासमोर आला आहे. आतापर्यंत आपण तरुणांमधील वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणाबद्दल बोलत होतो. चर्चा करत होतो. चिंता व्यक्त करत होतो. ती समस्या आहेच गंभीर; पण त्याच समस्येचे हे दुसरे टोक आतापर्यंत कोणाच्या लक्षातच आले नव्हते. मागील पिढीतही अशी काही समस्या असेल हे कोणाच्याच फारसे गावी नव्हते. नाही म्हणायला एखाद-दुसरे प्रकरण असेलही, नाही असे नाही. पण त्यावरून काही निष्कर्ष काढावा अशी काही परिस्थिती नव्हती किंवा तसे गांभीर्य कोणाला फारसे वाटले नाही. पण आता बघितले, तर नागपूरच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या शंभर प्रकरणांपैकी दहा प्रकरणे ही ज्येष्ठ नागरिकांची असल्याची माहिती आहे. एकट्या नागपूरमधील हे प्रमाण आहे, त्यावरून इतर ठिकाणचीही कल्पना आपण करू शकतो. 

लग्नाची बायको घरात असताना बाहेर प्रकरणे करणे, नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहून अन्यत्र संबंध ठेवणे, बायकोला कस्पटासमान वागवणे, बायकोचा शारीरिक-मानसिक छळ करणे, तिचा सतत संशय घेणे, तिला मानसन्मान न देणे... अशी कितीतरी कारणे सांगता येतील. वाचणा-ऐकणाऱ्याला काही कारणे किरकोळ (?) वाटू शकतील. पण वर्षानुवर्षे हा छळ, त्रास सहन करणे हे काय दिव्य असते हे ती संबंधित बाईच जाणे. तिचे ‘माणूसपण’च नाकारले जात असते. त्याची दाद ती कोणाकडे मागूही शकत नाही. अनेकदा मुलाबाळांसह सगळे घरदार तिच्या पतीच्या बरोबर असते. आईची थट्टा करणे, टिंगल करणे असे प्रकारही होत असतात. सहन करण्यापलीकडे ती बाई काहीही करू शकत नाही. पण सहनशक्तीचा हा बांध कधी ना कधी फुटतोच. घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिला अशा आहेत. सगळा संयम, सहनशक्ती संपलेल्या. त्यातही बघा, त्यांनी आपली सगळी कर्तव्ये पार पाडलेली आहेत. घरादाराची जबाबदारी, मुलाबाळांचे विवाह वगैरे सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचे टोकाचे पाऊल उचलले आहे. आपली जबाबदारी त्यांनी अजिबात टाळलेली नाही. पण आता अखेरच्या काळात तरी आपल्याला मनासारखे जगता यावे, मानाने राहता यावे अशी त्यांनी अपेक्षा केली तर ती चुकीची म्हणता येणार नाही. 

पती-पत्नीचे असो किंवा कोणतेही नाते तुटणे हे क्‍लेशकारकच असते. फार मोठी शारीरिक, मानसिक, भावनिक गुंतवणूक त्यात झालेली असते. ते नाते तोडायचे म्हणजे, मनाची खूप मोठी तयारी करायला लागते. इतर कोणाहीपेक्षा आधी आपल्या मनाला समाजवावे लागते. आपल्या स्वतःला शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या तयार करावे लागते. ती तयारी झाली ना, याची खात्री झाल्यावर त्याचे परिणाम, आपल्या निर्णयामुळे आपल्या स्वतःवर, आपल्या इतर नात्यांवर काय परिणाम होतील, ते आपण सहन करू शकू ना, आपल्या निर्णयावर आपण ठाम राहू शकू ना, आपला निर्णय आपल्याला पेलवेल ना, तो तडीला नेता येईल ना वगैरे असंख्य प्रश्‍नांना आपली आपणच उत्तरे शोधून द्यायची असतात. त्यानंतरही मन साशंकच असते. कारण आयुष्यातील एवढा मोठा काळ आपण अनेक माणसांत राहिलेले असतो. आवडत नसले तरी त्या पतीबरोबर संसार केलेला असतो. मुलाबाळांची, भरल्या घराची, अवलंबून राहण्याची सवय झालेली असते. अचानक हे सगळे सोडून स्वतंत्र, एकटे राहणे वाटते तितके सोपे नसते. 

पण ज्याअर्थी एखादी स्त्री या निर्णयापर्यंत येऊन पोचते, तेव्हा तिने खूप सहन केलेले असते. सहन करण्याची मर्यादा तिने गाठलेली असते किंवा ओलांडलेली असते. त्यामुळेच उतारवयात विभक्त होण्याच्या त्यांच्या या निर्णयाकडे सहानुभूतीने बघितले पाहिजे. केवळ त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न म्हणून सोडून न देता समाजाने या प्रश्‍नावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. यात केवळ त्या नाही, तर त्यांना त्रास देणारा पती किंवा संबंधित घटक, मुले सगळ्यांनाच झळ पोचणार असते. त्यामुळे उतारवयाचा विचार करून प्रत्येकाने अगदी लहान वयापासून आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. समाजाचाही तसा अंकुश असायला हवा.

संबंधित बातम्या