अत्याचार कधी तरी थांबणार का? 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

संपादकीय
 

महिलांवरील अत्याचार हा अतिशय संवेदनशील विषय आहे. आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे. यावर खूप चर्चा होतात, सुरक्षिततेचे उपाय योजले जातात, कायदे केले जातात; पण अत्याचारांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. हरियानातील रेवाडी गावात नुकतीच घडलेली घटना याचे अलीकडचे ज्वलंत उदाहरण आहे. 

हरियानातील एका गावातील एकोणीस वर्षांची एक मुलगी रेवाडीमधील आपला कोचिंग क्‍लास संपवून घरी निघाली होती. पण बस स्थानकावरूनच तिचे अपहरण करण्यात आले. एका शेतातील एका खोलीत तिला नेण्यात आले. गुंगीचे औषध देऊन जवळ जवळ बारा लोकांकडून तिच्यावर तिथे बलात्कार करण्यात आला. दरम्यान तिची तब्येत खालावली, तेव्हा आरोपींनी जवळच्या गावातील डॉक्‍टरला बोलावून आणले. मुलीची स्थिती अतिशय नाजूक आहे. तिचा रक्तदाब खूपच कमी झाला आहे, असे डॉक्‍टरने सांगितल्यावर आरोपी घाबरले आणि त्यांनी तिला तिच्या घरी सोडण्याचे ठरवले. पण त्यांनी तिला बस स्थानकावरच सोडून दिले. एकाने तिच्या घरी आईवडिलांना तुमची मुलगी बस स्थानकावर असल्याचे सांगितले. त्यानंतर ही गोष्ट सगळ्यांना समजली. तपासात लक्षात आले, की मुलगी सीबीएसई परीक्षेत हरियानात प्रथम आलेली आहे. ज्या तीन मुलांनी तिचे अपहरण केले ते तिच्या गावातलेच आहेत बाकीच्यांना ती ओळखत नाही. या तिघांपैकी एकजण लष्करात आहे. 

या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. संबंधित डॉक्‍टर, शेतातील खोली देणारा माणूस आणि प्रमुख तीन आरोपींपैकी एक जण या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘ही घटना फार मोठ्या षडयंत्राचा भाग आहे,’ असे पोलिसांचे म्हणणे आहे. खूप विचार करून याबद्दलचे नियोजन करण्यात आले असल्याचे पोलिस सांगतात. यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली असली तरी अजून दोघे फरार आहेत. त्याबरोबरच इतर कोण कोण लोक या प्रकरणात सहभागी होते, हेही अजून कळलेले नाही. एक आरोपी लष्करात असल्याने पोलिसांनी लष्कराबरोबरही संपर्क साधला आहे. त्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबतीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

असे असले, तरी सुरुवातीला पोलिसांना पीडितेच्या कुटुंबीयांना अजिबात सहकार्य केले नाही. पण प्रसंगातील गांभीर्य पाहून सगळीकडून टीका होऊ लागल्यावर पोलिस जागे झाले. दरम्यान हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तेथील पोलिस प्रमुखाची बदली केली. पीडितेच्या आईवडिलांना दोन लाखाची नुकसान भरपाई दिली. मात्र ते पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला. ‘आमच्या मुलीची किंमत करणारे तुम्ही कोण? आमची मुलगी होती तशी आम्हाला परत करा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 

तपास अजून सुरू आहे. प्रमुख आरोपी ताब्यात आला आहे. त्याच्याकडून त्याच्या इतर दोन साथीदारांचीही माहिती मिळेल. या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी होते, हेही कळेल असा पोलिसांना विश्‍वास आहे. 

पोलिस म्हणतात तसे होईलही, पण मुळात या गोष्टी का होतात याचा विचार व्हायला हवा. त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. एखाद्याचा सूड घ्यायचा असेल, तर अनेकदा त्याच्या घरातील मुलीला - महिलेला त्रास दिला जातो. दुसऱ्यांच्या मुलींची आपल्या मुलांनी केलेली टिंगलटवाळी चालू शकते. पण आपल्या मुलींच्या अब्रूवर शिंतोडे उडालेले चालत नाहीत. आपल्या समाजात ‘स्त्रीची अब्रू’ या प्रकाराला खूप महत्त्व आहे. पण ‘आपली ती अब्रू आणि दुसऱ्याची..?’ या प्रश्‍नाला कोणाकडे उत्तर नाही. त्यामुळे अनेकदा सूड घेण्यासाठी स्त्रीच्या पदराला हात घालताना कोणाला काही वाटत नाही. स्त्री-पावित्र्याचे गोडवे गाणारे अशावेळी सूडाने बेभान होऊन राक्षसी कृत्य करतात. यात दुर्दैवाने महिलाही मागे नाहीत. काही दिवसांपूर्वी उरी भागातील एका चौदा वर्षांच्या मुलाने आपल्या नऊ वर्षांच्या सावत्र बहिणीवर बलात्कार केला. यात त्याच्याबरोबर त्याचे तीन मित्रही होते. हे कृत्य त्याने आपल्या आईच्या सांगण्यावरून तिच्या समोर केले. या महिलेचा आपल्या पतीच्या दुसऱ्या पत्नीवर व तिच्या मुलांवर राग होता. पती दुसऱ्या पत्नीकडे जातो हे तिला आवडत नसे. म्हणून तिने ही योजना आखली. या मुलांनी त्या मुलीवर केवळ बलात्कारच केला असे नाही तर त्यानंतर तिचे डोळे काढले, तिच्या गुप्तांगात ॲसिड ओतले. २३ ऑगस्टपासून गायब असलेल्या या मुलीचा कुजलेला मृतदेह २ सप्टेंबरला जंगलात सापडला आणि सगळा खुलासा झाला. महिला, तिच्या मुलासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी गुन्हा कबूल केला. 

अशा काही घटना ऐकल्या - वाचल्या की अंगावर काटा येतो. इतके क्रौर्य येते कुठून? आणि कशासाठी? त्यातून काय समाधान मिळते? सीबीएसई परीक्षेत पहिली आलेल्या मुलीचे तिच्याच गावातील मुलांनी असे हाल हाल का केले असतील? नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार होताना बघून एका मुलाची आई असलेल्या महिलेला काहीच त्रास झाला नसेल? हे कृत्य करून झाल्यावर काय समाधान मिळाले असेल? समाधान मिळाले असेल का? आपल्या मनातील रागाला, भावनांना अशी वाट करून द्यायची? ही दोनच उदाहरणे नव्हे, अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील? या मुलींचा त्यात काय दोष असतो? समस्या तुमच्या असतात, त्या तुम्ही सोडवाव्यात; या मुलींना का वेठीला धरायचे? उरीची मुलगी तर गेलीच, पण रेवाडीची मुलगी कदाचित बरी होईल. त्यातून बरी होईल. पण मनावरच्या आघातांचे काय? ती परत आपल्यावर विश्‍वास ठेवू शकेल? पण तिने तो ठेवायला हवा, चांगुलपणावर विश्‍वास ठेवायला हवा, यासाठी समाज म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत.

संबंधित बातम्या