‘... देणाऱ्याचे हात घ्यावेत’

ऋता बावडेकर 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

संपादकीय  

हल्ली जिकडे बघावे तिकडे नकारात्मक वातावरण दिसते. खून, मारामाऱ्या, बलात्कार, फसवणूक.. असेच चित्र भोवताली दिसते. जगात खरोखरच इतकी नकारात्मकता भरली आहे? कुठे काही चांगले होतच नाही का? होत असले तरी त्याचा परिणाम का दिसत नाही? ते टिकत का नाही, असे असंख्य प्रश्‍न आपल्यासारख्या विचारी माणसांना पदोपदी पडत असतात. काहीतरी चांगले करावे, समाजावर त्याचा चांगला प्रभाव पडावा, असे आपल्याला मनापासून वाटत असते. पण नेमके काय करावे हे लक्षात येत नाही. आपल्या एकट्याच्या करण्याला काय अर्थ आहे, असे निराशेकडे झुकणारे विचारही मनात येतात. पण असे करता कामा नये. ‘केल्याने होत आहे रे.. ’ असे म्हणून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. एकाला दुसऱ्याने दिलेली साथ असे करता करता एक साखळी निर्माण होते आणि सगळे मिळून काही ठोस काम करता येते. असे काम करण्याची; त्यापेक्षाही एकत्र येण्याची - एक होण्याची आज गरज आहे. यात राजकीय वगैरे काही मुद्दा नाही, तर समाज म्हणून आपण एकसंध राहिलो तर खूप नकारात्मक गोष्टी कमी होतील. चांगल्याचा प्रभाव वाढेल, चांगल्याचा धाक वाढेल; असे होण्याची आज गरज आहे. अन्यथा बघावे तिकडे सगळे निराशेचेच वातावरण दिसते. 

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये दोन वाईट घटना घडल्या. आपल्या पोटच्या मुलींवरच जन्मदात्याने घाव घातला. कारण काय, तर त्यांनी जातीबाहेर जाऊन लग्न केले. मनाविरुद्ध लग्न केले म्हणून एका वडिलांनी एक कोटीची सुपारी देऊन आपल्या जावयाचा खून केला. मुलगी गर्भवती आहे. तिची तपासणी करून ती, नवरा आणि सासूबरोबर घरी निघाली होती, तेव्हा या गुंडांनी तिच्यासमोर तिच्या पतीची हत्या केली. दुसऱ्या घटनेत जन्मदात्याने आपल्या मुलीचे दोन्ही हातच कापून टाकले. दोघींचा गुन्हा (?) एकच; घरच्यांच्या मनाविरुद्ध केलेले लग्न! हा गुन्हा आहे? आज एकविसाव्या शतकात? पण प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या समाजाची ही अशी अधोगतीकडे वाटचाल होत आहे. हिंजवडीजवळ एका ऊसतोडणी कामगाराच्या दोन आठ-दहा वर्षांच्या मुलींवर चॉकलेटचे आमिष दाखवून दोघांनी बलात्कार केला. या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही दिली. पण दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीला त्रास होऊ लागल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला. या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पैकी २२ वर्षांचा युवक साखर कारखान्यात काम करतो, दुसरा मुलगा अल्पवयीन आहे. हे सगळे कशाचे द्योतक आहे? या अशा घटना सतत का होत असतात? सगळे म्हणतात, कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांना कोणी घाबरत नाही, पुढाऱ्यांचे प्रस्थ वाढते आहे.. खरे असेलही; पण याचे मुख्य कारण आहे, समाजाचा कोणावर धाकच राहिलेला नाही. कारण आपल्या डोळ्यासमोर अशा घटना घडतात, त्या बघण्याशिवाय किंवा (अलीकडे) त्याचे व्हिडिओ चित्रण करण्याशिवाय आपण दुसरे काहीही करत नाही. ‘मी काय करू शकतो/ते?’ किंवा ‘मी काय करणार?’ अशी आपली भूमिका असते. 

खरे तर आपल्या हातात खूप काही असते. समोरच्या गुन्हेगारी वृत्तीकडे अत्याधुनिक हत्यारे असतीलही, पण सगळे मिळून चालून येत आहेत म्हटल्यावर त्यालाही भीती वाटणारच. जीव सगळ्यांनाच प्यारा असतो. याचा अर्थ स्वतःच्या प्राणांचे बलिदान द्यावे असे अजिबात नाही, पण ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणण्याची हिंमत ठेवायलाच हवी. अन्यथा आज जे दुसऱ्यांच्या घरात घडते आहे, ते आपल्या घरात घडायला वेळ लागणार नाही. अशावेळी आपण इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवणार, मग आधी कोणी आपल्याकडून मदतीची अपेक्षा केली तर त्याच्या मदतीला जायलाच हवे. किमान तशी तयारी तरी ठेवायला हवी. 

याचा अर्थ केवळ वाईट काही घडले तरच समाजाने एकत्र यायला हवे असे नाही. तर आपण पुढाकार घेऊन समाजासाठी काही चांगले करायला हवे. लोकांना फक्त दिशा हवी असते. त्यांना योग्य वाटले तर ते आपल्याला नक्की साथ देतात. अनेकदा करायचे खूप काही असते, पण काय करायचे हे सुचत नाही. मग इकडे तिकडे वेळ काढला जातो. तरुण, वयस्कर सगळ्यांचीच ही अवस्था असते. मग एकाने काही कल्पना लढवण्याचा अवकाश, त्याला प्रतिसाद मिळू लागतो. याचा अर्थ करणारी माणसे कमी नाहीत, त्यांना फक्त मार्ग दाखवायला हवा. निवृत्तीनंतर काय करावे, वेळ कसा घालवावा हे अनेकांना कळत नाही. त्यांच्या ‘रिकामटेकडेपणा’चा घरच्यांनाही त्रास होऊ लागतो. यावर अनेक जण मार्ग शोधतात. काही घरची कामे करण्याचे ठरवतात. बिले भरणे, किराणा आणणे, नातवंडांना शाळेत-बागेत नेणे-आणणे, घरातील स्वयंपाकाची जबाबदारी घेणे वगैरे. आता यातील बरीच कामे संगणकावर ऑनलाइन होतात, हे बघून अनेकांनी हे तंत्रज्ञानही शिकून घेतले आहे. ही घरगुती कामे झाली. काही जण रुग्णालयात जाऊन रुग्णांना पुस्तके वाचून दाखव, त्यांच्या नातेवाइकांना थोडा वेळ घरी पाठवून रुग्णांजवळ थांबणे, औषधे आणणे वगैरे कामेही करतात. काही तरुण मुले केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा छोटासा उद्योग-व्यवसाय सुरू करून आपल्यासारख्याच इतर दोन-पाच लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात. ‘सकाळ साप्ताहिक’च्या चहा विशेषांकात अशा काही ‘स्टार्ट अप’ करणाऱ्या उद्योजकांचा आम्ही परिचय करून दिला होता. अडल्या नडल्यांसाठी काही लोक स्वयंसेवी संस्था उभ्या करतात. अशी छोटी-मोठी कामे अनेक जण करत असतात. यातलेच एक आपण का असू नये? 

आज आपल्याला कदाचित कल्पना सुचत नसतील, पण जरा डोळे, कान उघडे ठेवून वावरले की आपल्याच आसपास असे अनेक ‘उद्योगी लोक’ आपल्याला दिसतील. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक दिवस आपणही ‘... देणाऱ्याचेच हात घ्यावेत.’ 

संबंधित बातम्या