...आणि ती बोलू लागली!

ऋता बावडेकर  
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

 संपादकीय    

लहान मुले, मुली, महिलांवरील लैंगिक अत्याचार ही गोष्ट अजिबातच नवीन राहिलेली नाही. जवळ जवळ रोज या विषयावरील बातम्या आपण वाचत, पाहात, ऐकत असतो. पण अशा बातम्यांत खंड पडत नाही. काही क्षण हळहळतो, थोड्या वेळाने कामाला लागतो. तरीही मनात कुठेतरी हे प्रकार बंद व्हायला पाहिजेत असे वाटत असते. त्या दृष्टीने दिलासा देणारी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे बाल लैंगिक अत्याचारांबाबत गुन्हा नोंदविण्यासाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा न ठेवण्याच्या सूचना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी कायदा मंत्रालयाला दिल्या आहेत. त्यामुळे दहा-पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचारांबाबतही तक्रार नोंदविणे आता शक्‍य होणार आहे. 

ही गोष्ट खूप दिलासादायक आहे. कारण सध्याच्या कायद्यानुसार बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यास तीन वर्षांच्या आत तक्रार नोंदविणे आवश्‍यक आहे. पण अनेकदा लहानपणी झालेल्या अत्याचारांबद्दल जाहीरपणे सांगण्यास संबंधित व्यक्तीला वयाच्या अठराव्या वर्षांनंतरही अडचणी येतात. हे सगळे लक्षात घेऊन मेनका गांधी यांनी तशी सूचना कायदा मंत्रालयाला केली आहे. तसेच ‘भारतातही #Me Too चळवळ सुरू झाल्याने मला आनंद झाला आहे. लैंगिक अत्याचार अथवा विनयभंग झाला असल्यास महिलांनी त्या विरोधात तक्रार करण्यास पुढे यावे,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

मेनका गांधी यांनी केलेली सूचना, आवाहन आणि आपल्याकडे सध्या सुरू असलेले ‘Me too’चे मेसेजेस या गोष्टी जुळताहेत. दहा वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी चित्रीकरणादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी केला. तेव्हापासून हे प्रकरण शांत होण्याचे नावच घेत नाही. अनेकांनी तिला जाहीर पाठिंबा दिला. काही जण पाटेकरांच्या बाजूने उभे राहिले. दरम्यान पाटेकरांनी तिला नोटीस पाठवली, तिनेही पोलिस ठाण्यात तक्रार दिली.. आता तर महिला आयोगाने नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग तसेच तनुश्रीलाही आपले म्हणणे सांगण्यास सांगितले आहे. पण त्याबरोबरच इतर अनेक महिलाही बोलू लागल्या आहेत. आणि त्या केवळ चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीत तर माध्यमांशी संबंधितसुद्धा आहेत. 

कोणी कोणावर काय आरोप केले, कोणाकोणाची नावे या संदर्भात पुढे आली, काय झाले असा तपशील देण्याचा अजिबात उद्देश नाही. कारण ते फेसबुक, ट्‌विटर अशा समाज माध्यमांवर सतत प्रसिद्ध होत आहे. तसेच यात कोण खरे, कोण खोटे असा न्यायनिवाडा करण्याचाही उद्देश नाही. पण तक्रारी जुन्या का असेना, महिला आता बोलू लागल्या आहेत. असे बोलल्याने स्वतःचीही बदनामी होणार आहे, हे लक्षात येऊनही आता त्या सहन करायला तयार नाहीत, ही गोष्ट खूप आश्‍वासक वाटते. कारण मुख्यतः ‘बदनामी’ एवढ्या एकाच कारणासाठी आतापर्यंत त्यांचे शोषण होत होते, त्या सहन करत होत्या. पण त्या अशा अचानक बोलू लागल्याने, हे सगळे आत्ताच का? इतकी वर्षे त्या काय करत होत्या? तेव्हाच का नाही पोलिसांत गेल्या किंवा तेव्हाच का नाही बोलल्या? वगैरे अनेक प्रश्‍न अनेकांना पडले आणि त्या प्रश्‍नांआडून संबंधित महिलांवर त्यांनी यथेच्छ टीका करून घेतली. अनेकदा या टीकेने अत्यंत खालची पातळी गाठली होती. ती तेव्हाच का बोलली नाही वगैरेंसारख्या सगळ्या प्रश्‍नांना या गलिच्छ टीकेनेच उत्तर दिले आहे. त्यामुळे मेनका गांधी यांनी केलेल्या सूचनेचे विशेष स्वागत करायला हवे. 

अर्थात तेव्हा का नाही बोलली, हे का नाही केले, ते का नाही केले वगैरे प्रश्‍नांना काही उत्तरे नसतात. एक तर तेव्हा ती वयाने लहान होती. कदाचित तिच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, आणखी काही कारणे असतील.. तिचे तिला माहिती; पण आज ती बोलते आहे ना! त्यावर आपण का बोलत नाही? तिच्याबरोबर तेव्हा जे झाले ते केवळ ती इतक्‍या वर्षांनी बोलली म्हणून क्षम्य ठरते का? त्याबद्दल फार कोणी बोलायलाच तयार नाही. प्रत्येकाचे एकच म्हणणे, तिला परत चित्रपटांत यायचे असेल, प्रसिद्धी हवी असेल वगैरे.. असल्या शेरेबाजीतून आपण फक्त आपला स्वतःचा दर्जा - स्वतःची लायकी दाखवत असतो आणि तिच्यावर कशी टीका केली याचे फसवे समाधान मिळवत असतो. 

या सगळ्या प्रकारांत आणखी एक चांगली गोष्ट झाली म्हणजे, महिला कधी एकत्र येत नाहीत, या समजाला तडा गेला. कारण या प्रत्येकीला काहींनी उघडपणे, काहींनी मूकपणे पाठिंबा दिला. केवळ त्यांच्या क्षेत्रांतीलच नव्हे, वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिला यांत होत्या - आहेत. त्यालाही हिंमत लागते. ती महिलांनी दाखवली. 

आज माध्यमे - समाज माध्यमे अतिशय प्रभावी झाली आहेत. हीच गोष्ट दहा वर्षांपूर्वी बोलली गेली असती, तर त्यावर इतकी चर्चा झाली नसती. कारण तनुश्रीने तेव्हाही रीतसर तक्रार केली होती. पण त्याची दखलही घेतली गेली नाही. आज समाज माध्यमांमुळे किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली. टीका करण्यासाठी का होईना, या प्रकरणाची दखल सगळ्यांना घ्यावी लागली. त्यावेळी अन्याय सहन केला म्हणून आजही गप्प बसायचे, हे या महिलांनी नाकारले. ‘आत्ताच का?’ या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून जवळ जवळ रोज कोणीतरी व्यक्त होत आहे. या महिलांना याचा काय उपयोग होईल यापेक्षा पुढील पिढीला याचा नक्कीच उपयोग होणार आहे. मुलींबरोबर वागताना नक्कीच चार वेळा विचार करावा लागणार आहे. कारण अपराधाला कधी तरी वाचा फुटतेच, हे यातून सिद्ध झालेले आहे. 

याचा अर्थ प्रत्येक पुरुष वाईटच असतो असे नाही. पण चांगल्या पुरुषांची संख्या आणखी वाढायला हवी. स्त्रीने चांगले वागायला हवे अशी अपेक्षा पुरातन काळापासून केली जाते, आज पुरुषांनीही चांगले वागण्याची गरज वाढली आहे. स्त्री पुरुष हे कोणी परस्परांचे वैरी नव्हेत, पण कोणी कोणाचा फायदा घेण्यापेक्षा हे नाते निकोप असायला हवे. तरच समाजस्वास्थ्य टिकू शकेल.   

संबंधित बातम्या