माणसे अशी का वागतात? 

ऋता बावडेकर
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

संपादकीय
 

एकत्र कुटुंब पद्धती मागे पडून आता बराच काळ लोटला आहे. विभक्त कुटुंबांची संख्या वाढत असली, तरी एकत्र कुटुंब व्यवस्था अगदीच अडगळीत गेलेली नाही. प्रमाण कमी झाले आहे, इतकेच! अर्थात अशा सगळ्याच कुटुंबात सगळेच सुरळीत आहे असे नाही. काही ठिकाणी तर न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागत आहे. वयस्कर सासू-सासऱ्यांना त्रास देऊ नको आणि ताबडतोब घरातून बाहेर पड, असा आदेश उच्च न्यायालयाने नुकताच एका सुनेला दिला आहे. 

बांद्रा येथे हे वयस्कर जोडपे मुलगा, सून व त्यांच्या मुलांबरोबर राहात होते. पण नंतर कुरबुरी वाढायला लागल्या. ज्येष्ठ जोडप्याला हा त्रास सहन होईना म्हणून ते काही दिवसांपूर्वी न्यायालयात गेले. त्यावेळी न्यायालयाने मुलाला - त्याच्या कुटुंबासह घरातून बाहेर पडायला सांगितले. त्यानुसार मुलगा घरातून बाहेर पडला. त्याने मालाडला घर घेऊन तो तिथे राहू लागला. पण त्याची पत्नी आपल्या मुलीसह त्याच घरात राहिली. त्या दोघींनी घरातील दोन खोल्या बळकावल्या. तसेच या दोघांना सून सतत त्रास देत असे. त्यांचा अपमान करत असे. त्यांच्याबद्दल, विशेषतः सासऱ्यांबद्दल तिने विनयभंगाच्या तक्रारीही केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी सासऱ्यांची चौकशीही केली होती. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. पण सुनेचा त्रास वाढतच गेला. तो असह्य होऊन या जोडप्याने पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. याही वेळी निकाल त्यांच्याच बाजूने लागला. यावेळी न्यायमूर्तींनी सुनेला खडे बोल सुनावले आणि महिनाभरात घर सोडण्याचे आदेश दिले. ‘या वयात या जोडप्याने सुनेचा इतका त्रास सहन करण्याचे काहीच कारण नाही,’ असा शेरा न्यायमूर्तींनी निकाल देतेवेळी मारला. तसेच ‘या महिलेने सासऱ्यांविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी थेट पोलिसांत केल्या होत्या. सासरे जर इतके वाईट असतील तर त्यांच्याच घरात राहण्याचा तिचा अट्टहास का? तिने या घरातून महिनाभरात बाहेर पडावे. वयस्कर सासू-सासऱ्यांच्या त्रासाकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांनी या वयात हा शारीरिक, मानसिक अत्याचार सहन करण्याचे काहीच कारण नाही,’ असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

अशी उदाहरणे आता नवीन राहिलेली नाहीत. काही लोक पुढे येऊन तक्रार करतात, काही ‘नशिबाचे भोग’ म्हणून गुपचूप सहन करत राहतात. एकतर वयाप्रमाणे माणूस नाही म्हटले तरी अगतिक झालेला असतो. दुसऱ्यावरचे त्याचे अवलंबित्व वाढलेले असते. सगळी गात्रे शिथिल होऊ लागलेली असतात. सोबतीची गरज वाटत असते... अशा वेळी घरातल्यांची साथ खूप मोलाची असते. ती मिळाली तर फारच चांगले, पण दुर्दैवाने नाही मिळाली, तर या ज्येष्ठांचे प्रचंड हाल होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. ते जोपर्यंत मदतीला येत असतात, तोपर्यंतही परिस्थिती ठीक असते, पण कामात मदत होईनाशी होते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, त्यांना घालून पाडून बोल, प्रसंगी मारहाणही होते. ही ज्येष्ठ मंडळी पैसा राखून असतील तर त्यातल्या त्यात ठीक; अन्यथा त्यांचे काय हाल होत असतील हे तेच जाणे. अर्थात अपवादही असतातच. पण वाईट उदाहरणे जास्त असतात. 

यात दोष कोणाचा? वय वाढले, गात्रे साथ देईनाशी झाली, पैसे बाळगता नाही आले; म्हणून ज्येष्ठांचा? की आपल्या वयस्कर आईवडील, सासूसासऱ्यांकडे आपल्याला संवेदनशीलपणे बघता येत नाही म्हणून त्यांच्या मुला-सुनांचा? अनेकदा परिस्थितीला दोष दिला जातो. काही प्रमाणात ते खरे असेलही पण आपल्याच जन्मदात्यांबरोबर परिस्थिती कशी वाईट वागायला भाग पाडेल? आपण जेव्हा लहान असतो तेव्हा बरेचदा आपले पालक प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवतात; मग त्यांच्या वेळेला आपण आपला हात का आखडता घेतो? त्यांचे आयुष्य संपत आले असते म्हणून ते इतके निरुपयोगी होतात? त्यांच्यानंतर त्यांचे घर, पैसे, जमिनी वगैरे सगळे आपलेच होणार असते. पण ते मिळवण्याची इतकी घाई का? अनेक ठिकाणी त्यासाठी वयस्कर मंडळींचा छळ होत असल्याची उदाहरणेही आपल्याला माहिती आहेत. स्वतःच्याच घरांतून आईला बाहेर काढणारी मुलाही या समाजात आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करून त्यांनी पै न पै जमवून छोटेसे घर उभारलेले असते. त्यांच्यानंतर ते तुमचेच असते, पण ते बळकावण्याची इतकी घाई काय? आणि तसे केल्याचे निष्पन्न काय? तर तुरुंगवास. मग इतक्‍या टोकाला जायचे कशाला? 

या मुलांचीही (यात मुलीही आहेत) काही बाजू असू शकेल, पण आपल्याच पालकांना छळण्यात काय बाजू असू शकेल, समजत नाही. त्यांच्या तरुणपणी समजा हे पालक मुलांबरोबर चांगले वागले नसतील; असे होऊ शकते. पण म्हणून सूड घेतल्यासारखे आपण त्यांच्याबरोबर वागायचे? मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? त्यांना दूषणे देण्याचा अधिकार आपण त्याच क्षणी गमावलेला असतो. आपण पालकांबरोबर जसे वागतो, ते आपली मुला बघत असतात.. पुढे तेही आपल्या म्हातारपणात असेच वागले तर आपण त्यांना कसे दोष देणार? हे सूडचक्र असेच सुरू राहते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. सगळ्यांनी सगळ्यांबरोबर गोडीगुलाबीने वागावे. भांडणतंटा करू नये. एकमेकांचा दुस्वास करू नये.. वगैरे गोष्टी बोलायला सोप्या असतात. प्रत्यक्षात तसे काही होत नाही, कारण आपण माणसे आहोत. पण म्हणूनच आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. माणूस म्हणून आपल्याला एक देणगी मिळाली आहे - विचार करण्याची. मग आपण समजुतीने का वागत नाही? सगळ्यांनाच ताण असतात, मान्य; पण इथेच विचार करण्याची शक्ती वापरायची असते. परिस्थिती सुसह्य होऊ शकते, हो ना?

संबंधित बातम्या