नसे अंत ना पार...? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

संपादकीय
 

या  जगात प्रत्येक गोष्टीला अंत आहे. जन्माला - अस्तित्वात आलेली प्रत्येक वस्तू-गोष्ट कधी ना कधी नष्ट होणार आहे; संपणार आहे. पण महिलांवरील अत्याचार, अन्याय कधी तरी थांबणार आहेत का, असा प्रश्‍न गेल्या महिनाभरातील घटना बघितल्या की वाटते.. आणि महिनाभरातीलच का? या घटना तर सतत सुरू आहेत. थांबायचे नावच घेत नाहीत. या गोष्टी थांबणे खरेच इतके अवघड आहे का? 

ठरवले तर काहीच अशक्‍य नसते, पण याबाबतीत तसे होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. महिला या ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात, हे याचे सगळ्यात मुख्य कारण असावे असे वाटते. तसेच त्या संघटित नसतात. एकीला कोणी बोलायला लागले तर तिची बाजू घ्यायला दुसरी येईलच असे नाही. उलट तिला नावे ठेवण्यात तीही सहभाग घेते. यामुळे ‘स्त्री हीच स्त्रीची मोठी शत्रू असते’ असे म्हणायला समाज तयारच असतो. त्यात समाजाचीही काही चूक असते असे नाही. आपल्या वागण्यातून स्त्रीच हे सिद्ध करत असते. खूप कमी स्त्रिया असतात, दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या मागे ठामपणे उभे राहताना दिसतात. मागच्या काही महिन्यांतील ‘#MeToo’ ही चळवळ हे त्यासंदर्भातील महत्त्वाचे उदाहरण ठरावे. 

तनुश्री दत्ताने दहा वर्षांपूर्वी स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि ‘#MeToo’ या मोहिमेने भारतात वेग घेतला. तिच्यापाठोपाठ चित्रसृष्टीतील अनेक नव्या-जुन्या तारका, तंत्रज्ञ आदी महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता केली. ही मोहीम केवळ चित्रसृष्टीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्था, माध्यमे अशी ती विस्तारत गेली. नाना पाटेकर, साजिद खान यांना महिला आयोगाने नोटिसा बजावल्या. दिग्दर्शकांवर अश्‍लील वर्तनाचे आरोप झाले म्हणून आमिर खान, अक्षयकुमार यांनी त्यांच्या चित्रपटांत काम करणे नाकारले. मंत्री एम. जे. अकबर यांना राजीनामा द्यावा लागला. 

वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येक महिलेला अशा प्रकारे अवमानित व्हावे लागलेले असते, हे या महिलांना पाठिंबा मिळण्याचे मुख्य कारण असावे. केवळ अधिकारावरील व्यक्तीच अधिकाराचा गैरवापर करते असे नाही, तर रस्त्याने चालणारा कोणीही ऐरागैरा मुली-महिलांना त्रास देताना आढळतो. त्याचा त्रास इतका टोकाचा नसेल, पण धक्का लागल्याचे भासव, पैसे परत देताना हाताला स्पर्श कर, बसमध्ये प्रवासात इथे तिथे हात लाव... असले प्रकार एकाही महिलेला नवीन नाहीत. काही आवाज उठवतात, काही निमूट सहन करतात. असे असले, तरी या मोहिमेला काहींनी विरोध केलाच, पण सुदैवाने तो आवाज क्षीण होता. किरकोळ अपवाद वगळता महिलांची अभिनव एकजूट या वेळी दिसली. अगदी पुरुषांनीही या मोहिमेला प्रतिसाद दिला. 

केरळमधील अय्यपा मंदिरात दर्शनासाठी महिलांना प्रवेश द्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तोपर्यंत मासिक पाळी येणाऱ्या महिला-मुलींना मंदिरात प्रवेश दिला जात नसे. पण सर्वोच्च न्यायालयानेच सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असा निर्णय दिला. त्यानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले तेव्हा महिलांनी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अडविण्यात आले. त्यावरून बराच गोंधळ झाला. या संदर्भात वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. या प्रश्‍नाला त्यांनी दिलेले उत्तर अतिशय चीड आणणारे होते. त्या म्हणाल्या, ‘पाळीचे पॅड्‌स घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का? मग मंदिरात कशा जाऊ शकता? त्या अवस्थेत मंदिरात जाऊ नये असे कोणाला वाटत असेल तर हा हट्ट कशासाठी?’ एकविसाव्या शतकात एका मंत्र्याचे इतके बुरसटलेले विचार असावेत? मुळात पाळी आलेली असताना स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये हे कोणी आणि का ठरवले? त्याला काही शास्त्रीय आधार आहे का? वास्तविक, ही पाळी स्त्रीची मोठी शक्ती असते. एक जीव जन्माला घालण्याची, या जगात आणण्याची ताकद यामुळे तिला मिळालेली असते. असे असताना पाळीला निषिद्ध कसे मानता येईल? ही बुरसटलेली विचारसरणी आली कुठून आणि ती आपण एकविसाव्या शतकापर्यंत का पाळत आहोत? मंत्रीणबाईपण त्याचे समर्थन करताहेत की काय? तसे असेल तर पाळी असताना स्त्रियांना कुठेच जाता येणार नाही. बाहेरच पडता येणार नाही. हेच अंतिमतः अपेक्षित आहे का? पण असे कोणाला वाटले म्हणून होते थोडेच! या वक्तव्यालाही महिलांनी कडाडून विरोध केला. दुर्दैवाने क्षीण का असेना विरोधी सूर उमटलाच. पण यापुढे कोणीही असे वक्तव्य केले, अशा काही घटना घडल्या तर असा क्षीण विरोधही होता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. 

एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, की स्त्री विरुद्ध पुरुष अशी ही लढाई नाही. तर एका मानसिकतेविरुद्धचा हा लढा आहे. त्याला स्त्रियांप्रमाणेच अनेक पुरुषांचाही पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याबरोबरही लढाई करावी, त्यांना हरवावे असे एकाही विचारी स्त्री किंवा पुरुषाला वाटत नाही - वाटणार नाही. कारण ही हारजीत काही काळापुरतीच असते. त्याला काही अर्थ नसतो, हे त्यांना माहिती आहे. विरोध करणाऱ्याचे - मग ती स्त्री असो वा पुरुष - मन बदलता आले, विचार बदलता आले तरच काही फायदा असतो. त्यामुळे यापुढे असे प्रयत्न करावे लागणार आहेत. 
अर्थात वर्षानुवर्षांची ही मानसिकता बदलणे तेवढे सोपे नाही. इथे ‘इगो - अहं’शी सामना असतो आणि तो सगळ्यात अवघड असतो. कारण कित्येकदा समोरच्याचे विचार पटत असून हा ‘अहं’ ते विचार पटवून घेत नसतो. इतकी वर्षे गोंजारलेला ‘अहं’ असा कसा सोडून द्यायचा? लोक काय म्हणतील? असे प्रश्‍न आड येत असतात. अर्थातच एखादी गोष्ट अवघड असली तरी अशक्‍य नसते. कधी तरी यश येईल या अपेक्षेने प्रयत्न करत राहिले पाहिजेत.

संबंधित बातम्या