एवढा अट्टहास कशासाठी? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

संपादकीय
 

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दोन-तीन महत्त्वपूर्ण निर्णय दिले. शबरीमला देवालयात यापुढे महिला दर्शनासाठी जाऊ शकतील, हा निर्णय त्यापैकी एक होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही. कारण देवस्थान, तेथील पुजारी आणि असंख्य भक्तांचाच त्याला विरोध आहे. या विरोधाविरुद्ध आंदोलनेही सुरू आहेत, पण अजूनतरी त्यात यश आलेले नाही. 

केरळमधील शबरीमला येथील अय्यपा मंदिरात महिलांना - विशेषतः १५ ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी होती. अय्यपा ब्रह्मचारी असल्यामुळे मासिक पाळी येत असलेल्या महिलांना त्याच्या दर्शनासाठी बंदी होती. या संदर्भात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली व सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाचा मार्ग खुला करून दिला. हा अतिशय स्वागतार्ह निर्णय म्हणायला हवा. मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. कारण या निर्णयाला देवस्थान, तेथील पुजारी, भक्तगण (यात महिलाही आहेत) यांचा प्रचंड विरोध आहे. आपल्या परंपरा कशा तोडता येतील? असा त्यांचा प्रश्‍न आहे. पण अशा प्रश्‍नामुळे या परंपरा कोणी निर्माण केल्या? महिलांना प्रवेशबंदी हा निर्णय कोणी घेतला? त्याला आधार काय? असे असंख्य प्रश्‍न उपस्थित होतात. मुळात मासिक पाळीमुळे विटाळ होतो - तोही देवाला - हे कोणी ठरवले? ज्या मासिक पाळीमुळे नवीन जीव जन्माला घालण्याची ताकद स्त्रीला मिळाली आहे, ती मासिक पाळी वाईट कशी असू शकेल? थोडे स्पष्ट बोलायचे तर स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणारेही या मासिक पाळीमुळेच या जगात आलेले आहेत. तसे नसते तर ते जन्मालाच येऊ शकले नसते. एवढी मूलभूत गोष्टही आपण विसरतो आणि परंपरा परंपरा करत बसतो. या परंपरा तरी कोणी तयार केल्या? आपण माणसांनीच त्या तयार केल्यात. मग आपणच निर्माण केलेल्या परंपरांना थोडी मुरड घालायला काय हरकत आहे? मुळात या परंपरा - त्यांचे जोखड हवेच कशाला? त्याशिवायही माणसे शिस्तीत वागतात की! उगीच कोणाचे प्रस्थ कशासाठी वाढवायचे? पण असे प्रस्थ वाढविल्याशिवाय काहींना चैन पडत नाही, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे माणसे आपले महत्त्व वाढवण्याच्या सतत प्रयत्नांत असतात. त्याला कोणी आव्हान दिले किंवा कोणी आडवे आले तर चिडतात. विरोधकांना वाटेल ते बोलतात... आणि महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यात संपूर्ण समाजालाच आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतात. हे धोकादायक आहे. कारण त्यामुळे समाजच मागे जाण्याची शक्‍यता असते. 

याचा अर्थ कोणी विरोधच करायचा नाही असे नाही. विरोध करायला काही हरकत नसते, पण तो नेमका कशासाठी हे सांगता आले पाहिजे. नुसते प्रथा-परंपरा असे सांगून आजच्या काळात भागणार नाही. तसे केले तर वर उल्लेखिलेले प्रश्‍न लगेच येतील. यासाठीच विचारी समाजाची आज अतिशय गरज आहे. अमका म्हणतो म्हणून तेच बरोबर इतका आंधळा विश्‍वास काही कामाचा नाही. तर केवळ विरोधाला विरोध म्हणून नव्हे, तर प्रत्येक गोष्टीला काही कारणमीमांसा असते. ती योग्य असली आणि पटली तर एखादी गोष्ट स्वीकारायलाही हरकत नसते. अर्थात कोणती गोष्ट ‘योग्य’ आणि कोणती ‘अयोग्य’ हे कोण ठरवणार, असा प्रश्‍न येऊच शकतो. कारण हे सापेक्ष आहे. एखाद्याला योग्य वाटलेला निर्णय दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतो. मात्र ही गोष्ट सापेक्ष असली तरी ही योग्य - अयोग्यता स्वतःबाबतीत आहेच; पण समाजासाठीही किती उपयुक्त आहे - असू शकेल असा निर्णय योग्य-अयोग्य ठरवताना घ्यावा लागतो. कारण त्याचा परिणाम अनेकांवर - पुढील पिढ्यांवर होणार असतो. त्यामुळे प्रथा-परंपरा म्हटले तरी त्याबद्दल स्पष्टता हवी. मोघमपणा नको. तो कोणाच्याच फायद्याचा नसतो.  

येथील पुरुषांप्रमाणे कोठेही जाण्याचा, मनाप्रमाणे जगण्याचा येथील स्त्रीलाही अधिकार आहे. कोणावरही बंधने आली किंवा आणली तर त्याविरुद्ध ‘बंड’ ही प्रतिक्रिया येऊ शकते. तशी शबरीमला मंदिर प्रवेश नाकारल्यामुळे आली. अनेक महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनपर्यंत तरी कोणी प्रवेश करू शकलेले नाही. एखाद्या ठिकाणी नाही गेल्याने आपले काही नुकसान होते का? तिथेच कशाला जायला हवे? जागेवरून केलेला नमस्कारही देवापर्यंत पोचतो... अशा अनेक तऱ्हेच्या प्रतिक्रिया याबाबत आल्या. त्यात तथ्य असेलही; नव्हे आहेच. कारण सुखाचा जीव अशा आंदोलनांमुळे दुःखात का घालायचा? का त्रास सहन करायचा? मंदिर प्रवेशामुळे संबंधित महिलेला काय मिळणार आहे? असे प्रश्‍न येतात. पण त्याला अर्थ नसतो. ‘माझा अधिकार नाकारणारे तुम्ही कोण?’ हा प्रश्‍न वरचढ ठरतो आणि महिला आपला सुखाचा जीव दुःखात घालतात. यात अनेकदा अभिनिवेश असेलही पण सगळ्याच महिला तशा नसतात. प्रामाणिकपणे आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे. या संदर्भात त्यांचे प्रश्‍न असतात - महिलांनाच - त्यातही मासिक पाळी येत असलेल्या महिलांनाच प्रवेश बंदी का? हा प्रश्‍न येतोच. कोठेही जाण्याचा महिलांना अधिकार आहेच. अशावेळी न पटणाऱ्या कारणावरून त्यांना प्रवेश का नाकारायचा? आणि नाकारणाऱ्यांची योग्यता काय? कोणत्या अधिकारात ते हा प्रवेश नाकारतात? यापैकी एकाही प्रश्‍नाला समाधानकारक उत्तर अजून तरी कोणी देऊ शकलेले नाही. कारण तसे उत्तरच कोणाकडे नाही. त्यामुळेच हा विरोध होतच राहणार. 

खरे तर महिला कोणा पुरुषाविरुद्ध लढत नाहीत. हा स्त्री-पुरुष असा लढाच नाही. असलाच तर समान हक्कांसाठी स्त्री अजूनही या व्यवस्थेविरुद्ध देत असलेला हा लढा आहे. तिला कुठल्याही पुरुषावर कुरघोडी करायची नाही, कोणाला मान खाली घालायला लावायची नाही. तर तिचे हक्क तिला मिळवायचे आहेत तिला समाजात ताठ मानेने जगायचे आहे. यात तिला पुरुषाची साथ मिळाली तर तिच्यासाठी हे सगळे प्रयत्न खूप सोपे होणार आहेत हे समजून घ्यायला हवे. प्रथा-परंपरांच्या बेड्या तिच्या आणि समाजाच्याही पायात अडकवण्याचा अट्टहास कशासाठी?

संबंधित बातम्या