समानतेचा लढा.. असाही! 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

संपादकीय
 

हल्ली कधी कोणाच्या डोक्‍यातून काय कल्पना येईल सांगता येत नाही. ही कल्पना इतकी भन्नाट असते की त्याचे लोण जगभर पसरते. कोणाला ही कल्पना म्हणजे एखादे फॅड वाटेल, कोणाला ती चमत्कृतीपूर्ण वाटेल, तर कोणाला हा सगळा वेडगळपणा वाटेल. पण अनेकांवर या कल्पनेचा प्रभाव पडतो आणि ते तसे व्यक्त होतात. अमेरिकेत सध्या ‘#SquatForChange’ या मोहिमेला असाच सर्व स्तरांतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काय आहे ही मोहीम? 

लहान मुलांना सांभाळणे ही सोपी गोष्ट नसते. त्यांचे संगोपन हा तर वेगळा आणि फार महत्त्वाचा विषय आहे. पण एरवी या मुलांना रोजच्या रोज नुसते सांभाळणे ही गोष्टही मोठी जिकिरीची असते. त्यांचे खाणे-पिणे, झोपणे, उठणे, अंघोळ, खेळणे, रडणे, आजार, शी-शू... या सगळ्या गोष्टी अनेकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणाऱ्या असतात. मात्र, अजूनही केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात - अगदी अमेरिकेतही मुलांना वाढवणे, त्यांचे हवे-नको बघणे हे काम प्रामुख्याने आईचेच आहे. पण ही सगळी जबाबदारी फक्त आईची नसून बाळाच्या वडिलांचीही असते - आहे, ही जाणीव सर्वांमध्ये निर्माण व्हावी म्हणून अमेरिकेत एक मोहीम सध्या राबविली जात आहे. डॉन्टे पल्मर यांनी सुरू केलेल्या ‘#SquatForChange’ या मोहिमेला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बत्तीस वर्षांच्या डॉन्टे आणि त्यांच्या पत्नी लेईशा यांना एक वर्षांचा मुलगा आहे. एका शनिवारी डॉन्टे आपल्या कुटुंबीयांबरोबर जेवायला बाहेर गेले होते. आपल्या मुलाचे डायपर ओले झाल्याचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले. डायपर बदलण्यासाठी लेईशा जाऊ लागताच मुलाला घेऊन डॉन्टे तेथील स्वच्छतागृहात गेले. तेथे मुलाला मांडीवर घेऊन त्यांनी डायपर बदलले. ‘महिलांच्या स्वच्छतागृहात बाळांचे कपडे, डायपर बदलण्याची व्यवस्था असते, तशी व्यवस्था पुरुषांच्या स्वच्छतागृहातही असावी,’ अशी डॉन्टे यांची मागणी आहे. बाळाचे संगोपन ही आई-वडील दोघांचीही जबाबदारी आहे. ती दोघांनीही पार पाडावी, यासाठी पूर्वीपासून प्रयत्न होत आहेत. अजूनही हे प्रयत्न सुरू आहेत. बाळांचे हवे-नको बघताना ‘डायपर बदलणे’ हे काम बाबालोकांना सगळ्यात जिकिरीचे वाटते. पण म्हणून असे जिकिरीचे काम केवळ ‘आईनेच का करावे?’ असा डॉन्टे यांचा प्रश्‍न आहे. त्यातून ही मोहीम सुरू झाली. 

या मोहिमेला केवळ अमेरिकेतूनच नव्हे, तर जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. मुलांचे वडील आपल्या मुलांना मांडीवर घेऊन मुलांचे डायपर बदलत असल्याची छायाचित्रे अमेरिकेबरोबरच भारत, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देशांतून डॉन्टे यांना येत आहेत. अपंग मुले, आजारी मुले, अवखळ मुले यांची डायपर्स बदलणे किती कठीण असते हे सोबतच्या छायाचित्रांत दिसतेच, पण आपल्यापैकी अनेकांचा तो अनुभवही असेल. सोबतचे छायाचित्र डॉन्टे यांनी इन्स्टाग्रामवर टाकले आणि ‘#SquatForChange’ सोशल मीडियावर लोकप्रिय ठरले. या मोहिमेसाठी डॉन्टे यांनी ‘#SquatForChange.com’ ही वेबसाइट सुरू केली. ‘अधिकाधिक पालकांनी समानतेच्या या नव्या लढ्याला पाठिंबा द्यावा,’ असे आवाहन डॉन्टे यांनी केले आहे. 

समानतेचा हा अनोखा लढा म्हणायला हवा. खरे तर याला ‘लढा’ न म्हणता ‘प्रयत्न’च म्हणायला हवे. कारण यात कोणीच कोणाच्या विरोधात नाही. बाळाचे डायपर बदलणे, हे केवळ आईचे काम नाही, हे बहुतांश लोकांना मान्यच आहे. पण याबद्दल जाणीव नव्हती म्हणा, हे आपले कामच नाही असे गृहीत धरले गेले म्हणा.. कारण काहीही असो याकडे दुर्लक्ष झाले हे खरे. आता डॉन्टे यांनी जाणीव करून दिल्यावर अनेकांनी आपली जबाबदारी मान्य केल्याचे डॉन्टे यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसते आहे. अर्थात हा प्रतिसाद म्हणजे सर्व काही आलबेल किंवा सर्व प्रयत्नांना आलेले यश असे म्हणणे घाईचे होईल. पण किमान सुरुवात तर झाली, असे मानायला हरकत नाही. मात्र ही मोहीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला हवी, तिचे महत्त्व सगळ्यांना कळायला हवे, त्याप्रमाणे ‘बाबा-लोकां’नी आणि त्यांच्या आसपासच्या लोकांनी वागायला हवे. तर या प्रयत्नांना थोडेफार यश मिळाले असे म्हणता येईल. कारण अनेकदा विशेषतः आपल्याकडे ही ‘असली’ कामे अजूनही ‘बायकी’ समजली जातात. कोणी पुरुष स्वयंपाक किंवा ही कामे करू लागला तर अजूनही त्याला हिणवले जाते. ‘बायकोचा गुलाम’ म्हणून चिडवले जाते. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही घरकामात केवळ बायकोलाच नव्हे, आई-बहिणीलाही मदत करत नाहीत. हे चित्र बदलायला हवे. कोणतेही काम लहान-मोठे नसते किंवा फक्त स्त्री किंवा फक्त पुरुषाचे नसते. ते मिळून केले तर पटकनही होते आणि कामाचा ताणही जाणवत नाही. हसत खेळत होऊन जाते. 

प्रश्‍न फक्त असा पडतो, की असे सगळे आपल्याला अमेरिकेनेच का सांगावे लागते? ते करतील ते योग्य, असे का? खरे तर आपले आपल्यालाच हे कळायला हवे. कारण आई, बहीण, बायको इतर नाती आपली असतात. त्यांची काळजी आपणच आपणहोऊन घ्यायला हवी. ही नाती आपणच जपायला हवीत. कोणी सांगेपर्यंत का वाट बघावी? 

संबंधित बातम्या