जड झाले ओझे... 

ऋता बावडेकर
शनिवार, 8 डिसेंबर 2018

संपादकीय
 

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो. दर काही दिवसांनी हा मुद्दा चर्चेत येत असतो. आताही काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन आणि पहिली-दुसरीतील मुलांचा गृहपाठ यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काही सूचना केल्या आहेत. न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी यावर टिप्पणी केली होती. 

दप्तराचे ओझे आणि गृहपाठाचा बडगा यामुळे विद्यार्थी अगदी मेटाकुटीला येतात. केंद्र सरकारने त्यांना दिलासा देण्याचे ठरवलेले दिसते. त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दप्तरांचे वजन, विविध विषयांचे अध्यापन आणि गृहपाठ याबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक संस्थांनी इयत्ता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये, अशी स्पष्ट सूचना केंद्राच्या आदेशात देण्यात आली आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे कमाल वजन ठरवण्यात आले आहे. त्यानुसार पहिली व दुसरीसाठी दप्तराचे वजन दीड किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (एनसीईआरटीने दिलेली वजनाची मर्यादा आणि दप्तराचे प्रत्यक्ष वजन याबाबत एक तक्ता वर दिला आहे. त्यावरून विसंगती लक्षात यावी.) 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) निर्धारित केल्यानुसार शाळांनी पहिली व दुसरीसाठी भाषा व गणिताशिवाय अन्य विषय शिकवू नयेत. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांना भाषा, ईव्हीएस (एनव्हायर्नमेंट स्टडीज) आणि गणिताशिवाय अन्य विषय शिकवू नयेत. त्याचप्रमाणे  विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुस्तके, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य आणण्याची सक्ती करू नये, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. 

 मात्र, शैक्षणिक संस्था मनावर घेत नाहीत त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचे ओझे कायमच आहे, असे या संदर्भात ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळले आहे. याबाबत नेमक्‍या काय उपाययोजना कराव्यात हेच या शिक्षण संस्थांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे पालकही मेटाकुटीला आले आहेत. ही पाहणी प्राथमिक स्वरूपात होती. त्यामध्ये दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासण्यात आले. हे वजन कमी करण्यासाठी शाळांनी वेळापत्रकात बदल केले. पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या. शाळा आणि घरी असे पुस्तकांचे दोन संच घेण्यात आले, पुस्तके ठेवण्यासाठी शाळांत लॉकरसारख्या सुविधा पुरवण्यात आल्या, मुलांनी फक्त दोन ते तीन वह्या घेऊन याव्यात असे सांगण्यात आले, तरीही अजूनही ओझे कमी झालेले दिसत नाही. शाळांत होणाऱ्या बैठकांमध्ये या वजनासंदर्भात सूचना केल्या जातात, पण पालक त्याकडे फार गांभीर्याने पाहात नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

तसेच, न्यायालय आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात येऊ न शकल्याने आतापर्यंत सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. शिक्षण विभागाने राज्यातील २३ हजार ४४३ शाळांमधील सुमारे चार लाख १७ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. त्यात मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशीम, लातूर, जालना, हिंगोली या १५ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर मानकाप्रमाणे दप्तराचे वजन असल्याचे पाहणीत आढळले. म्हणजे उर्वरित जिल्ह्यांत विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा अतिरिक्त बोजा असल्याचे शिक्षण विभागानेच मान्य केले आहे. 

न्यायालय काय किंवा सरकार काय, अशा प्रकारच्या सूचना करते तेव्हा विद्यार्थ्यांना हे ‘ओझे’ झेपणारे असावे, एवढाच त्यामागचा उद्देश असतो. अलीकडे स्पर्धा खूप वाढली आहे, त्याबरोबर अभ्यासही वाढला आहे. तेव्हा किमान दप्तराचे ओझे तरी कमी किंवा योग्य असावे अशी अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. वास्तविक, अभ्यासाखेरीजही या विद्यार्थ्यांना आयुष्य असावे अशीही सूचना करायला हवी. या अभ्यासाच्या ताणात अनेक मुले खेळणेच विसरली आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यांना थोडा मोकळा वेळ द्यायला हवा. शाळा-क्‍लासेसच्या शिक्षकांनीही सहानुभूतिपूर्वक विचार करायला हवा. आपले मूल हसणे-खेळणेच विसरले आहे ही भावना फार त्रासदायक असते. पण लाटेबरोबर वाहात जाण्यापेक्षा प्रत्येकाने वेगळा विचार करून मुलांना वाढवायला हवे. आज सरकार दप्तराचे ओझे कमी करू पाहते आहे, उद्या कदाचित या हसण्या-खेळण्यावरही मार्ग काढेल.. पण प्रत्येकवेळी सरकारनेच का पुढाकार घ्यावा? आपणही आपल्या पातळीवर प्रयत्न करायला काय हरकत आहे?  

संबंधित बातम्या