नोकरदार आई नको!

ऋता बावडेकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

संपादकीय

अलीकडे अशा काही घटना घडू लागल्या आहेत, की हे खरेच एकविसावे शतक आहे ना अशी शंका येते. कारण आता आपण फक्त प्रगती आणि प्रगतीच करायची हे सांगणारा हा काळ. खूप स्थित्यंतरे, बदल अनुभवून आपण या काळात पोचलो आहोत. ‘आता मागे वळून बघणे नाही, फक्त पुढे चालत राहणे’ असे मनाशी पक्के करत असतानाच अशा काही घटना घडतात की आपण खरेच एकविसाव्या शतकात आहोत ना असे वाटू लागते. 

इंटरव्ह्यूमध्ये कोण कसले प्रश्‍न, कधी विचारेल याचा नेम नसतो. हल्ली तर प्रत्येक गोष्टीसाठी इंटरव्ह्यू - मुलाखती होत असतात. लहान मुलांच्या शाळा प्रवेशाच्या वेळीही असे इंटरव्ह्यू होतात. वास्तविक, शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये असा शिक्षण विभागाचा आदेश आहे. मात्र असे असतानाही पालकांना काही शाळांमध्ये विचित्र प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे, ‘तुम्ही गृहिणी आहात का?’ ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना?’ वगैरे अर्थात असे प्रकार सर्रास सर्व शाळांत होत नाहीत. पण पालकांपैकी एकजण तरी कायम घरी असावा; किंबहुना आईच गृहिणी असावी असा प्रवेशाचा अप्रत्यक्ष आणि अजब निकष काही शाळा लावत असल्याचे समोर आले आहे. 

सध्या पूर्वप्राथमिकच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. बहुतेक शाळांमध्ये नर्सरी प्रवेशाचे फलक झळकू लागले आहेत. या प्रवेशप्रक्रियेदरम्यान काही शाळा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांवर काही अटी लादू पाहात आहेत. ‘तुमच्या मुलाला आम्ही प्रवेश देतो. पण त्याचा अभ्यास घेण्यासाठी, प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही घरी असणार ना?’ असा प्रश्‍न विचारल्याचे विशाखा पांडे (नाव बदलले आहे) यांनी ‘सकाळ’ला सांगितले. ‘विद्यार्थ्यांकडून अभ्यास, प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी पालकांनी वेळ द्यावा, हे ठीक आहे. पण आईवडिलांपैकी एकाने पूर्ण वेळ घरी असावे. त्यातही आई गृहिणी असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते,’ असे निरीक्षण श्‍वेता गवळी (हेही नाव बदलले आहे) यांनीही नोंदविले. त्या म्हणाल्या, ‘मी गृहिणी असल्यामुळे मला काही प्रश्‍न नाही. तरीही मुलांच्या प्रवेशावेळी अशी विचारणा होणे प्रचंड खटकले.’ तसेच मुलाला शाळेतील प्रवेश मिळवताना काही अडचण येऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवडमधील एका आईने नोकरी सोडल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘आज एकविसाव्या शतकात हे काय सुरू आहे?’ असा प्रश्‍न कोणत्याही विचारी मनात येईल. पण कमी प्रमाणात का असेना हे घडलेले आहे.तेही पुण्यासारख्या ‘विद्येचे माहेरघर’ म्हणतात अशा शहरात. याचे कोण काय उत्तर देऊ शकणार आहे. या प्रकारावर त्या त्या शाळांचे काही म्हणणे असेलही; पण त्याचे समर्थन कसे होऊ शकणार? कारण मूळ मुद्दाच चुकीचा आहे. मुलांचा अभ्यास घरातच करून घ्यायचा असेल तर त्यांना शाळेत का पाठवायचे? एवढी भलीमोठ्ठी फी का भरायची? वेळोवेळी पैसे का द्यायचे? त्यापेक्षा ‘होम स्कूलिंग’चा पर्याय का निवडायचा नाही? अर्थात हे त्या त्या शाळांच्या म्हणण्यावरचे प्रश्‍न आहेत. ते बरोबर असतीलच असे नाही. पण ‘आईने गृहिणीच असावे’ ही बळजबरी का? संबंधित महिलेने आपल्या मर्जीने घरी राहण्याचा निर्णय घेतला असेल तर ठीक, पण काही महिलांना काम - नोकरी-व्यवसाय करणे भाग असते. त्यांना त्यांच्या घराला हातभार लावायचा असतो. एकट्याच्या पगारात घर चालू शकत नाही, हे आजचे भयाण वास्तव आहे. त्यामुळे कित्येकींना मनाविरुद्धही नोकरी करावीच लागते. त्यासाठी घरातले सगळे करून घराबाहेर पडावे लागते. ऑफिसातले काम सांभाळून परत घरातील ‘ड्युटी’साठी हजर व्हावे लागते. हे झाले ज्यांना नोकरीला पर्याय नसतो अशा महिलांचे. पण अशाही महिला आहेत की ज्यांना अशी काही आवश्‍यकता नसूनही नोकरी - व्यवसाय करायचे असते.. स्वतःसाठी. भले त्यांच्यावर कोणी अवलंबून असेल वा नसेल. पण स्व-समाधानासाठी त्यांना ते करायचे असते आणि त्यात अजिबात काही गैर नाही. चांगले शिक्षण घ्यायचे, संघर्ष करायचा, मनासारखे काम मिळवायचे.. आणि केवळ कोणीतरी म्हणते म्हणून ते काम सोडून घरी बसायचे हा या महिलांच्या टॅलेंटचा अपमानच आहे. केवळ याच नाही, कोणत्याही महिलेचा हा अपमानच आहे. कारण या सगळ्यात गृहिणीला वेळच वेळ असतो असे कुठेतरी या शाळांनी गृहीत धरलेले आहे. असा निर्णय घेणाऱ्यांनी दोन दिवस घरी थांबून गृहिणीची जबाबदारी पार पाडून दाखवावी. 

 मुख्य म्हणजे नोकरी करणारी असो वा नसो, प्रत्येक स्त्री ही गृहिणीच असते. कारण ती नोकरी करत असली तरी फार थोड्या (जवळजवळ नाहीच) महिलांना घरातील कामांपासून मुक्तता मिळते. एरवी सकाळी उठून सगळे आवरणे, स्वयंपाक करणे, घरात हवे-नको ते बघणे, सगळ्यांचे डबे भरणे.. वगैरे करत करत स्वतःचे आवरणे आणि वेळ पाळण्यासाठी धावत पळत ऑफीस गाठणे. जवळजवळ प्रत्येक घरातील हे चित्र आहे. यात मुलांची जबाबदारी ‘आई’चीच असते. त्यांचे संगोपन, आजारपण, शाळा, अभ्यास हे सगळे तीच तर सांभाळत असते. मग त्यासाठी तिने घरातच का थांबायला हवे? 

विचित्र, मानहानिकारक अटी घालणाऱ्या शाळांवर कदाचित कारवाई होईलही. पण त्या शाळांना एक प्रश्‍न विचारावासा वाटतो. या शाळांतील शिक्षिका त्यांच्या मुलांचा अभ्यास कसा घेतात? या शाळांत शिकणाऱ्या मुलींवर ते कशाप्रकारचे संस्कार करणार? आणि ज्या महिलांना नोकरी सोडण्याविषयी ते सुचवत आहेत त्याची भरपाई ते कशी करणार? केवळ पैशाच्या रूपात नाही, तर त्या नोकरीत स्त्रीला मिळणारे समाधान, ऊर्जा ते कुठून देणार? अशा अटी घालणाऱ्यांनी एकदा त्या स्त्रीच्या जागी स्वतःला ठेवून पाहावे, अशा अपमानास्पद अटी ते कधीही घालणार नाहीत, अर्थात तेवढी संवेदनशीलता शिल्लक असेल तर! 

संबंधित बातम्या