संपन्न खाद्यसंस्कृती
संपादकीय
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात ‘खाण्या’ला महत्त्व असते. बाकी कशाशिवाय एकवेळ चालू शकेल, पण दिवसातून किमान दोन वेळा तरी पोटाला काही मिळालेच पाहिजे. मात्र त्यातही काही दुर्दैवी असतात, ज्यांना सदैव खाण्याची भ्रांत असते. खरे तर ही परिस्थिती बदलायला हवी, पण असे काही अभागी लोक असतातच. याउलट काहींना या खाण्याचे करायचे काय असा प्रश्न असतो. यातील गरीब-श्रीमंत, खाण्याची वानवा-मुबलकता या गोष्टी वगळता प्रत्येकाला खाण्याची नितांत गरज असते. खाणेच मिळाले नाही, तर जगायचे कसे? खाण्याची ही किमान गरज भागली, की मग जिभेचे चोचले सुरू होतात.
भूक भागेल एवढेच खाणारे जसे समाजात आहेत, तसेच आपल्या आवडी निवडी जपणारेही आहेत. जे पुढ्यात येते ते निमूट खाणे हे जरी आदर्श असले तरी कधीतरी यापलीकडे वेगळे काही खावे असे प्रत्येकाला केव्हा ना केव्हा वाटूच शकते आणि त्यात काहीही चुकीचे नाही. स्वतःचे असे लाड कधीतरी करावेतच. रोज असे खाणे कदाचित परवडणारे (खिशाला आणि तब्येतीलाही) नसेलही, पण कधीतरी असे खाणे बदल म्हणून खायला हरकत नसावी. आपले असे लाड करायला गावांत कित्येक हॉटेले, रेस्टॉरंट्स, खाणावळी, टपऱ्या असतात; पण घरांतही असंख्य गृहिणी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या, पै-पाहुण्यांच्या जिव्हा तृप्त करत असतात. अशा गृहिणींच्या कष्टाला दाद द्यावी म्हणून आम्ही ‘मराठी खाद्यसंस्कृती’ या सकाळ साप्ताहिकाच्या विशेषांकाचे नियोजन केले. येथे ज्यांनी पाककृती लिहिल्या आहेत, त्या समस्त गृहिणींचे प्रतिनिधित्व करतात. सगळ्यांच्याच पाककृती समाविष्ट करणे शक्य नसते, म्हणून हे प्रतिनिधित्व. सकाळ साप्ताहिकाच्या नेहमीच्या अंकांत आम्ही दर अंकात अशा गृहिणींनी सुचविलेल्या पाककृती प्रसिद्ध करत असतो. आपल्यापैकी कोणीही या सदरासाठी आपले लेखन कधीही पाठवू शकता. त्यासाठी किमान ६-७ पाककृती, त्यांची छायाचित्रे, तुमचे छायाचित्र पाठवणे आवश्यक आहे. निवडक पाककृती अंकांत प्रसिद्ध होतात.
इथे सतत गृहिणी असा उल्लेख येतो आहे, या गृहिणी म्हणजे नोकरी करणाऱ्याही आहेत. कारण स्त्री कितीही मोठी नोकरी करत असो, घराची जबाबदारी तिच्यावरच असते.. तीही ही जबाबदारी टाळत नाही. त्यामुळे नोकरी करणारी स्त्रीही गृहिणीच असते.
मात्र, अलीकडे वेगळा ट्रेंडही बघायला मिळतो आहे. पुरुषही स्वयंपाकात पुढे येऊ लागले आहेत. स्वयंपाक हे क्षेत्र आताआतापर्यंत महिलांची मक्तेदारी होती. पण काही काळापासून पुरुषांनीही या क्षेत्रात मुसंडी मारली आहे. दूरचित्रवाणीवर कितीतरी पुरुष शेफ्सचे कार्यक्रम आपण बघत असतो. घरांतही हौसेने ही जबाबदारी स्वीकारणारे अनेक पुरुष आहेत. आमच्या अंकांतही अनेक पुरुषांनी पाककृती दिल्या आहेत - देत आहेत. त्यामुळे स्वयंपाकाची आवड असणाऱ्या पुरुषाकडे चमत्कारिक नजरेने बघणाऱ्या समाजाची ‘नजर’ आता बदलली आहे. कित्येक महिला या शेफ्सना ‘फॉलो’ करताना दिसतात. असा बदल होणे आवश्यकच असते. त्याचे स्वागतच करायला हवे.
आपल्या देशात भाषेपासून विविध क्षेत्रात प्रचंड वैविध्य बघायला मिळते. खाद्यसंस्कृती तरी याला अपवाद कशी असेल? केवळ राज्या-राज्याची ही संस्कृती वेगळी नसते तर त्या राज्यांतील प्रत्येक प्रांताची ‘चव’ वेगळी असते. महाराष्ट्राबद्दलही हेच म्हणता येईल. दाक्षिणात्य, पंजाबी, गुजराथी, राजस्थानी वगैरे पदार्थ अगदी परदेशातही पोचले आहेत. त्याला प्रतिसादही प्रचंड मिळताना दिसतो. मात्र, महाराष्ट्राबाबत बटाटावडा (वडापाव), मिसळ असे काही अपवाद वगळता फारसे पदार्थ दिसत नाहीत. नाही म्हणायला, कोथिंबीर वडी, थालिपीठ, शिरा, पोहे असे काही मोजके पदार्थ काही हॉटेलांत दिसतात. पण या पलीकडे फार काही नसते. वास्तविक, महाराष्ट्राची खाद्यपरंपरा खूप मोठी, संपन्न आणि चवदार आहे. पण बऱ्यापैकी घराघरांपुरतीच मर्यादित राहिली आहे. ‘हॉटेलात जाऊन घरात होतात तेच पदार्थ काय खायचे?’ असा आपला जो उदासीन दृष्टिकोन असतो, तोही याला कारणीभूत आहे. पण महाराष्ट्रातील खूप लोक-विद्यार्थी शिक्षण-कामानिमित्त राज्य, देश ओलांडू लागले आहेत. त्यांना ‘आपले’ हे काणे खावेसे वाटत असेलच. सोशल मीडियावर अशा अनेक साइट्स दिसतात. नियतकालिकांतही फूडविषयक मजकुराला प्रचंड मागणी असते. त्यामुळे ही गरज मोठी आहे असे दिसते.
हे सगळे लक्षात घेऊन सकाळ साप्ताहिकाने केवळ ‘मराठी खाद्यसंस्कृती’वर विशेषांक करायचे ठरवले. त्यात नेहमीचे पदार्थ शक्यतो टाळले आहेत. पुरणपोळीसारख्या पदार्थांचा अर्थातच अपवाद, कारण ते आपले फार मोठे वैशिष्ट्य आहे. पण महाराष्ट्रातील विदर्भ-वऱ्हाड, मराठवाडा, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण अशी प्रत्येक प्रांताची प्रातिनिधिक ‘चव’ इथे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे करताना आणखी एक बदल जाणवला तो म्हणजे, त्या त्या प्रांतांतील निखळ चवी तर आहेतच; पण जागतिकीकरणामुळे खूप बदल झाले आहेत. शिक्षण, कामानिमित्त खूप स्थित्यंतरे झाली आहेत. दुसऱ्या प्रांतांतील मंडळी येथे आली आहेत. त्यांच्या खाद्यसंस्कृतीचाही प्रभाव आपल्या खाद्यसंस्कृतीवर कळत-नकळत झाला आहे. त्यामुळे मूळच्या पदार्थाला नवीन वेगळीच ‘चव’ मिळाली आहे आणि ही ‘चव’ही खूप छान आहे. खऱ्या अर्थाने सर्व संस्कृतींचा मिलाफ यामध्ये बघायला मिळतो. मूळचीच वैविध्यपूर्ण असलेली आपली खाद्यसंस्कृती आपले वैशिष्ट्य कायम ठेवून अधिक संपन्न झाली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक खाद्यसंस्कृतीबाबत अशीच सुरू राहणार आहे.. ‘बदल’ हेच तर जिवंतपणाचे लक्षण आहे ना!