गुपिते का बाळगावी लागतात? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

संपादकीय
 

प्रत्येकाची बरी-वाईट गुपिते - सिक्रेट्‌स असतात. क्वचित कोणाला ती सांगितली जातात. मात्र ती व्यक्ती अगदी विश्‍वासू असायला हवी. पण आपला हा विश्‍वास चुकीचा असल्याचे काही वेळा संबंधितांच्या लक्षात येते. लपवलेली गोष्ट जगजाहीर होते आणि अर्थातच संबंधित व्यक्तीची बदनामी होते. आपल्या काही गोष्टी गुप्त ठेवण्याचे ‘बदनामी’ हे एक मोठे कारण आहे. या बदनामीला घाबरूनच माणूस खूप गोष्टी लपवत असतो. पण नीट विचार केला, तर बऱ्याचदा त्या गोष्टींचा इतका बाऊ करण्याचे काही कारण नसते. पण या लपवा लपवीच्या मानसिकतेचाच काही लोक फायदा घेत असतात. ब्लॅकमेलिंगचे प्रकार असे सुरू होतात. आता तर या बाबतीत सायबर क्राइम्सही होऊ लागले आहेत. 

पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणारा अमित (नाव बदलले आहे) त्याच्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहात होता. त्याला अचानक एक ईमेल आला. ‘तुमचे हे डर्टी सिक्रेट सोशल मीडियावर पसरवून तुमची बदनामी करू का?’ असे त्या मेलमध्ये लिहिले होते. या धमकीला घाबरून अमितने त्या मेलला उत्तर दिले. इथेच तो चुकला.. कारण त्यानंतर सायबर गुन्हेगार टोळीने हळूहळू त्याला आपले सावज केले. त्याच्याकडून ते पैसे उकळू लागले. तसेच एका कंपनीत काही गैरप्रकार सुरू होता. त्याबाबतची माहिती चव्हाट्यावर आणण्याची भीती दाखवून त्या कंपनीलाही ब्लॅकमेल करण्यात आले. या आणि अशा स्वरूपाच्या २० ते २२ तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. मात्र अशा फसवणुकीचे प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त प्रकार असण्याची शक्‍यता पोलिस व्यक्त करतात. 

आज आपण खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. ते खूप उपयुक्तही आहे. मात्र अनेकदा चांगल्या गोष्टींचा गैरफायदाही घेतला जातो. तंत्रज्ञानाबाबतही तसेच होताना दिसते. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो, तर असा नवखा माणूस काही चूक करून आपल्या जाळ्यात कसा अडकेल याची वाट काही दुष्ट प्रवृत्तीची माणसे पाहात असतात. याचा अर्थ ते तंत्रज्ञान वाईट असते किंवा त्यात खूप पळवाटा असतात असे नाही. कारण हे तंत्रज्ञान नव्हते तेव्हाही माणसांना फसवले जातच होते. त्यांना ब्लॅकमेल केले जातच होते. गरज आहे सजग राहण्याची. जागरूक राहण्याची. स्वतःवर विश्‍वास ठेवण्याची. आपणच एखादी गोष्ट करताना ठाम नसू तर अशा जाळ्यात अलगद ओढले जातो. त्यामुळे फसवणाऱ्याची नव्हे, तर फसणाऱ्याचीच चूक अधिक असते. तुमच्या दुबळ्या मानसिकतेचा समोरचा माणूस फायदा घेत असतो आणि आपणही तो घेऊ देत असतो. त्यामुळे फसवणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी, पण आपणही आपल्यात सुधारणा करायला हवी. 

 मोबाईलमुळे जग आपल्या अक्षरशः मुठीत आले आहे. इंटरनेटमुळे घरबसल्या आपण काहीही बघू शकतो. शॉपिंग करू शकतो. कोणाबरोबरही सहजपणे बोलू शकतो. हे सगळे लक्षात घेऊन जगभरात लाखो वेबसाइट्‌स निर्माण झाल्या आहेत. पॉर्न किंवा त्या प्रकारच्या वेबसाइटची संख्याही लक्षणीय आहे. हे सगळे पूर्वी नव्हते, आताच आहे अशी काही परिस्थिती नाही. पूर्वी ‘ब्लू फिल्म’ म्हणून अशा फिल्म्स रात्री वगैरे दाखवल्या जात असत. पण आता त्या तुमच्या मोबाईलवरच दिसू लागल्याने ते बघणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. नेमका याचा फायदा गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक घेतात. कारण माणूस बदनामीला प्रचंड घाबरतो. इतर ठिकाणी कल्पना नाही, पण आपल्या समाजात लैंगिक गोष्टींबद्दल बोलणेही जिथे निषिद्ध मानले जाते, तिथे अशा फिल्म्स बघणे म्हणजे तर महापाप! यातून चोरटेपणा निर्माण होतो. ही लपवाछपवीच गुन्हेगारांना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करत असते. असा चोरटेपणा आला, की सगळे बिनसते. कारण तिथे माणूस मनाने कमकुवत होतो, डळमळीत होतो, विचार करण्याची त्याची क्षमता कमी होते, तो स्वतःलाच दोषी मानू लागतो. तसे बघायला गेले तर पॉर्न फिल्म बघणे हा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. त्याच्या या वागण्यामुळे जोपर्यंत कोणाला किंवा समाजाला काही त्रास होत नाही तोपर्यंत त्याच्या वागण्यावर कोणी कसा आक्षेप घेऊ शकतो? पण वर म्हटल्याप्रमाणे मुळात आपल्या समाजातच या गोष्टीबाबत प्रचंड बाऊ केला जातो. त्याबाबत उघडपणे बोलले जात नाही. चर्चा करणे सोडाच! याबाबत कोणी बोललेच तर त्या व्यक्तीकडे चमत्कारिक नजरेने बघितले जाते. त्यामुळे या संबंधांबाबत जोपर्यंत आपल्याकडे मोकळेपणा येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग होत राहणार. गुन्हेगारांना शोधून पोलिस त्यांना शिक्षा करतीलच, पण समाज म्हणून आपणही अशा व्यक्तींकडे ते गुन्हेगार असल्यासारखे बघता कामा नये. त्यातून जोपर्यंत समाजाला किंवा कोणा इतर व्यक्तीला त्रास होत नाही तोपर्यंत ठीक आहे. ती तिची मानसिक गरज असू शकते, मनोरंजनाचा भाग असू शकतो, लैंगिक शिक्षणाचा अभाव असू शकतो किंवा निव्वळ उत्सुकताही असू शकते हे आपण मान्य करायला हवे. समाज म्हणून आपली मानसिकता बदलली की असे ब्लॅकमेलिंगचे प्रकारही नक्कीच कमी होतील. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध कंपन्याही लाभ घेत असतात. पूर्वी अशी सगळी कागदपत्रे असत. त्याच्या फाइल्स असत. ते सगळे सांभाळणे मोठे जिकिरीचे होत असे. नवीन तंत्रज्ञानाने त्याबाबत खूप मदत केली. सगळे व्यवहार ‘पेपरलेस’ झाले. पण ज्यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान नीट वापरले त्यांना काही त्रास झाला नाही. पण तशी काळजी न घेतल्याने किंवा त्याही गैरव्यवहार केल्याने काही कंपन्या गुन्हेगारांच्या तावडीत सापडल्या. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली. पोलिसांकडे जावे तर सर्व व्यवहारांची माहिती सांगावी लागणार, न जावे तर गुन्हेगारांच्या मागण्या पूर्ण करत राहाव्या लागणार.. अशी परिस्थिती निर्माण झाली. यावर उत्तर एकच मानसिकता बदलणे आणि गैरव्यवहार न करणे.. ते जमणार का?

संबंधित बातम्या