ताजेपणासाठी बदल आवश्‍यक

ऋता बावडेकर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

संपादकीय
 

कोणाला हवा असो वा नसो, आयुष्यात ‘बदल’ अपरिहार्य असतो. कोणी प्रयत्न केलेले असोत वा नसोत, आयुष्यात कधी ना कधी बदल घडतच असतो... आणि प्रत्येकवेळी हा बदल वाईट किंवा नकारात्मकच असेल असे नाही. बहुतांश वेळा तर तो खूप चांगला, सकारात्मक असतो आणि आवश्‍यकही असतो. अनेक वेळा या बदलामुळे आयुष्याला कलाटणी मिळते. नीरस, संथ चाललेल्या आयुष्यात अचानक उत्साह येतो. नवनवीन गोष्टी करून बघण्याची इच्छा निर्माण होते. नवनवीन, वेगळी कामे हातून होतात. उत्साही वातावरण होते. असा बदल करण्याला अनेक जण १ जानेवारी या दिवसाला महत्त्व देतात. नवीन वर्षाचा पहिला दिवस! नवनवीन संकल्प करून या दिवसापासून आयुष्यात काही बदल करण्याची मंडळींची इच्छा असते. हे संकल्प किती दिवस टिकतात ही गोष्ट अलाहिदा, पण त्या निमित्ताने काही बदल तर नक्कीच घडतात. तेच महत्त्वाचे असते. 

आपले आयुष्य व्यवस्थित सुरू असते. ओघाने येणारे चढउतार वगळले तर त्यात विशेष काही घडत नाही. पण अशा संथ, नीरस आयुष्याचाही कधी तरी कंटाळा येतो. थोडा ‘चेंज’ हवासा वाटतो. लहानशा बदलामुळेही खूप बरे वाटते. हुरूप वाढतो. त्यामुळे लहानसा का होईना आयुष्यात बदल आवश्‍यक असतो. माणसाच्या आयुष्याचे जे, तेच इतर गोष्टींबाबतही म्हणता येईल. वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या, वर्षानुवर्षे चालणाऱ्या नियतकालिकांबद्दलही तेच म्हणता येईल. ते व्यवस्थित सुरू असतात, तरीही दरवर्षी त्यात बदल केला, की त्यात ताजेपणा येतो, वाचकांना वेगळे काही वाचायला मिळते. ‘सकाळ साप्ताहिक’ही याला अपवाद नाही. ‘साप्ताहिक’ या वर्षीही अंकात काही बदल करत आहे. आपला या बदलांना नेहमीप्रमाणेच उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल याची खात्री आहे. 

अंकात बदल करताना वाचकांच्या आवडी निवडीचा आम्ही प्राधान्याने विचार केला. २०१९ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. देशभर अनेक समीकरणे उदयाला येत आहेत, काहींत बदल होत आहेत, काही पुनर्विचार करत आहेत.. असे अनेक प्रकार दिसतात. राजकारणातील या होणाऱ्या-बिघडणाऱ्या समीकरणांचा मागोवा घेणारे ‘राज-रंग’ हे नवीन साप्ताहिक सदर आम्ही सुरू करत आहोत. ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक प्रकाश पवार हे सदर लिहीत आहेत. लोकांना फिरायला खूप आवडते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यादृष्टीने ‘भटकंती’ हा मध्यवर्ती धागा धरून त्यात वैविध्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जिथे फारसे कोणी जात नाही, असा ठिकाणांचा परिचय आम्ही ‘आडवळणावर’ या सदरात दिला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्या बरोबरीनेच आता ‘किल्लेभ्रमंती’ हे नवीन सदर आम्ही सुरू करत आहोत. डॉ. अमर अडके यांनी आतापर्यंत जवळजवळ सगळे किल्ले पालथे घातले आहेत. दिवसा, रात्री त्यांनी या गडांवर चढाई केली आहे. त्यांचे रंजक अनुभव आता आपल्याला वाचायला मिळणार आहेत. तसेच, निसर्गात फिरणे हाही एक अनुभव असतो. तो कधी काय अनुभव देईल याचा नेम नसतो. प्रत्येक गोष्टीसाठी तयार असावे लागते.. ट्रेकमधील थरारक अनुभव सांगणार आहेत ओंकार ओक, पंकज झरेकर, अजय काकडे. याच बरोबर आमच्या वाचकांनी पाठवलेले पर्यटनाचे अनुभवही आम्ही याही वर्षी प्रसिद्ध करणार आहोत. 

आयुष्य चवीने जगताना केवळ भरपेट खाण्याची आवश्‍यकता नसते. तर ज्या पदार्थांच्या रंगरूप व चवीमुळे पोटातला वन्ही जागा होतो अशा पदार्थांची गरज असते. अशा पदार्थांच्या रोचक गोष्टी व कृती देणारे ‘पोटपूजा’ हे नंदिनी आत्मसिद्ध यांचे सदर आम्ही सुरू करत आहोत. प्रसिद्ध शेफ्सची दिनचर्या कशी असते हे सांगणारे ‘शेफ्स डायरी’ हे सदर पूजा सामंत लिहीत आहेत. याशिवाय वाचकांकडून आलेल्या पाककृतींचे ‘फूडपॉइंट’ हे सदर आणि तरुण मुलामुलींना स्वयंपाकाची मुळाक्षरे शिकविणारे ‘कुकिंग बिकींग’ हे सदरही आहेच. याशिवाय ‘घरातला बगीचा’ हे अल्पना विजयकुमार यांचे नवीन सदर सुरू होत आहे. 

मागील वर्षीपासून ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी विशेष मजकूर देण्यास आम्ही सुरुवात केली. त्यात अधिक रंजक बदल केला आहे. मुलांना अनेक प्रश्‍न पडत असतात. त्या प्रत्येक प्रश्‍नाचे त्यांना उत्तर मिळतेच असे नाही. त्यांच्या प्रश्‍नांना वैज्ञानिक पद्धतीने उत्तरे देणारे ‘कुतूहल’ हे सदर डॉ. बाळ फोंडके लिहीत आहेत. दहा वर्षांची मुले कसा विचार करतात, त्यांच्या मनात काय काय येते, आईबाबांकडे, मित्रमैत्रिणींकडे, एकूणच जगाकडे ते कसे बघतात, हे सांगणारी ‘साराची डायरी’ विभावरी देशपांडे यांनी लिहिली आहे. निसर्ग कसा बघावा, हे मकरंद केतकर यांनी सांगितले आहे. 

डॉ. मंगला नारळीकर यांची ‘गणितभेट’ याही वर्षी आहे.  असे अनेक लहान-मोठे बदल अंकात आहेत. वाचकांचा सहभागही आम्ही जाणीवपूर्वक ठेवला आहे. तेव्हा या सदरांसाठी लिहाच, त्याबरोबरच अंकाविषयीही आपली मनोगते पत्राद्वारे कळवावे, असे वाचकांना आवाहन आहे. 

संबंधित बातम्या