संमेलन आणि सोशल मीडिया

ऋता बावडेकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

संपादकीय
 

यंदाचे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण ठरले. अध्यक्षनिवडीपासूनच हे वेगळेपण सुरू झाले. त्याचे पडसाद सोशल मीडियातही उमटले. आतापर्यंत मिळाला नसेल इतका प्रतिसाद या संमेलनाला सोशल मीडियावर मिळाला. केवळ सकारात्मकच नव्हे तर नकारात्मक प्रतिसादही मोठा होता. 

हे संमेलन सुरवातीपासूनच वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरले असे म्हणावे लागेल. याचे कारण संमेलनाध्यक्षांची निवड हे होय. निवडणूक न घेता अध्यक्षांची एकमताने निवड करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आणि तो प्रत्यक्षातही आणला. डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अशी अगदी शांततेत, पण अत्यंत उत्साही वातावरणात झाली. त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले. ही निवड म्हणजे आपल्याच घरातील कोणाची निवड झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यावरूनच ही निवड किती सार्थ होती हे लक्षात यावे. त्यानंतरही सगळे सुरळीत सुरू होते. ‘संमेलन जवळ येते आहे, पण अजून वाद कसा नाही?’ अशी चर्चा काहीशा कौतुकाने आणि तेवढ्याच कुचेष्टेने होत होती. पण एरवी सगळे व्यवस्थित होते. अशातच एक बातमी प्रसिद्ध झाली. नयनतारा सहगल या ज्येष्ठ लेखिका स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाला उपस्थित राहणार. श्रीमती सहगल यांचे वय नव्वदच्या घरातले. डेहराडूनवरून त्या या संमेलनासाठी येणार हा कौतुकाचा भाग होताच, पण त्यांच्या उपस्थितीचे वेगळे आणि खूप जवळचे कारण होते. ते म्हणजे, त्यांचा महाराष्ट्राबरोबर असलेला संबंध होय. गेल्या शतकातील मान्यवर वेदाभ्यासक शंकर पांडुरंग पंडित यांचे पुतणे रणजित सीताराम पंडित या मराठी तरुणाचा नेहरू घराण्यातील विजयालक्ष्मी यांच्याबरोबर विवाह झाला. नयनतारा या दांपत्याची कन्या. स्वातंत्र्य चळवळीत रणजित पंडितांना तुरुंगवास झाला. या काळात त्यांनी बाराव्या शतकातील कवी कल्हाणाच्या ‘राजतरंगिणी या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला. पंडित यांचे कोकणात वास्तव्यही होते. असा वारसा लाभलेल्या नयनतारा स्वागताध्यक्ष होणार या भूमिकेचे आणि संयोजकांच्या कल्पकतेचे कौतुक होत असतानाच काहीतरी बिनसले. ‘मराठी संमेलनासाठी इंग्रजी लेखक कशाला?’ अशी संकुचित भूमिका घेत मनसेच्या यवतमाळमधील कार्यकर्त्यांनी संमेलन उधळण्याची धमकी दिली. त्याला उत्तर देण्याऐवजी यवतमाळ साहित्य परिषदेने नयनतारा सहगल यांनाच थेट मेल करून त्यांचे निमंत्रण रद्द करत असल्याचे औद्धत्य केले. तोपर्यंत शांत असलेले वातावरण या ‘निमंत्रणवापसी’मुळे एकदम पेटले. 

या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्राचीच मान खाली गेली. त्यामुळे प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभाविकच होते. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटू लागले. अनेकांनी संमेलनावर बहिष्काराचा निर्णय घेतला. हा निर्णय वैयक्तिक होता तोपर्यंत ठीक होते असे एकवेळ म्हणता येईल, पण नंतर हे सगळे संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यावर कळत-नकळत दबाव आणू लागले. त्यांनी संमेलनाला जाऊ नये, त्यांनीही बहिष्कार टाकावा, त्या संमेलनाला गेल्याच तर त्यांनी अमुक बोलावे, त्यांनी तमुक करावे अशा सूचना येऊ लागल्या. 

हे सगळेच अनाकलनीय होते. नयनताराबाईंसंदर्भातील निर्णयाला विरोध होणे, त्याविषयी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आणि योग्यही होते. पण म्हणून अरुणाताईंनी संमेलनालाच जाऊ नये, त्यांनी काय बोलावे - काय बोलू नये हे त्यांना सांगणे हेही औद्धत्याचेच होते. त्यांची या पदावरील निवड त्यांचे या क्षेत्रातील काम बघूनच झाली. त्यामुळे काय करावे, हे त्यांना सांगण्याचे कारण काय? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना आपण अरुणाताईंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात यामुळे हस्तक्षेप करतो आहोत, याचीही जाणीव नव्हती. या सगळ्या काळात अरुणाताई गप्प होत्या. याचा अर्थ त्यांना त्रास झाला नसेल असे नाही, पण त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ती व्यक्त केली ती थेट संमेलनात.. अध्यक्षीय भाषणासाठी बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा! त्यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा समाचार घेतला. निमंत्रण वापसी, झुंडशाही, राजकारण वगैरे वगैरे.. पण हे बोलताना त्यांनी कुठेही तोल जाऊ दिला नाही. आवाज वाढवला नाही, अपशब्द वापरले नाहीत, आक्रस्ताळेपणा केला नाही.. आणि तरीही चुकीच्या गोष्टींचा निषेध केला, संबंधितांना चुकीची जाणीव करून दिली. प्रत्येकवेळी आवाज चढवून, अभिनिवेशाने बोलले तरच परिणाम होतो असे नाही. शांत, संयतपणे योग्य ते बोलले तर या परिणामकारकतेची तीव्रता अधिक असते. ते थेट पोचते. अरुणाताईंनी नेमके तेच केले. 

सोशल मीडिया हे माध्यम खरोखरच प्रभावी आहे. कोणालाही तिथे आपली मते मांडता येतात. पण म्हणूनच ते फार सांभाळून हाताळायला हवे. आपले मत जसे बरोबर असते, तसेच समोरच्यालाही काही मत असते आणि तेही योग्य असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. माध्यम चुकीचे नाही, पण ते वापरण्याची आपली पद्धत अयोग्य असू शकते. हे लक्षात घेऊन या माध्यमाची ताकद आपण वाढवायला हवी. त्याचा गैरवापर होऊ देऊ नये. खूप जबाबदारीने ते वापरायला हवे, तरच त्याची विश्‍वासार्हता राहील. अन्यथा या संमेलनावेळेसारखा अनुभव येत राहील आणि माध्यम निष्प्रभ होऊ शकेल.  
 

संबंधित बातम्या