डोके शाबूत राहायला हवे... 

ऋता बावडेकर
मंगळवार, 29 जानेवारी 2019

संपादकीय
 

शहरांतील वाहतूक हा विषय दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. त्यातही पुण्यातील वाहतूक हा विषय वेगळा ठरत आहे. आधी ‘सायकलींचे शहर’ आता ‘दुचाकींचे शहर’ अशी पुण्याची ओळख आहे. हेल्मेटसक्तीमुळे हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या सक्तीमुळे शहरात सरळसरळ दोन गट झाले आहेत. एक सक्तीविरोधात, तर दुसरा हेल्मेटवापराच्या बाजूने. मात्र, विरोध करणाऱ्यांनाही हेल्मेटवापराचे फायदे-तोटे माहिती आहेत. त्यामुळेच आरोग्यदृष्ट्या हेल्मेट का वापरावे आणि त्याची कायदेशीर बाजू काय आहे अशी चर्चा आम्ही या ‘सकाळ साप्ताहिक’ अंकात केली आहे. 

हेल्मेटवापराबाबत खरे तर दुमत व्हायलाच नको. कारण हा विषय प्रत्येक दुचाकीस्वाराच्या स्वतःच्या जिवाचा असतो, हे कोणीही मान्यच करेल. दुर्घटना घडलीच नाही, तर उत्तमच! पण दुर्दैवाने तसा काही प्रसंग आला तर डोक्‍यावर हेल्मेट नव्हते, नाहीतर वाचला किंवा वाचली असती अशी हळहळ करून काहीच उपयोग नसतो. हे प्रत्येकाला कळते, पण त्या प्रत्येकाला वळतेच असे नाही. म्हणून हेल्मेटवापराला विरोध दिसतो. त्यासाठी खूप कारणेही दिली जातात. शहरातील ट्रॅफिकमुळे वाहनाचा वेग जास्तीत जास्त तीसच ठेवावा लागतो, रस्त्यावरील खड्ड्यांचे काय - ते आधी दुरुस्त करा, हेल्मेट वापरल्याने मान दुखते, केस जातात, इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज येत नाही, हेल्मेट घेऊन सगळीकडे वावरावे लागते वगैरे वगैरे... यातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे आरोग्यविषयक लेखात डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहेत. मात्र हे प्रश्‍न म्हणजे, केवळ बहाणे आहेत हेही मान्य करायला हवे. कारण या प्रत्येक प्रश्‍नाला पटेल असे उत्तर आहे आणि शंकेखोर लोकांनाही ते उत्तर माहिती आहे. बहाणे देण्यालाही हरकत नाही. पण या बाबतीत ते केवळ चर्चेपुरतेच हवेत. कारण हा आपल्या जिवाचा, आपल्या आयुष्याचा प्रश्‍न असतो. प्रसंग बेतला तर नुकसान आपले होते. त्यामुळे आपल्या हिताची गोष्ट तरी आपण मान्य करावी एवढेच वाटते. 

याचा अर्थ हेल्मेट वापरल्याने काहीच हानी पोचत नाही असे नाही. तर अपघाताच्या तीव्रतेवर ते अवलंबून असते. पण हेल्मेट वापरल्याने रिस्क निम्म्याने कमी होते, हे मान्यच करायला हवे. समोरचा वाहनचालक गाडी कसा चालवतो किंवा रस्त्यांवरील खड्डे वगैरे विषय आपल्या हातातील नसतात. त्यामुळेच आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरायला हवे. आपण हेल्मेट वापरले काय किंवा न वापरले काय समोरच्याचे काहीही नुकसान होत नसते, न वापरल्याने आपले मात्र नुकसान नक्कीच होते. त्यामुळे काळजी घ्यायला काय हरकत आहे. 

हेल्मेट न वापरण्यासाठी अनेकजण कायद्यांवरही बोलतात. त्यामुळे ॲड. रोहित एरंडे यांचा लेख आम्ही या अंकात दिला आहे. त्यामुळे या विषयीच्या कायद्यांची चांगली माहिती आपल्याला येईल. 

या हेल्मेटसक्तीमुळे रस्त्यारस्त्यांवर हेल्मेट विकणारे दिसू लागले आहेत. काही पैसे वाचविण्यासाठी ही तुलनेने स्वस्त हेल्मेट्‌स विकत घेतली जात आहेत. ती घेताना विचार करायला हवा. कारण त्या हेल्मेटच्या आत डोके आपले असणार आहे. एकतर या हेल्मेट्‌सना कायद्याने परवानगी नाही. ‘आयएसआय’ प्रमाणपत्र असलेले हेल्मेटच असणे आवश्‍यक आहे, असे कायदाच सांगतो. त्यामुळे काही पैसे वाचविण्यासाठी आपला जीव किती धोक्‍यात घालायचा हेही ठरवायला हवे. 

रस्ते चांगले हवेत, वाहतूकनियमन चांगले हवे... वगैरे सर्व अपेक्षा रास्तच आहेत. पण त्या पूर्ण होतील तेव्हा पूर्ण होतील. तोपर्यंत हेल्मेटच वापरायचे नाही, यात कसले शहाणपण आलेय? मुळात आपण वाहतुकीचे सर्व नियम प्रामाणिकपणे पाळतो का, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते. वेगमर्यादा असली तरी गाडी पुढे वेगात दामटायची हौस असते; मग इतरांचे काही का होईना! पण यात स्वतःलाही त्रास होऊ शकतो हे लक्षातच येत नाही. शिस्त दुसऱ्याने पाळावी, सुधारणा दुसऱ्याने करावी, अशा अपेक्षा आपण कधीतरी सोडणार आहोत का? आपले शहर आहे, ते स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपले शहर शिस्तप्रिय म्हणून ओळखले जावे, ही जबाबदारी आपलीही आहे, असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत काहीही चांगले होण्याची शक्‍यता नाही. 

तीच गोष्ट हेल्मेटचीही आहे. हेल्मेट हे आपल्याच सुरक्षिततेसाठी आहे हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही, तोपर्यंत हा लटका विरोध होतच राहणार. काही राजकीय, सामाजिक संघटना या विरोधाला पाठिंबा देतात, आंदोलने करतात. पण एखाद्या दिवशी हा सगळा विरोध आपल्याच जिवावर उठू शकतो हे ना ते मान्य करतात ना आपण! योग्य हेल्मेट वापरण्याचे फायदे डॉ. भोंडवे यांनी आपल्या लेखात दिले आहेत. ते जरी वाचले तरी हेल्मेटची आवश्‍यकता सगळ्यांना पटावी. 

त्यामुळे विरोधाला विरोध करण्याचे सोडून प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करावा. शेवटी काय, तर डोके शाबूत राहायला हवे...
 

संबंधित बातम्या