बिबट्याचे अतिक्रमण? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

संपादकीय
 

पुण्यातील केशवनगर या भागातील भोई वस्तीमध्ये बिबट्याने सोमवारी (ता. ४ फेब्रुवारी) सकाळी सात ते पावणे दहा दरम्यान अक्षरशः धुमाकूळ घातला. ग्रामस्थ, वनविभागाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला पकडले. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सध्या हा बिबट्या आहे. पण अगदी निवासी इमारतीपर्यंत हा बिबट्या येऊन धडकल्याने भीती, आश्‍चर्य तर व्यक्त होतेच आहे; पण त्याचबरोबर माणूस आणि वन्यजीव हे मुद्देही पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. 

या भोईवस्तीमध्ये घराच्या मागील भागात चुलीवर पाणी गरम करायला गेलेल्या समिंद्रा तारू या सत्तर वर्षांच्या महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला. त्यांनी प्रसंगावधान राखून प्लॅस्टिकची बादली बिबट्याच्या चेहऱ्यावर टाकली. त्यामुळे त्याची मान बादलीच अडकली. त्यावेळात समिंद्राबाईंनी आपली सुटका करून घेतली. बिबट्यानेही हिसडा देऊन आपली मान सोडवून घेतली व धूम ठोकली. दरम्यान, समिंद्राबाईंच्या डोके व मानेवर बिबट्याचा पंजा बसून त्या जखमी झाल्या. तेथून बिबट्या जवळच्याच भिंतीवरून लेबर कॅंपकडे धावला. तेथे एका मजुराच्या मांडीचा त्याने चावा घेतला. आरडाओरड झाल्यावर तो एका लहान मुलीकडे वळला. पण विकास भोकरे यांनी त्याच्याबरोबर झटापट केली, त्यात ते जखमी झाले. तेथून बिबट्या एका बांधकाम सुरू असलेल्या कंपनीच्या इमारतीत घुसला. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना बोलावले होते. अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी पोचली. त्यांनी त्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर जाळी लावली. दरम्यान राजीव गांधी उद्यान आणि वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. शोधाशोध केल्यावर एका डक्‍टजवळ बिबट्या सापडला. त्याच्यावर जाळी टाकून त्याला पकडण्यात आले. पण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने जाळीतूनच एकाच्या हातावर पंजा मारला. त्याचवेळी इंजेक्‍शन देऊन त्याला बेशुद्ध करण्यात आले आणि सकाळी सातपासून सुरू झालेला हा संघर्ष सकाळीच पावणेदहाच्या सुमारास संपला. 

बिबट्या गावात - अगदी शहरात येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. डिसेंबर ९९ मध्ये पुण्याच्याच नळस्टॉपजवळील शाळेत संध्याकाळच्या सुमारास बिबट्या घुसला. त्याला पकडायला रात्रीचे दहा - अकरा होऊन गेले होते. त्यावेळी त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता किंवा कोणी जखमी झाले नव्हते. अर्थात, त्यामुळे आताचे बिबट्याचे येणे किरकोळ ठरत नाही. पण बिबट्या असा शहरात येणे ही परत एकदा माणूस विरुद्ध वन्यजीव संघर्षाची नांदी ठरू नये. कारण या वन्यजीवांच्या अधिवासात माणसाने कधीच अतिक्रमण केले आहे. या वन्यजीवांची राहण्याची ठिकाणे त्यामुळे संकुचित पावत आहेत. अशावेळी त्यांनी कुठे जावे, असा प्रश्‍न उभा राहतो. राहण्यापेक्षाही अन्नाच्या शोधात तो असा कधी कुठल्या गावात, शहरात येऊन पोचतो हे त्यालाही समजत नाही. कारण सगळ्या प्रदेशांच्या सीमारेषाच धूसर झाल्या आहेत. जंगल, रानाजवळच्या गावांत बिबट्या येऊन गेल्याच्या बातम्या आपण वाचतो, पण आता आपल्याच दारात तो येऊन उभा राहिला आहे. त्यात त्याची चूक किती? आपण त्याचा निवास हिसकावून घेतला. त्याचे राहण्याचे क्षेत्र मर्यादित केले. असे अतिक्रमण करण्याखेरीज दुसरा पर्यायच आपण त्याच्यापुढे ठेवला नाही. 

इथे तरी तो का आला? तर तज्ज्ञांच्या मते आपण कचरा खूप साठवला, मांजरी परिसरात उसाची खूप शेती आहे. या दोन्हीमुळे तो इकडे ओढला गेला असावा. कारण याभोवती कुत्री आणि डुकरे यांचा वावर असतो. हे दोन्ही प्राणी त्याचे आवडते खाद्य, त्या शोधात तो आला असावा. या बिबट्याने तर आपल्या या खाद्यासाठी १५-२० किलोमीटरचे अंतर पार केले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कारण काहीही असो, पण तो शहरात दाखल झाला ही वस्तुस्थिती झाली. 

प्राण्याची भूक त्याला खाद्य मिळाले की भागते. पण मनुष्यप्राणी मात्र सदैव कुठल्या ना कुठल्या खाद्याच्या शोधातच असतो. त्यातूनच आपला गाव-शहरातला वावर अगदी जंगलापर्यंत पोचला. लोकसंख्या वाढली आणि आहे ते आपले क्षेत्र आपल्याला कमी पडू लागले. साहजिक आपण विस्तार करू लागलो. जंगलतोड सुरू झाली. झाडे - टेकड्या फोडल्या जाऊ लागल्या... आणि गंमत म्हणजे, निसर्गाची अशी हानी करून पुन्हा जाहिराती येऊ लागल्या - निसर्गरम्य परिसरात आपले घर बुक करा! असा विरोधाभास ‘माणूस’ या प्राण्याच्या वागण्या आणि बोलण्यातच आढळतो. बाकीचे प्राणी अल्पसंतुष्ट असतात. आपल्या गरजा भागल्या की शांत असतात. पण आता माणसाने इतका अतिरेक केला आहे, की हे वन्यप्राणी स्वतःच्याही नकळत असे मानवी प्रदेशात अतिक्रमण करतात. पण याला अतिक्रमण म्हणायचे का? अंतर्मुख होऊन आपण विचार करायला हवा.     

संबंधित बातम्या