तिला जखडू नका... 

ऋता बावडेकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

संपादकीय
 

स्त्रीच्या - बाईच्या जबाबदाऱ्या असतात तरी कोणकोणत्या.. आणि किती? इंग्रजीत म्हणतात ना, ‘You name it..’ अगदी त्याप्रमाणेच ‘तुम्ही फक्त उच्चार करा.. आणि ती जबाबदारी स्त्रियांची’ अशी आजही परिस्थिती आहे. तसेच या जबाबदाऱ्या किती टोकापर्यंत जाऊ शकतात, याचीही काही मर्यादा नसते. त्यामुळे ‘केली जबाबदारी निर्माण, टाक स्त्रियांच्या अंगावर’ अशी स्थिती आहे. मुलगा जर बिघडला असेल, चुकीच्या मार्गाला लागला असेल तर त्याला सुधारण्यासाठी त्याचे लग्न लावून दिले जाते.. आली आणखी एक जबाबदारी? अर्थात ही प्रथा (?) आजची नाही, पण अजूनही चालते आहे. 

या संदर्भात केरळच्या जसिन बाकर यांनी एक फार सुंदर पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिली आहे. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. तरी इथे त्याचा सारांश देत आहे... 

‘आपल्या समाजात पूर्वीपासूनच महिलांकडून अगदी अवास्तव अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. बायकांनी सुंदरच असायला हवे, इथपासून या अपेक्षा सुरू होतात. त्यांना स्वत्व नको, स्वतःचे मत नको, त्यांनी सतत पडती बाजू घ्यायची, उंच स्वरात बोलायचे नाही, उलटून बोलायचे नाही. मात्र, एवढे करून आपल्या बिघडलेल्या नवऱ्याला त्यांनी सुधारायला हवे. तसे नाही घडले तर या बायकांनाच त्याचा दोष दिला जातो. आपण जरी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत असलो, ही समानता आहे असे मानत असलो, तरी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्या घरी कामाला येणाऱ्या बाईबरोबर बोलताना तर मला हे प्रकर्षाने जाणवले.. 

‘माझा मुलगा दारू पितो. पण माझी सून काही कामाची नाही, त्याला ती सुधारू शकली नाही. लग्न करून येणारी बाई तिच्या नवऱ्याला सुधारू शकली तरच ती चांगली सून असते. तुम्ही चांगले असले पाहिजे, चांगले वागले पाहिजे. कारण एक दिवस तुम्ही लग्न होऊन सासरी जाणार असता. आता बघा ना, आठ वर्षे झाली लग्नाला पण ती काही माझ्या मुलाला सुधारू शकली नाही,’ बाई माझ्याकडे तक्रार करत म्हणाली. ‘तू २८ वर्षे काय करत होतीस?’ मी तिला विचारले. तिने माझ्याकडे प्रश्‍नार्थक नजरेने बघितले. ‘लग्नापूर्वी २८ वर्षे हा मुलगा तुझ्याकडे होता. त्याला सुधारण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस?’ मी पुन्हा विचारले. ‘मी त्याची आई आहे. मला मर्यादा आहेत, तो माझे ऐकत नाही. पण ती त्याची बायको आहे आणि त्याला सुधारणे हे तिचे कर्तव्य आहे. पुरुष हे कैरीसारखे असतात. बायको चांगली असेल तर या कैरीचा चांगला आंबा होतो. पण बाई वाईट असेल हा आंबा सडून जातो,’ तिने तिचे अगाध तत्त्वज्ञान ऐकवले. ‘तुझा मुलगा दारुडा आहे, हे तुम्ही लग्नाआधी सुनेला सांगितले होते का?’ मी विचारले. ‘नाही. मला वाटले लग्नानंतर ती त्याला सुधारेल,’ ती निर्विकारपणे म्हणाली. ‘तसे असेल, तर नासका आंबा तिच्या पदरात टाकल्याबद्दल सुनेने तुम्हाला कोर्टात खेचले पाहिजे,’ माझ्या या म्हणण्यावर ती माझ्याकडे बघतच राहिली. 

बायको होणे एकवेळ सोपे असते, पण आपल्या समाजात तिच्यासाठी जे मापदंड आखलेले असतात, त्यानुसार चालणे तिच्यासाठी अवघड; प्रसंगी जीवघेणे असते. सून म्हणून तिच्याकडून इतक्‍या अपेक्षा केल्या जातात की ती कोणी स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला मन आहे, इच्छा-आकांक्षा आहेत हे आपण विसरूनच जातो. खरे तर असे काही एखाद्याला - त्यातही बाईला वाटू शकते, हे आपल्या गावीही नसते. ती कोणाची तरी बायको होऊन घरी आली, की तिची कर्तव्ये (?) तिने पार पाडायला हवीत, एवढी एकच अपेक्षा उरते. या कसोटीला ती उतरली तर ती चांगली बायको, नाही तर वाईट बायको असे शिक्के ठरलेले असतात. आपल्या समाजाच्या या मानसिकतेमुळे मुलगी जन्मली की तिला चांगले माणूस म्हणून घडवण्यापेक्षा ‘चांगली सून’ होण्याचे तिचे प्रशिक्षण सुरू होते. खरे तर कोणत्याही वयात मुलग्यांपेक्षा मुली अधिक समजूतदार असतात. त्यामुळे तिला मिळणाऱ्या या ‘प्रशिक्षणा’तला ५० टक्के भाग मुलग्यांवर खर्च केला तर चांगले मुलगे घडू शकतील. ती सध्याची महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे सर्व स्तरांतील पालकांनी आपापल्या मुला-मुलींना समानतेने वाढवायला हवे. दोघांवर सारखे संस्कार करायला हवे. ‘चांगले वागण्या’ची जबाबदारी केवळ मुलीचीच का? मुलगे चांगले वागले तर कितीतरी समस्या सुटू शकतील, हे लक्षात घ्यायला हवे.’ 

आपल्या या मनोगतात जसिन एक फार सुंदर वाक्‍य लिहितात, ‘मुलींनी एक लक्षात घ्यावे की बिघडलेल्या नवऱ्यांना सुधारण्याचे तुम्ही पुनर्वसन केंद्र नाही. त्याला सुधारणे हे तुमचे काम नाही. तुम्हाला पार्टनर हवा आहे, प्रोजेक्‍ट नको..’ 

अगदी खरे आहे.. 

जसिन या केरळच्या असून ‘पेरेंटिंग स्ट्रॅटेजिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट’ आहेत. 

पूर्वीपासूनच मुलींवर अशी खूप बंधने लादली जात आहेत. कालांतराने अनेक मुली-महिलांनी आपले स्वतंत्र मार्ग धुंडाळले, त्यात त्या यशस्वी झाल्या. पण ही उदाहरणे फार कमी आहेत. एकविसाव्या शतकात तर ही संख्या वाढायला हवी. आपल्या मुलींना स्वच्छंदपणे आकाशात भरारी मारू द्यावी. आपले भलेबुरे त्यांना कळत असते. आपल्या मुलींना असे बांधून ठेवण्यापेक्षा, पालकांनी आपल्या संस्कारांवर अधिक विश्‍वास ठेवावा. कोमेजल्या मुलींपेक्षा बहारदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आपल्या मुलींना बघणे अधिक आनंददायी असते...  

संबंधित बातम्या