‘शहाण्या मुलीं’चे काम

ऋता बावडेकर
सोमवार, 11 मार्च 2019

संपादकीय
 

मासिक पाळी या विषयावर बोलणे सोडा, तो शब्द उच्चारणेही आपल्याकडे योग्य समजले जात नाही. वर्षानुवर्षे ही परिस्थिती आहे. वास्तविक, मुलगी वयात आली किंवा ‘मुलगी शहाणी झाली’ असा फार छान उल्लेख पूर्वी होत असे. पण त्याचा दुसरा भाग म्हणजे, ती लग्नायोग्य झाली किंवा आधीच लग्न झाले असेल तर ती सासरी जाण्यायोग्य झाली असे समजले जाई. त्यामुळे ‘शहाणी’ होऊनही तिने काय करायचे तर ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ हेच. पण तेव्हाही आणि अगदी आजपर्यंत मासिक पाळीचा जाहीर उल्लेख कोणी करत नाही. त्याचे कारण संकोच आणि मुख्य म्हणजे ते समाजसंमतही मानले जात नाही. शहरांमध्ये ही स्थिती असेल तर गावांत, खेड्यापाड्यांत काय अवस्था असेल याची कल्पना केलेलीच बरी... 

मासिक पाळी आणि त्याबाबत पाळले जाणारे मौन, त्यासंदर्भात असलेले समज-गैरसमज याबाबत अलीकडे बोलले जाऊ लागले. महिलांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ लागले. या प्रयत्नांना माध्यमांनी, समाज माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. अशाच एका प्रयत्नावर आधारित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अक्षयकुमारने काढला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. असे खूप प्रयत्न अनेक प्रांतांतील गावागावांत, खेड्यापाड्यांत होताना दिसतात, ही चांगली बाब म्हणायला हवी. 

हा विषय पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ऑस्कर पुरस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून ‘फॉरिन लॅंग्वेज फिल्म’ या विभागात आपले चित्रपट भारतातर्फे पाठवण्यात येत आहेत. ‘मदर इंडिया’ आणि ‘लगान’चा अपवाद वगळता आपला एकही चित्रपट अंतिम पाच चित्रपटांपर्यंत पोचलेला नाही. मात्र सत्यजित राय यांच्यापासून ए. आर. रेहमान यांच्यापर्यंत अनेकांनी वैयक्तिक स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. हे वर्ष चित्रपटांच्या बाबतीत थोडे वेगळे ठरले. भारतीय निर्माती गुनित मोंगा यांनी निर्माण केलेल्या ‘पिरीयड-एंड ऑफ सेंटेन्स’ या माहितीपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. फरक एवढाच की हा पूर्ण लांबीचा चित्रपट नसून माहितीपट आहे. पण अर्थातच त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. 

या माहितीपटाचा विषय मासिक पाळी आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तसेच योग्य मार्गदर्शनामुळे या दृष्टिकोनात झालेला सकारात्मक बदल हा आहे. यासाठी निर्मातीने भारतीय पार्श्‍वभूमी निवडली आहे. दिल्लीपासून केवळ ६० किलोमीटर दूर असलेल्या हापूडमधल्या काठीखेडा या गावाची. दिल्लीपासून फक्त साठ किलोमीटर दूर, मात्र गावातील वातावरण दिल्लीच्या एकदम विरोधी. तिथल्या स्वातंत्र्याचा येथे लवलेशही नाही. त्यामुळे पाळीचा विषय काढताच इथल्या महिला मुली लाजून मान खाली घालतात. पदरात चेहरा लपवतात. पाळी म्हणजे काहीतरी घाणेरडे, अपवित्र मानतात. एवढे कशाला, या विषयावर बोलायचेच टाळतात. त्याबद्दल काहीही माहिती नाही. या दिवसांत आरोग्य कसे सांभाळायचे याची तर जाणीवही नाही. पाळीमुळे मुली शाळेत जात नाहीत. अनेकींनी तर त्यामुळे शिक्षणच सोडून दिलेले आहे. या माहितीपटाची ही पार्श्‍वभूमी आहे. या अनेक मुली-महिलांना पाळी कशामुळे येते हेच जिथे माहिती नाही तिथे त्यांना ‘पॅड’बद्दल माहिती असणे शक्‍यच नाही. टीव्हीवर कधीतरी हा शब्द त्यांनी ऐकलेला असतो. माहितीपटात हे सगळे वातावरण येते. संकोच, शरम या टप्प्याने या माहितीपटाचा प्रवास होतो. शरमेने गप्प बसणाऱ्या मुली ते नंतर आत्मविश्‍वासाने बोलणाऱ्या मुली हा प्रवास थक्क करणारा आहे. मंदाकिनी कक्कर या मुली-महिलांना बोलते करतात. मग या गावात पॅड्‌स तयार करण्याचे मशिन येते. पॅड्‌स कसे तयार करायचे हे या मुली-महिला शिकतात व तसे करू लागतात. सुरुवातीला या विषयावर बोलायलाही तयार नसणाऱ्या या मुली नंतर हे काम मन लावून करू लागतात. पुरुषही या कामात सहभागी होतात. हे तयार केलेले पॅड्‌स विकण्याची वेळ येते. तेव्हा घरोघर जाऊन ते विकण्याची जबाबदारी मुलीच स्वीकारतात. माहितीपटाच्या सुरुवातीला संकोचलेल्या मुली-महिलांचे रूपांतर शेवटी आत्मविश्‍वास लाभलेल्या मुलींमध्ये कसे होते, हे या फिल्ममध्ये फार सुंदर दाखवले आहे. रेका झेहटाबची यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

मासिक पाळी आणि भारतीयांची मानसिकता या विषयावर आतापर्यंत अनेक वेळा लिहून झाले आहे. काळ जसा पुढे जातो आहे, तसे या विषयावर मोकळेपणाने बोलणे कमी कमी होत असल्याचे जाणवते आहे. तसे बघायला गेले, तर हा विषय अतिशय खासगी आहे. एखाद्या दुर्दैवी स्त्रीचा अपवाद वगळता सर्व स्त्रियांच्या आयुष्याचा भाग; त्याची जाहीर चर्चा व्हावी असे यात काही नाही. पण याकडे निरोगीपणे बघितले जायला हवे. या काळात स्वच्छता पाळायला हवी. आरोग्य जपायला हवे. पण नेमके हेच होताना दिसत नाही. पॅड्‌स परवडत नाहीत म्हणून अजूनही अनेक स्त्रिया कापडी फडकीच धुऊन वापरतात. त्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात. याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याबद्दल लेखनही सुरू झाले. 

एक जीव जन्माला घालण्याची ताकद असलेल्या या पाळीबद्दल मात्र अजूनही खूप समज-गैरसमज आहेत. नकारात्मकता अधिक आहे. ‘पिरीयड - एंड ऑफ सेंटेन्स’सारखा माहितीपट सकारात्मक दृष्टिकोन देण्याचे काम करतो. गुनित मोंगासारख्या ‘शहाण्या मुलीं’चे हे काम, ते वाढायला हवे...   

संबंधित बातम्या