छळ कधीतरी थांबेल? 

ऋता बावडेकर
सोमवार, 18 मार्च 2019

संपादकीय
 

हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र अजूनही ही प्रथा सुरूच असल्याचे दिसते. अनेक ठिकाणी ती उघडपणे सुरू आहे, तर त्याहून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोंडस नावाने हुंडा देणे-घेणे सुरूच आहे. या हुंड्याचे टोकाचे दुष्परिणाम म्हणजे विवाहित महिलांची आत्महत्या. यात नवविवाहिता जशा आहेत, तशाच लग्नाला काही वर्षे झालेल्या महिलाही आहेत. केवळ पुण्याबद्दल बोलायचे, तर पोलिस रेकॉर्डनुसार २०१७ मध्ये २०, २०१८ मध्ये १९ आणि २०१९ मध्ये (आतापर्यंत) २ अशा महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्षभरातील हा आकडा अनेकांना कमीही वाटेल, पण नोंदवलेल्या तक्रारींनुसार ही आकडेवारी आहे. 

पूर्वी मुलांचे (म्हणजेच मुलींचेही) विवाह लवकर होत. कधी कधी तर मूल पाळण्यातच असे किंवा मुलीला नहाण येण्याआधी ते होत. त्या वेळी मुलीला स्त्री-धन देण्याची पद्धत होती. तशी काही वेळ आलीच तर मुलीचा संसार उघड्यावर येऊ नये. तिला काही अडचण येऊ नये म्हणून मुलीकडचे हे स्त्री-धन तिला देत.. आणि खरोखरच ते धन केवळ तिचेच असे. त्यावर तिचाच हक्क असे. पण पुढे पद्धत तीच राहिली, पण महिलांचा आपल्या स्त्री-धनावरील हक्क हळूहळू कमी होऊ लागला. कधी घरासाठी, कधी नवऱ्यासाठी, कधी शेतीवाडीसाठी, कधी मुलांसाठी.. अशा असंख्य वाटा त्या धनाला पडू लागल्या. कधी गोड बोलून, कधी दरडावून, तर कधी चक्क फसवून असे प्रकार होत असत. ज्या महिला खमक्‍या होत्या, त्यांना काही अडचणी आल्या नाहीत किंवा त्यांनी अडचणींना धीटपणे तोंड दिले. ज्या मऊ होत्या, त्या या भूलथापांना बळी पडल्या. नंतर तर थेटच हुंडा देणे-घेणे सुरू झाले. चांगल्या उद्देशाने मुलींना दिलेल्या स्त्री-धनाला वाईट स्वरूप आले. नंतर या प्रकाराने इतके वाईट वळण घेतले की अनेक मुलींचे बळी या हुंड्याने घेतले. 

इतक्‍या वर्षांनंतरही या प्रकारात फरक पडलेला दिसत नाही. प्रमाण कदाचित कमी झाले असेल, पण हुंडा देणे-घेणे सुरूच आहे, असे दिसते. दैनिक ‘सकाळ’ने ‘हुंड्यामुळे दोन वर्षांत चाळीस विवाहितांची आत्महत्या’ या शीर्षकाची बातमी केली आहे. शिकल्या-सवरलेल्या पूजाला मंगळ असल्याचे सांगून त्याची शांत करण्यासाठी तिने माहेरहून तीन लाख रुपये आणावेत, असे तिच्या सासरच्यांनी सांगितले. जादूटोण्याद्वारे तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. दुसऱ्या घटनेत फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणावेत असा गीताचा छळ सुरू झाला. या छळाला कंटाळून दोघींनीही आत्महत्या केली. अशी असंख्य उदाहरणे आहेत. केवळ गेली दोन वर्षे बघितली तरी नोंद झालेल्या घटनाच चाळीसच्या आसपास आहेत. हा आकडाही कमी नव्हे. केवळ पैशाच्या लालसेपायी - लोभापायी या जिवांचा आणि काही अज्ञात जिवांचा बळी गेला आहे. 

‘विवाहितांना सासरच्या लोकांकडून त्रास दिला जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यादृष्टीने महिला सहाय्यता कक्षाच्या पोलिस अधिकारी-कर्मचारी व समुपदेशकांच्या मदतीने सासरच्या लोकांना समजावून सांगितले जाते. न ऐकल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. पीडित महिला व कुटुंबांच्या दर शनिवारी बैठका घेऊन पोलिस ठाण्यांच्या पातळीवर हा प्रश्‍न सोडविण्यास आम्ही प्राधान्य देतो,’ अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. समाजाचा हा प्रश्‍न, त्याची व्याप्ती बघता हे प्रयत्न अर्थातच पुरेसे नाहीत. या प्रयत्नांना समाजाचीही साथ मिळायला हवी. त्यामुळे ‘केवळ कष्टकरी वर्गातच नाही, तर उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही विवाहितांचा वेगवेगळ्या कारणांमुळे शारीरिक व मानसिक छळ होत असतो. त्यासाठी पैसा, चारित्र्य, मानपान, आजार अशी वेगवेगळी कारणे असतात. विवाहितांचे हे छळ थांबविण्यासाठी पोलिसांबरोबरच समाजानेही सजगता आणि क्रियाशीलता दाखवायला हवी,’ हे ‘भगिनी हेल्पलाइन’च्या संचालक ॲड. सुप्रिया कोठारी म्हणणे पटते. 

वास्तविक, महिलांसाठी आज अनेक कायदे आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना घडायलाच नकोत. पण दुर्दैवाने, या कायद्यांची माहिती सगळ्या महिलांपर्यंत अजून पोचलेली नाही किंवा ही माहिती असूनही काही कारणांमुळे या महिला-मुली कायद्याचा आधार घ्यायला पुढेच येत नाहीत. याउलट या कायद्याचा दुरुपयोगही होताना दिसतो. काही महिला या कायद्याचा धाक दाखवून सासरच्या मंडळींना छळत असतात. या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. मुलींनी आपला किंवा तिच्या घरच्यांनी आपल्या मुलींचा जीव हकनाक जाऊ देण्याऐवजी कायद्याची मदत घ्यायला हवी. घाबरून गप्प बसू नये. तसेच कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या महिलांनीही त्यांचे हे उद्योग थांबवावेत. कारण त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याही नकळत इतर महिलांना त्रास होत असतो. सरसकट समस्त महिला वर्ग बदनाम होत असतो. 

खरे तर हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळेच ‘हुंडा’ असे न म्हणता, त्याला ‘मुलाला शिक्षणाला मदत’, ‘घरासाठी खर्च’ वगैरे गोंडस नावे दिली जातात. तर ‘हे सगळे तुमच्या मुलीचेच तर आहे..’ असेही म्हटले जाते. पण हे सगळे तो मुलगा किंवा त्याच्या घरचे करू शकत नाहीत का? त्यासाठी मुलीकडचाच पैसा कशासाठी हवा असतो? 

समाजाची आजची परिस्थिती बघितली, तर मुली खूप शिकताहेत. (अर्थात, असंख्य मुली त्याला अपवादही आहेत, कारण त्यांना ही संधीच नाकारली जाते.) त्या तुलनेत त्यांच्या इतके शिकणाऱ्या मुलांची संख्या बरीच कमी आहे. यामुळे येणाऱ्या न्यूनगंडातून तर भरमसाट हुंडा मागितला जात नसेल? तसे असेल, तर केवळ पोलिस, वकील याला अटकाव करू शकणार नाहीत. तर समाजानेच आपली जबाबदारी उचलायला हवी. स्वतःबरोबरच इतरांचीही अशी मानसिकता बदलायला हवी. सांगणे सोपे आहे, पण मुलींनीही धीट व्हायला हवे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणापासूनच तसे वागवायला हवे. कोणाच्या लोभासाठी आपला जीव का द्यावा?   

संबंधित बातम्या