नाती फार सुंदर असतात

ऋता बावडेकर
सोमवार, 25 मार्च 2019

संपादकीय
 

जगात खूप नाती आहेत. काहींना नाव आहे, काही अनामिक आहेत. आई, वडील, भावंडे, इतर नातेवाईक, मित्र-मैत्रिणी वगैरे वगैरे.. आपण म्हणू तितकी ही नाती सांगता येतील. यात एक नाते नवरा-बायकोचेही असते. इतर नातीही महत्त्वाचीच असतात, पण हे नाते किंचित अधिक महत्त्वाचे असते. सगळ्या संसाराचा डोलारा या नात्यावर उभा असतो असे म्हटले तरी हरकत नाही. थोडी अतिशयोक्ती वाटेल, पण नीट विचार केला तर या दोन घटकांवर इतर नाती टिकणे वगैरे गोष्टी अवलंबून असतात, हे अनुभवी लोकांना लगेच पटेल. त्यामुळेच या नात्याला किंचित अधिक महत्त्वाचे स्थान दिले आहे. 

पण अलीकडे या नात्यांत काही कुरबुरी जाणवू लागल्या आहेत. तसे बघितले तर प्रत्येक नात्यांत त्या थोड्याफार प्रमाणात असतातच. नवरा बायकोच का, कोणीही दोन माणसे एकत्र आली की कधीतरी वाद होणारच, सतत गुण्यागोविंदाने कोणी राहू शकत नाही. मतभेद असणारच, पण ते किती ताणायचे यावर नात्याचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळेच बुजुर्ग म्हणतात ना, एक ओरडला तर दुसऱ्याने गप्प बसावे. दुसरा चिडला तर पहिल्याने शांत राहावे. नाते असेच टिकते. पण म्हणून एकाने सतत ओरडावे आणि दुसऱ्याने गप्प ऐकून घ्यावे हेही योग्य नाही. त्याला नाते टिकवणे म्हणत नाहीत तर गप्प बसणाऱ्यांची अगतिकता म्हणतात. हे नाते कधीच फुलत नाही. 

नाते कोणतेही असो ते फुलण्यात मजा असते. इतर कोणत्याही नात्यापेक्षा नवरा बायकोंचा संबंध सतत येत असतो. त्यामुळे हे नाते थोडे अधिक महत्त्वाचे. पण अलीकडे या नात्यांत काही प्रमाणात कुरबुरी जाणवू लागल्याचे चित्र आहे. त्याला खूप गोष्टी कारणीभूत आहेत. बदललेला समाज किंवा सामाजिक परिस्थिती हे एक कारण आहे. समाज खूप बदलला आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मुली आता खूप शिकू लागल्या आहेत. दुर्दैवाने शिक्षण नाकारल्या जाणाऱ्या मुली अजूनही समाजात दिसत असल्या तरी शिकणाऱ्या मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्या केवळ शिकून थांबत नाहीत. त्याप्रमाणे नोकरी-व्यवसाय करतात. आर्थिकदृष्ट्या त्या कोणावरही अवलंबून नसतात. साहजिकच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्‍वास दिसू लागतो. मुलगेही शिकतात, पण अनेकदा मुलींच्या तुलनेत मुलांचे शिक्षण कमी असते. साहजिकच त्यांचे उत्पन्नही कमी असते. अलीकडे नवराबायकोंत कुरबुरी वाढण्याचे हे एक कारण असल्याचे समोर आले आहे. समजून लग्न करतात किंवा होते, पण नंतर बायकोचा अधिक पगार खटकू लागतो. तर तीही आपल्या जास्तीच्या पगाराचा तोरा मिरवू लागते. प्रेमविवाहात तर सगळेच समजून उमजून केलेले असते. पण तिथेही याच कारणांमुळे खटके उडतात. नवरा अधिकसाठी काही प्रयत्न करत नाही, हे कारण बायकोचे असू शकते. 

वरवर बघता कोणीही म्हणेल, एवढा इगो - अहंकार कशासाठी? खरेही आहे. पण रोजची लढाई लढताना असे होत असेल. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर खटके हे उडणारच. अशावेळी समजुतीने घ्यायला हवे. पण हे वय असे असते की समजून कोणी घ्यायचे? आणि किती वेळा असे मुद्दे उपस्थित होऊ लागतात. 

अशावेळी मोठ्या - जाणत्या लोकांची गरज भासू लागते. घरातील वडीलधारी, आईवडील हे काम करू शकतात. पण अलीकडे असे लक्षात येऊ लागले आहे की मुलाच्या किंवा मुलीच्या आयांचीच आपापल्या मुलांच्या संसारात खूप लुडबूड सुरू आहे. मुलगा ताब्यात राहावा म्हणून त्याची आई जंग जंग पछाडते. बायकोविरुद्ध त्याचे कान भरते. सतत तक्रारी करते. सुनेला घालून पाडून बोलणे तर नित्याचे असते. तिने नोकरी करावी ही अपेक्षा असतेच पण बरोबरीने घरातील सगळी कामे, वेळप्रसंगी कुळाचार सांभाळावेत हीदेखील अपेक्षा असते. नोकरी सांभाळून एवढे सगळे करणे खरेच शक्‍य नसते. मग अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की वाद ठरलेलेच. एखाद्या दिवशी हे वाद प्रचंड विकोपाला जातात. दुसऱ्या बाजूला मुलीची आई आपल्या मुलीच्या संसारात नको इतकी लक्ष घालत असते. कसे वागायचे, कसे नाही हे तिला सतत फोनवरून वा प्रत्यक्ष सांगत असते. घरांत नणंद किंवा दीर असेल तर विचारताच सोय नाही. तू कशाला काम करतेस? ती का नाही काही करत? वगैरे वगैरे... 

हे सगळे प्रकार इतके पराकोटीला जातात, की एक दिवस ठिणगी पडते आणि भडका उडतो. हा भडका ज्यांनी शांत करायचा, तेच त्यात तेल ओतत असतात. मग अनेकदा मनात नसतानाही नवरा बायकोच्या नात्यांत दुरावा येतो. तुटेपर्यंत ताणले की असेच होणार. पण म्हणूनच तुटेपर्यंत ताणावेच का? 

या प्रश्‍नाचे उत्तर शोधायला हवे. ते मिळाले की अनेक गोष्टी मार्गी लागतील. त्यासाठी समजूतदारपणा हवा. तो कुठून आणायचा? खरे तर मोठ्या लोकांचा संसार करून झालेला असतो. त्यांनी आता नवीन मंडळींना मोकळे सोडायला हवे. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यायला हवेत. पण मोह कोणाला सुटला आहे? संसारातून बाहेर पडण्याच्या वयात मंडळी (इतरांच्या) संसारात स्वतःला अडकवू पाहात असतात. परिणाम हेच होणार. त्यामुळे तरुण मंडळींनी केवळ शिक्षण घेऊ नये तर व्यवहारज्ञानही शिकावे. आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे सगळ्यांना समजायला हवे. आतापर्यंत योग्य असलेली गोष्ट लग्नानंतरही योग्यच असेल असे नाही. हे लक्षात घ्यायला हवे. समजूतदारपणा दाखवायला हवा. मीच का? याऐवजी मीच का नाही? असाही प्रश्‍न कधीतरी स्वतःला विचारायला हवा. तसेच कसलेही हिशेब न ठेवता आपले नाते टिकवण्याचे प्रयत्न करायला हवेत. ते दोन्ही बाजूंनी व्हायला हवेत. कारण नाते फार सुंदर असते. खूप मोठा आधार ते परस्परांना देत असते. समाजात टिकायला मदत करत असते. ते टिकवायलाच हवे...   

संबंधित बातम्या