उन्हाळा सुसह्य करूया... 

ऋता बावडेकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

संपादकीय
 

आरोग्याची काही कुरबूर असेल तर आपण डॉक्‍टरकडे जातो. तपासल्यावर बरेचदा औषधोपचार सांगताना ‘भरपूर पाणी प्या’ असे डॉक्‍टर सांगतात. जवळ जवळ ७५ टक्के पाणी व तत्सम द्रवपदार्थ असणाऱ्या मानवी शरीराला उन्हाळ्यात तर पाण्याची गरज अधिकच भासते. त्यामुळे अनेकजण डॉक्‍टरी सल्ल्याशिवायही किमान उन्हाळ्यात तरी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवतात. 

पावसाळा, हिवाळा, उन्हाळा.. प्रत्येक ऋतूची वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी उन्हाळ्यात तळपते ऊन असले, तरी विविध गोष्टींचे आकर्षण असते. एकतर उन्हाळ्यात मोठ्या सुट्या असतात. त्यामुळे सहलींचे आयोजन होत असते. भटकंती होत असते. आंबा हे एक फार मोठे आकर्षण उन्हाळ्यात असते. त्याबरोबरच इतर फळेही असतात, पण फळांचा राजा आंबा, आपले सर्वोच्च स्थान अजूनही टिकवून आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची फुलेही आजूबाजूला, बाजारात बघायला मिळतात. बहावा फुलतो. उन्हाळ्यात बहावा फुलला, की त्या वर्षी पाऊस चांगला होतो, असे म्हणतात. पण सृष्टीची ही रंगपंचमी बघा.. एरवी लाल, जांभळा, पिवळा हे डोळ्यांना थोडे त्रास देणारे रंग झाडांवरील फुलांच्या रूपात नजरेला - डोळ्यांना विलक्षण थंडावा देतात. 

उन्हाळ्यातील कपडेही वेगळेच असतात. प्रामुख्याने पांढऱ्या, सुती किंवा फिक्‍या रंगांच्या कपड्यांना मंडळी पसंती देतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यावी लागते. केसांची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याची फॅशनही वेगळीच असते. त्वचा रापू नये म्हणून टोप्या, हॅट्‌स, स्कार्फ, सनकोट्‌स यांचा वापर वाढतो. आहारातही मसालेदार पदार्थांची जागा पोटाला थंडावा देणारे पदार्थ घेतात. शीतपदार्थ, शीतपेये, उसाचा रस, लिंबू-कोकम सरबते, ताक वगैरे पदार्थांचे सेवन वाढते. आरोग्याची अशी काळजी उन्हाळ्यात घ्यायलाच लागते. 

उन्हाळ्याच्या या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असणारा ‘सकाळ साप्ताहिका’चा हा ‘उन्हाळा विशेष’ अंक आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सुमारे ७५ टक्के पाणी असणाऱ्या आपल्या शरीराला पाणी पुरवले नाही, तर अनर्थ होऊ शकतो. निर्जलीकरण अर्थातच डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. डॉ. अविनाश भोंडवे यांनी यासंदर्भातील त्यांच्या लेखात या प्रकाराचा ‘शरीरातला पाण्याचा दुष्काळ’ असा उल्लेख केला आहे. जुलाब, उलट्या, ताप, घाम येणे मूत्रविसर्जन, मधुमेह, भाजणे, एखादी शस्त्रक्रिया अशी बरीच कारणे डिहायड्रेशनसाठी असतात. या लेखात त्याची लक्षणेही सांगण्यात आली आहेत. डिहायड्रेशनचे दुष्परिणाम सांगतानाच प्रतिबंधक उपाय - उपचारांचीही माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली आहे. 

अनेक गोष्टींतून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल लागत असते. हवेतील उष्मा हे पहिले लक्षण होय. निसर्गात फुलणारी विविध फुले, झाडे या कडक उन्हातही नजरेला थंडावा देत असतात. कदाचित पावसाळ्यांतही दिसणार नाहीत, इतकी फुलझाडे या काळात दिसतात. पुणे-मुंबई रस्त्यावर एक फेरफटका मारला तरी हे लक्षात यावे. आंबे, कोकम, विविध रानमेवा ही या काळाची वैशिष्ट्ये म्हटली तरी वावगे ठरणार नाही. 

या काळात कपड्यांची बाजारपेठही फुललेली दिसते. या काळात कपड्यांच्या विविध फॅशन्स बघायला मिळतात. पोशाखांत तर विविधता असतेच, पण वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्‌सही बाजारात उपलब्ध असतात. पुण्यात तसे बारा महिने स्कार्फ असतात, पण उन्हाळ्यात त्यांना विशेष मागणी असते. सनकोट्‌स बाजारात येतात. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लेअर्स किंवा गॉगल्स असतात. जाई, मोगरा, अबोली अशी विविध फुले ठिकठिकाणी दिसू लागतात. या सगळ्याचा उल्लेख या अंकात आहे. 

उन्हाळ्यात केस आणि त्वचेची मात्र विशेष काळजी घ्यावी लागते. कडक उन्हामुळे या दोन्हींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणती लोशन्स वापरावीत, कोणते शॅम्पू वापरावेत, घरगुती उपाय काय करावेत याविषयी मार्गदर्शन करणारा लेखही अंकात आहे. 

 मात्र, उन्हाळा म्हणजे एवढेच नव्हे. उन्हाळ्यात सर्वाधिक वेदना देणारे दोन महत्त्वाचे विषय म्हणजे पाणीटंचाई आणि दुष्काळ. दुष्काळाच्या झळा वास्तविक सगळ्यांनाच बसतात. पण ग्रामीण किंवा दुर्गम भागात त्या अधिक जाणवतात. अर्थात, त्याचे चटके सगळ्यांनाच बसतात. पाणीटंचाईही अशीच या भागांत अधिक जाणवते. अनेक गावांत तर हिवाळा संपण्याआधीच पाण्याचे टॅंकर्स सुरू होतात. महिला-मुलींना दूरदूर जाऊन पाणी भरावे लागते. दिवसातला त्यांचा सर्वाधिक वेळ त्यात जातो. एवढे करून गरज भागतच नाही. अलीकडे सरकार आणि स्वयंसेवी संस्था मिळून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारखे काही प्रयत्न करतात. पण हे प्रयत्न अर्थातच तोकडे आहेत. त्यात वाढ व्हायला हवी. ‘माझी गरज तर भागली’ असा विचार न करता प्रत्येकाने आपला वाटा उचलून समाजाला मदत करायला हवी. उन्हाळा सुसह्य करायला हवा. 

संबंधित बातम्या