असे बळी कशासाठी? 

ऋता बावडेकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

संपादकीय
 

माणसांना काय झाले आहे, तेच कळेनासे झाले आहे. ते कधी कसे व्यक्त होतील काहीच नेम नाही. काही वेळा ते ठीकही असते, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा.. कोण कधी कसे वागेल, याचा अंदाज करायचा तरी कसा? पण हा माणूस एवढा हिंसक का होतो? टोकाची प्रतिक्रिया कशी देतो? तेही किती काळानंतर याबद्दल काय बोलावे? सगळेच अनाकलनीय आणि दुःखद. चिंता करायला लावणारे. 

सध्या लोकसभा निवडणुकांची हवा आहे. आचारसंहिताही लागू आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा अतिशय दक्ष असते. मात्र, असे असतानाही पंजाबमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात भरदिवसा एका महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे स्वाभाविकच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. या हत्येत ड्रग माफियांचा हात असल्याचा आरोप झाल्याने गांभीर्य अधिकच वाढले आहे. पंजाबला पडलेला अमली पदार्थांचा विळखा किती घट्ट आहे आणि आपल्या मार्गात येणाऱ्यांचा काटा काढण्यापर्यंत या माफियांची मजल जाऊ शकते, हेही यावरून पुन्हा एकदा दिसून आले. 

पंजाबमधील नेहा शुरी (वय ३६) या ‘एफडीए’मध्ये अधिकारी होत्या. मोहाली जिल्ह्यातील खरड येथे आपल्या कार्यालयात काम करत असताना बलविंदरसिंग नावाचा इसम सुरक्षारक्षकाची नजर चुकवून आत घुसला आणि त्याने नेहा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तेथून पळून जात असताना त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या बलविंदरसिंगच्या औषधांच्या दुकानात अमली औषधे सापडल्याने नेहा यांनी २००९ मध्ये त्याच्या दुकानाचा परवाना रद्द केला होता. त्याचा सूड म्हणून दहा वर्षांनंतर त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तपासानंतर खरे कारण समोर येईलच. नेहा या कॅप्टन कैलाशकुमार शुरी यांच्या कन्या होत. कैलाशकुमार यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता. ‘शत्रूविरुद्ध लढतानाही इतके असुरक्षित वाटले नव्हते,’ कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया अंतर्मुख करणारी आहे. ‘मुलींना शिकवून आपल्या पायावर उभे करा, असे आपण म्हणतो आणि दुसरीकडे त्यांचा भरदिवसा असा खून केला जातो. यातून मुलींनी काय बोध घ्यायचा?’ असा उद्विग्न करणारा सवाल नेहा यांच्या बहिणीने विचारला आहे. खरोखरच काय उत्तर द्यायचे? या सगळ्या प्रकरणात नेहा यांची काय चूक आहे? त्यांनी प्रामाणिकपणे आपले काम चोख बजावले. मग त्यांचा अंत असा का व्हावा? 

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर असे हल्ले होत असतील, त्यात ते बळी जात असतील, तर त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार केवळ सरकारनेच नाही, तर सगळ्यांनीच करायला हवा. असे प्रकार का घडतात? आपली यंत्रणा इतकी पोखरली गेली आहे? इतकी किडली आहे? तसे असेल तर तातडीने हालचाली करायला हव्यात. पण अजूनही यंत्रणेत खूप प्रामाणिक लोक दिसतात. तुलनेत प्रमाण खूपच कमी असले तरी सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली वाटत नाही. मात्र, हे अल्प का होईना प्रमाण कायम ठेवायचे असेल, त्यात वाढ करायी असेल तर त्यांना उभारी येईल, आशा वाटेल अशी पावले उचलायला हवीत. अन्यथा प्रामाणिक लोकांचा सगळ्यावरचा विश्‍वासच उडेल. ही गोष्ट सगळ्यात भयानक असेल. 

नेहा प्रकरणाला दोन पदर आहेत. पहिला त्या स्त्री-महिला असण्याचा. आपल्याकडे अजूनही अनेकांना महिलेने केलेली कारवाई पटत नाही. त्यांना तो स्वतःचा अपमान वाटतो. ती बाई असूनही मला बोलली, हे त्यांच्या भयंकर जिव्हारी लागू शकते. अनेकांना महिला बॉस रुचत नाही. अगदी लहानसे आणि सर्वांच्या परिचयाचे उदाहरण द्यायचे म्हणजे, रस्त्यावर एखाद्या महिलेने ओव्हरटेक केलेलेही अनेकांच्या पचनी पडत नाही. जंगजंग पछाडून तिच्यापुढे जाण्याचा अशा लोकांचा प्रयत्न असतो. वाहतुकीमुळे त्यात यश आले नाहीच तर त्यांना रात्र रात्र झोप लागत नसावी. हा कसला अहंकार? पण तो अनेकांकडे असतो. बलविंदरसिंगच्या मनातही तसे काही नसेल, कशावरून? तसेच नेहा यांच्या बहिणीने उपस्थित केलेला प्रश्‍नही महत्त्वाचा आहे. एकीकडे मुलीला शिकवावे, तिला तिच्या पायांवर उभे करावे असा सगळ्यांचाच रास्त आग्रह असतो. हळूहळू ही गरज प्रत्येकालाच पटू लागली आहे. अशा पार्श्‍वभूमीवर नेहासारखे प्रकरण घडले की सगळ्याबाबतच विनाकारण साशंकता निर्माण होते. महिला सुरक्षित आहेत का? इथून पडणारे प्रश्‍न मग तिला शिकवायचेच कशासाठी? इथपर्यंत पोचतात. ही फार मोठ्या धोक्‍याची सूचना आहे. त्यामुळे संबंधितांनी त्वरित धोका ओळखून पावले उचलायला हवीत. दुसरा पदर म्हणजे, नेहा शुरी प्रामाणिक अधिकारी होत्या. त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते. अशावेळी त्या महिला होत्या की पुरुष असला प्रश्‍न गौण ठरतो. प्रामाणिक अधिकाऱ्याची - माणसाची अशी गत का व्हावी? यामुळे प्रामाणिकपणावरचा विश्‍वास उडू शकतो. त्यामुळे एकतर माणूस अलिप्त होतो किंवा अप्रामाणिक होतो. या दोन्ही गोष्टी यंत्रणेसाठी आणि एकूणच समाजव्यवस्थेसाठी योग्य नाहीत. कारण मूठभर चांगल्या लोकांवरही गाडे व्यवस्थित धावू शकते असे म्हणतात. पण अशा घटनांमुळे या मूठभर लोकांचाच आत्मविश्‍वास डळमळीत झाला तर काय करायचे? यासाठीच संबंधितांनी कठोर, जरब बसवणारी पावले तातडीने उचलायला हवीत. समाज म्हणून आपणही सतर्क - प्रामाणिक राहायला हवे. 
 

संबंधित बातम्या