प्रेम आणि माणुसकी
संपादकीय
एखादे संकट आले, अडचण आली तर कोणाकडे तरी मन मोकळे करणे ही माणसाची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. अर्थातच समोरचा माणूस तेवढा विश्वासाचा हवा. पण ही ओळख करणे महाकठीण असते. कारण माणूस कधी कसा वागेल हे अनेकदा तो स्वतःही सांगू शकत नाही. खूप कमी भाग्यवान असतात, ज्यांना योग्य माणसे भेटतात. अन्यथा चुकीच्या माणसांबरोबर गाठ ठरलेली. अशावेळी जगात खरेच प्रेम असते? माणुसकी असते? विश्वास नावाची चीज असते? असे प्रश्न पडतात. नेमके असे प्रश्न पडतील अशी घटना नुकतीच पिंपरी (जि. पुणे) येथे घडली. त्याबद्दल वाचून माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लहानपणीच आईवडिलांना गमावून बसलेली वैशाली गवळी (वय २५) ही मुलगी मूळची नगर जिल्ह्यातील. आईवडील गेल्यानंतर ती मावशीकडेच राहिली. नंतर शिक्षणासाठी ती पिंपरी-चिंचवडला आली. कुटुंबावर आपला आर्थिक भार नको म्हणून ती एका मॉलमध्ये नोकरीला लागली. तिथे एका तरुणाबरोबर तिची ओळख झाली. तिथे तिला मायेचा ओलावा जाणवला. आतापर्यंत अनुभवलेले अनाथपण, एकटेपण त्याच्या सहवासात ती विसरू लागली. त्याच्याकडे मन मोकळे करू लागली. आपली जीवनकहाणी तिने त्याला सांगितली. आपले मन मोकळे करू लागली. काही दिवसांतच दोघांमध्ये प्रेमाच्या आणाभाका सुरू झाल्या. परस्परांना वचने देण्यात आली.. आणि अशाच एका नाजूक क्षणी तिने आपले सर्वस्व त्याला बहाल केले. त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून ती भावी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागली. पण इथेच ती चुकली.. फसली... कारण नंतर तो मुलगा तिला टाळू लागली. त्याने तिला नकार दिला. इथे ती पूर्णपणे कोलमडली. तरी भाबड्या आशेवर ती त्याला परत परत विनवू लागली. पण तो बधला नाही, त्याच्या घरच्यांनीही तिला उडवून लावले. अखेरचा पर्याय म्हणून ती चिंचवड पोलिस ठाण्यात गेली. पण तिथेही तिला विचित्र वागणूक मिळाली. त्यानंतर मात्र तिचा उरला सुरला धीर खचला. त्या भरात तिने स्वतःकडचे विषारी द्रव्य प्राशन केले. पोटात आग होऊ लागल्याने तिने मैत्रिणीला फोन लावला. सगळे ऐकून मैत्रीण तिथे आली. पण काहीही ऐकून न घेता पोलिसांनी मैत्रिणीवरच राग काढला आणि वैशालीला रुग्णालयात न्यायला तिलाच सांगितले. वैशाली तडफडत होती, पण ‘तो’ आला नाही. अखेर दोन दिवसांनी वैशालीची तगमग थांबली.. सगळेच शांत झाले. या प्रकरणात त्या मुलाप्रमाणेच पोलिस यंत्रणाही असंवेदनशीलपणे वागल्याचे दिसते. विषारी द्रव्य घेतल्याने वैशालीला बोलता येत नव्हते. तिने हे पाऊल का उचलले हा लेखी जबाब मैत्रिणीच्या मदतीने लिहून ठेवला. त्या मुलाबद्दल माहिती असूनही पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्वतःहून गुन्हा दाखल केलेला नव्हता. वैशालीचे नातेवाईक शोधण्यातही ते तत्परता दाखवत नव्हते. त्यामुळे वैशालीचा मृतदेह चार दिवस बेवारस म्हणून शवागृहातच पडून होता. अखेर वैशालीच्या मैत्रिणीमुळेच तिचे नातेवाईक पोलिसांना शोधता आले. मात्र वैशालीवर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या भावाने नकार दिला. त्यामुळे नगर येथील तिच्या मावशीबरोबर पोलिसांनी संपर्क साधला. त्यानुसार तिची मावशी व मावसभाऊ पिंपरीत आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैशालीवर अंत्यसंस्कार केले. एका दुर्दैवी जिवाची अखेर अशी झाली.. दरम्यान तिच्या प्रियकराचे नाव विराज दराडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावर काय कारवाई होईल, होईल का हे येणारा काळच सांगेल. पण ‘माणसां’वर विश्वास ठेवणारी एक मुलगी हकनाक गेली. तिची मैत्रीण मात्र माणुसकीला जागली. आपली मैत्री तिने निभावली. जगात अजूनही काही संपलेले नाही, धुगधुगती का होईना आशा आहे, असे वाटायला लावणारे हे या मैत्रिणीचे वागणे आहे.
पण मुळात अशी वेळच एखादीवर किंवा एखाद्यावर का यावी? आपल्या दुःखांनी, वेदनांनी गांजून गेल्यावर स्वाभाविकपणे व्यक्तीला कोणाकडे तरी विश्वासाने बोलावेसे वाटते. तो काही गुन्हा नाही, तर त्या व्यक्तीचा विश्वासघात करणे हा अपराध आहे. सतत खंबीर राहून एखाद्या अजाण क्षणी माणूस हळवा होऊ शकतो, अशावेळी त्याला आधार द्यायचा की त्याचा घात करायचा? आपली जडण कशी झाली आहे, यावर हे सगळे वागणे अवलंबून असते. एखाद्या असहाय माणसाचा असा गैरफायदा घेताना काहीच कसे वाटत नाही? जनाची नाही, किमान मनाची..? की तेही नाहीच? माणूस इतका असंवेदनशील झाला आहे? आज एक जीव हकनाक या फसवणुकीला बळी पडला आहे. त्या प्रियकराला त्याच्या कृतीची शिक्षा होईल न होईल, पण वैशाली परत येणार नाही.
प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे एका समारंभात नुकतेच म्हणाले, ‘माणसाच्या आंतरिक उर्मींना जपले पाहिजे, असे बुद्धांसारख्या अनेक महान व्यक्तींनी सांगितले आहे. स्वातंत्र्य, प्रेम या मूल्यांची ओळखही त्यांनीच करून दिली आहे. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. स्वातंत्र्यानंतर कोणते मूल्य महत्त्वाचे असेल तर ते प्रेमच आहे.’ मात्र वरील प्रकरणात याच प्रेमाची विटंबना झाली आहे. विश्वासघात झाला आहे.. आणि तोही अगदी नियोजनपूर्वक! एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास टाकते, आपण म्हणू तसे वागते; त्या व्यक्तीचा विश्वासघात करताना, तिच्या मनावर आघात करताना क्षणभरही माणूस विचार करत नाही. इतका तो निष्ठुर झाला आहे?
अर्थात एखाद्या उदाहरणावरून काही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. पण असे प्रकार वाढू नयेत. सगळ्यांनी जबाबदारीने वागावे, मुख्य म्हणजे स्वतःची काळजी घ्यावी, असे ही घटना नक्कीच शिकवते. काहीही झाले तरी माणुसकीवरचा विश्वास उडता कामा नये...