स्त्रियांवर अश्‍लाघ्य टीका का? 

ऋता बावडेकर
सोमवार, 22 एप्रिल 2019

संपादकीय
 

समाजाचे स्वास्थ्य चांगले राहायचे असेल, तर या समाजाच्या घटकांनी खूप जबाबदारीने वागले पाहिजे. आपापली कर्तव्ये नीट पार पाडली पाहिजेत. ती पार पाडत असताना आपण कोणत्या घटकाचा अपमान तर करत नाही ना, पाणउतारा तर करत नाही ना, त्याला हीन तर लेखत नाही ना.. या सगळ्याचा विचार करायला हवा. हे दोन घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष. या दोन घटकांत समानता आल्याशिवाय समाजाचा रथ नीट चालू शकणार नाही. काही बाबतींत मतभेद असतात, मान्य पण स्त्री म्हणून प्रत्येकवेळी त्या व्यक्तीला हिनवणे, तिच्याबद्दल अद्वातद्वा बोलणे हे कितपत योग्य आहे? 

लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. विदर्भासह काही ठिकाणी पहिल्या फेरीचे मतदानही झाले आहे. पण निवडणुकीच्या तारखा झाल्यापासून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, यावेळी महिलांविषयी फार वाईट टिपण्णी होते आहे. सतत होत नसली, तरी महिलांवरील टीकेने यावेळी अतिशय खालची पातळी गाठल्याचे जाणवते आहे. सार्वजनिक जीवनात आल्यावर टीका सहन करावीच लागणार, असे काही लोक म्हणतात. असेलही, पण किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी यालाही मर्यादा असायला हवी ना! 

काँग्रेसच्या मित्रपक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल एके ठिकाणी म्हणाले, ‘त्या कपाळावर मोठी बिंदी लावतात. एखादी बाई सतत पती बदलत असते, तिच्या बिंदीचा आकार असा वाढत असतो, असे मला कोणीतरी सांगितले आहे.’ या टीकेतून त्यांनी काय सिद्ध केले असेल? स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून यांना कसले समाधान मिळाले असेल? पण अशा प्रकारे टीका करण्यातच असे लोक धन्यता मानतात. कारण त्यांचा आवाकाच तेवढा असतो. पण केवळ असे म्हणून सोडून देता येत नाही. तसे असेल तर त्यांना आपला आवाका वाढवावा, अन्यथा गप्प बसावे. दरम्यान, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळाली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या धर्माबद्दल चर्चा सुरू झाली. विवाहानंतर त्यांनी धर्म बदलला का? विवाहानंतरचे नाव त्या का लावत नाहीत... वगैरे वगैरे. या सगळ्या टीकेला ऊर्मिला यांनी खूप संयतपणे आणि सभ्यपणे सडेतोड उत्तर दिले. पण ते ऐकण्या-वाचण्यात कोणाला रस होता? आपण केलेल्या टीकेवरच ही मंडळी खुश होती. कारण परत तेच ‘आवाका’ नाही आणि तो वाढवण्याची इच्छाही नाही. 

नुकतेच समोर आलेले तिसरे उदाहरण म्हणजे, अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर समाजवादी पक्षाचे आझमखान यांनी केलेली अश्‍लाघ्य टीका. अश्‍लाघ्य, अश्‍लील शब्द कमी ठरावेत इतकी ही टीका हीन पातळीची आहे. या टीकेबद्दल त्यातल्या त्यात सौम्य शब्दांत लिहायचे म्हटले तरी अशक्य आहे. जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून रामपूरमधून त्या निवडणूक लढवत आहेत. एवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर अजून वाईट शब्दांत टीका करत त्यांनी स्वतःची लायकी दाखवून दिली. त्यांच्या या टीकेवर सुषमा स्वराज यांनी जोरदार हल्ला चढवला. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव, पक्षाच्या जया बच्चन यांनाच त्यांनी या संदर्भात जाब विचारला. जयाप्रदा यांनीही या टीकेला चोख उत्तर दिले आहे. आझमखान यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे. पण परत वर म्हटले तसे, लोकांच्या टीका लक्षात राहते. त्यातच ते रमतात, त्याचा विकृत आनंद घेतात. त्या टीकेला काय उत्तर दिले याकडे फार थोड्या लोकांचे लक्ष असते. मात्र आता सगळीकडून टीका होऊ लागल्यावर आझमखानने कोलांटउडीच मारली. ‘मी असे काही म्हणालोच नाही’ म्हणून माध्यमांवर खापर फोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या लोकांचे हे एक बरे असते, प्रकरण अंगाशी यायला लागले की माध्यमांना जबाबदार धरले की झाले. तरी बरे आता इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमुळे त्यांच्या बोलण्याचे व्हिडिओच प्रसारित होऊ लागले आहेत. पण त्यामुळे यांचे काही अडत नाही. निवडणूक प्रचार काळात अश्‍लाघ्य टीका झालेल्या या तीनही महिला चित्रपटक्षेत्राशी संबंधित आहेत हा निव्वळ योगायोग मानावा का? दुर्दैवाने तसे मानता येत नाही. कारण प्रचारावेळी टीका होणार वगैरे गोष्टी या उमेदवारांनीही गृहीत धरलेल्या असतात. पण इतक्‍या नीच पातळीची टीका केवळ चित्रपट अभिनेत्रींच्याच वाट्याला का? याचा अर्थ इतर महिलांनाही हा त्रास व्हावा असा अजिबात नाही. पण जेव्हा अभिनेत्रींवर अशी टीका होते, तेव्हा ते कुठेतरी पुरुषी मानसिकतेशी संबंधित असते असे वाटते. 

चित्रपटांत वगैरे काम करणाऱ्या महिलांबाबत आपण दुर्दैवाने पहिल्यापासूनच असहिष्णू आहोत. त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कधीच साफ, स्वच्छ नव्हता. त्यांच्या चारित्र्यावर नेहमीच असभ्यपणे बोलले गेले आहे. ही परंपरा (?) अजूनही सुरूच आहे. त्यांना कोणीही काहीही बोलू शकते, असा आपण समज करून घेतलेला आहे. असे बोलण्यात दुर्दैवाने महिलाही असतात. म्हणूनच याला ‘पुरुषी’ मानसिकता म्हटले आहे. वर उल्लेख केलेले नेते जाहीरपणे इतकी नीच पातळी गाठू शकतात, तर खासगीत बोलताना ते कोणती पातळी गाठत असतील यावर विचारच न केलेला बरा. 

तरी या तिघींचे कौतुकच करायला हवे. इतक्‍या हीन टीकेला त्यांनी तोंड दिले. ठामपणे त्या उभ्या राहिल्या. मात्र, ही टीका करणाऱ्या नेत्यांना सार्वजनिक जीवनात अतिशय मान असतो, त्यातील अनेक निवडूनही येतात, याला काय म्हणावे? समाज म्हणून आपण बाईला ‘चांगल्या-वाईटा’ची मोजपट्टी लावतो, अशा पुरुषांचे - पुरुषी मानसिकतेचे मूल्यमापन आपण कधी करणार? करणार का?

संबंधित बातम्या