सुटी व मुले 

ऋता बावडेकर
सोमवार, 29 एप्रिल 2019

संपादकीय
 

आपल्याकडे शाळांना बऱ्यापैकी सुट्या असतात. त्यामुळे शाळांना काय किंवा विद्यार्थ्यांना काय, सुट्यांचे फारसे अप्रूप नसावे, असे आपल्याला वाटते. मात्र तसे नसते. वर्षभरातील या सगळ्या सुट्यांबरोबरच दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांचे सगळ्यांनाच आकर्षण असते; त्यातही उन्हाळ्याच्या सुटीची विशेष ओढ असते. जवळजवळ दीड-दोन महिन्यांचा हा काळ मुलांसाठी पर्वणीच असतो. तो का, हे प्रत्येकजण आपापल्या बालपणाच्या आठवणींवरून ठरवू शकतो. तरीही पूर्वी मूल असलेले आणि आता आईबाबा झालेल्या अनेकांसाठी हा काळ सहनशक्तीची कसोटी पाहणाराही असू शकतो. या काळात आपली मुले ‘एंगेज्ड’ कशी राहतील किंवा त्यांना आपण ‘बांधून’ कसे ठेवू शकतो, याचा विचार हे आईबाबा करू लागतात. मग मुलांसाठी विविध शिबिरे, छंदवर्ग, ट्रेकिंग वगैरेंचा शोध सुरू होतो. पण मुलांना ते हवे असते का? याचाच विचार करून आम्ही, ‘सकाळ साप्ताहिका’ने ‘हुर्रेर्रेऽऽऽ सुटी’ या सुटीतल्या अंकाचे नियोजन केले आहे. 
 
मुलांना सगळ्यात कसला वैताग येत असेल, तर उपदेशांचा! आपल्याला सतत, येता-जाता कोणीतरी काहीतरी सांगते आहे, शिकवते आहे यामुळे अनेकदा मुले कावून गेलेली असतात. त्यामुळे बरीच मुले (यात मुलीही अर्थातच आहेत) आपल्या या हक्काच्या सुटीची खूप अपेक्षेने वाट बघत असतात. हा काळ त्यांना अगदी आपल्या मनासारखा घालवायचा असतो. नवीन काही शिकायचे असते. नवीन ठिकाणे बघायची असतात. वेगळे काही वाचायचे असते.. फार कशाला निवांत आराम करायचा असतो... त्यात पालक त्यांना विविध शिबिरे, छंदवर्गात अडकवण्याची तयारी करू लागल्यावर ते वैतागतात. आवडीची गोष्ट असेल तर त्यांची हरकत नसते. पण तसे नसेल तर वाद ठरलेला. पालकांचेही बरोबर असते. आपले मूल सुटीत काहीच न करता बसून राहिलेले त्यांना बरे वाटत नाही. या काळाचा त्यांनी सदुपयोग करावा, असे त्यांना वाटत असते. मात्र अशावेळी आपल्या मुलाला कुठल्या छंदवर्गात अडकवले म्हणजे, आपली जबाबदारी संपली असा विचार काही पालक करतात, ते मात्र साफ चूक आहे. मुलांना कुठल्या तरी वर्गात तुम्हाला पाठवायचेच असेल, तर आधी त्या मुलाबरोबर बोलायला हवे. त्याला काय हवे, त्याची आवडनिवड समजून घ्यायला हवी. मग वर्ग निवडायला हवा. पण बरेचदा इथेही पालक आपल्याच आवडीनिवडी मुलांवर लादतात आणि त्यांना त्या त्या वर्गांना जायला भाग पाडतात. 

या अंकात म्हणूनच आम्ही थोडा वेगळा विचार करून बघितला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध ‘शिबिरां’चे पीक फोफावले आहे. आता तर या शिबिरांची ‘सुटीतील पाळणाघरे’ अशीही अनेक जण संभावना करताना दिसतात. काही अंशी ते खरेही आहे. एकावेळी इतक्‍या मुलांना या वर्गांत काय आणि कसे शिकवले जात असेल, हा प्रश्‍नच आहे. या अंकात ‘शिबिरांचे बदलते स्वरूप’ असा एक विषय आम्ही घेतला आहे. शिबिरे वाईट नाहीत. त्यांची मूळ संकल्पना खरोखरच चांगली आहे, पण ते स्वरूप आज राहिले आहे का? आज नेमके काय स्वरूप आहे? मुलांना ते आवडते का? अशा विविध अंगांनी या लेखात चर्चा करण्यात आली आहे. खरे तर शिबिरांखेरीज असंख्य पर्याय असतात. फक्त आपण ते बघायला हवेत. घरबसल्या खेळता येतील असे, शारीरिक श्रमांचा कस लागेल असे खूप खेळ पूर्वी होते. आजच्या व्हिडिओ गेम्स वगैरेंच्या पार्श्‍वभूमीवर या जुन्या खेळांचा आढावाही या अंकात आम्ही घेतला आहे. त्यामुळे काही खेळ परत आले तरी आम्हाला आनंदच होईल. 

अनेक मुलांना कागदाबरोबर खेळायला खूप आवडते. बसल्या बसल्या त्यापासून काही कलाकृती ते करतात. या कलेबद्दल सविस्तर माहिती देणारा लेखही अंकात आहे. तसेच काही कलाकृती कशा करायच्या साचे प्रात्यक्षिकही त्यात आहे. 

अनेकदा पालक म्हणतात, सुटीने वैताग आणलाय. मुलांच्या डोक्‍याला काहीतरी खुराक हवा. तर हा खुराक डॉ. श्रुती पानसे यांनी पुरवला आहे. सुटीत मुलांवर त्याचे प्रयोग पालक करू शकतात. कारण हा खुराक त्रासदायक नाही, मुलांना आवडेल असाच आहे. नक्की प्रयत्न करून बघा. 

मुलांच्या अंगात प्रचंड ऊर्जा असते. ती ऊर्जा व्यवस्थित वापरली जायला हवी. ती कशी वापरायची, हे त्यांचे शिक्षक, पालक यांनी ठरवायला हवे. त्यांना कोणतेही काम सांगा, काही क्षणात ते म्हणतात, ‘झाले.’ मग उरलेल्या ऊर्जेचे करायचे काय? अशावेळी पालकांचे नियोजन तयार हवे. इतर गोष्टी करायला, खेळ खेळायला मुलांना आवडतेच; पण त्याचबरोबर स्वयंपाक करायलाही ती तयार असतात. बरेचदा आपण तसा विचारच करत नाही. पण थोडा विचार केला तरी आठवेल, मुलगा काय किंवा मुलगी काय, ‘आई, मी पुऱ्या करू?’ ‘मी फोडणी देऊ?’ असे म्हणत असते. आपणच त्याकडे दुर्लक्ष करत असतो. या अंकात खास मुलांसाठी आम्ही रेसिपीज - पाककृती दिल्या आहेत. साहित्यलक्ष्मी देशपांडे यांनी मुलांना आवडतात असेच पदार्थ त्यासाठी निवडले आहेत. तसेच स्वयंपाक करताना काय काळजी घ्यायची याचे बहुमोल असे मार्गदर्शनही केले आहे. तुमच्या देखरेखीखाली या सुटीत मुलांकडून यातील काही पदार्थ जरूर करून घ्या. आम्हालाही कळवा. 

या अंकात एक विशेष विभाग आहे. खास मुलांनी या विभागात लेखन केले आहे. आपली आवड, छंद त्यांनी खूप सुंदररीत्या सांगितले आहेत. ही मुले असाही विचार करू शकतात, असे हे लेखन वाचताना आपण अचंबित होऊन जातो. 

खरोखरच, मुले खूप वेगळा विचार करतात. त्यांच्याकडे सांगण्यासारखे, देण्यासारखे खूप असते. आपल्या व्यापातून फक्त थोडा वेळ आपण त्यांच्यासाठी काढायला हवा. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. मुलांची सुटी तर सार्थकी लागेलच, पण आपणही खूप काही शिकू. मुलांबरोबरचे आपले नातेच अर्थपूर्ण होईल. या अंकाद्वारे आम्ही असा संवाद साधला आहे, आता पाळी तुमची - पालकांची आहे. साधणार ना संवाद?   

संबंधित बातम्या