अपेक्षांचे ओझे 

ऋता बावडेकर
सोमवार, 27 मे 2019

संपादकीय
 

‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ अशी एक म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे वागणे परस्परांहून भिन्न असते. अगदी जवळचे नाते असले तरी एकजण वागेल, तसेच दुसरा वागेल असे नाही. त्यामुळे कोण कधी कसे वागेल याबद्दल काही सांगता येत नाही. वागण्याप्रमाणेच कोण कधी काय कृती करेल याचाही अंदाज करता येत नाही. 

काही दिवसांपूर्वी आपल्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र आले आणि पुण्यातील पोलिस विभागाची पळापळ झाली. खरेतर अशी अनेक पत्रे मुख्यमंत्र्यांना रोज येत असणार, पण हे पत्र एकदम वेगळे होते. काही प्रमाणात सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारेच होते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. 

एका विवाहेच्छू तरुणाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. ‘विवाह करण्याची माझी खूप इच्छा आहे. पण विवाहानंतर माझ्या आईवडिलांना सांभाळायला कोणतीही मुलगी तयार होत नाही. त्यामुळे मला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी..’ असा त्या पत्राचा आशय होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पुणे पोलिसांबरोबर संपर्क साधला आणि या तरुणाचा पत्ता शोधून, स्वेच्छामरणाच्या त्याच्या निर्णयापासून त्याला परावृत्त करावे, अशा सूचना दिल्या. पोलिसांनीही त्याला शोधून त्याचे समुपदेशन केले. 

या तरुणाला चांगली नोकरी आहे. तो आपल्या पायावर उभा आहे. पण वयाप्रमाणे त्याचे आईवडील थकले आहेत. ते घराची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सांभाळेल अशी मुलगी त्याला पत्नी म्हणून हवी आहे. पण त्याची ही अपेक्षा पूर्ण होत नाही, त्यामुळे त्याला नैराश्‍य आले आहे आणि त्या भरात त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याची अपेक्षा चुकीची आहे, असे म्हणता येत नाही. पण म्हणून त्याला नकार देणाऱ्या मुलींचे काही चुकते आहे, असेही म्हणता येत नाही. आपले आयुष्य कसे जगायचे, हे ज्याने त्याने ठरवलेले असते. त्यात अलीकडच्या मुली चांगल्या शिकत आहेत. नोकरी-व्यवसाय करून घराला हातभार लावत आहेत. प्रत्येक मुलगी महत्त्वाकांक्षी असेल असे नाही (आणि असली तरी त्यात काही चुकीचे नाही); पण आपल्या पायावर उभे राहावे असे तिला वाटणे यात गैरही काही नाही. बरेचदा तिने नोकरी करावी, ही तिच्या माहेरच्या किंवा सासरच्या घरची परिस्थितीही असते. अर्थात प्रत्येकवेळी परिस्थितीमुळेच तिने नोकरी-व्यवसाय करावा असे नाही. तिची तशी इच्छाही असू शकते. अशा काळात जर कोणी मुलींकडून फक्त घर सांभाळावे अशी अपेक्षा केली, तर ती योग्य नाही. त्यामुळे त्या तरुणाला नकार देणाऱ्या मुलींची चूक आहे, असे म्हणता येत नाही. यातून काही मध्यममार्ग काढायला हवा... 

आज मुले-मुली खूप शिकताहेत. त्यातही मुलींचे प्रमाण अधिक आहे. शिकून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मुलींचेही प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये घराला-कुटुंबाला हातभार लावावा, अशी इच्छा अधिक असते. पण स्वतःसाठी, आपले शिक्षण सार्थकी लावण्यासाठी नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यात काही गैरही नाही. हे सगळे सोडून घरी बसावे, अशी आज परिस्थिती राहिलेली नाही. नोकऱ्या फारशा उपलब्ध नाहीत, नोकरी सोडली तर पुन्हा मिळेल याची शाश्‍वती नाही, त्यामुळे आहे ती नोकरी टिकवून ठेवण्याकडे मुलींचा कल असतो. याबरोबरच आजच्या काळात प्रचंड स्पर्धा आहे. अपेक्षा वाढलेल्या आहेत. महागाईही वाढलेली आहे. या काळात अगदी चैनीचे नाही, पण आरामदायी आयुष्य जगायचे असेल तर दोघांनी नोकरी करणे ही गरज झाली आहे. तीही समजून घेतली पाहिजे. 

मात्र, या जीवघेण्या स्पर्धेत चांगले आयुष्य मिळावे म्हणून धावताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्‍यक आहे. चूक कोणाचीच नाही, पण तरीही काही संबंध असतात, काही जबाबदाऱ्या असतात; त्या कोणाला टाळता येत नाहीत. किंबहुना कोणी त्या टाळू नयेत. घरातील आईवडील ही त्यापैकी सगळ्यात मोठी जबाबदारी असते. एकत्र कुटुंब तर हल्ली अभावानेच दिसतात. पण म्हणून आपल्या पालकांची जबाबदारी टाळता येत नाही ना! म्हणजे टाळू नये. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आज ते ज्या वयात आहेत, त्या वयात उद्या आपण जाणार आहोत. त्यावेळी ते जी अपेक्षा आपल्याकडून करत आहेत, तीच अपेक्षा आपण आपल्या मुलांकडून करणार आहोत. वाढत्या वयाचा, त्या वयातील गरजांचा विचार करून तुम्ही कितीही पैसा साठवलात तरी तुमचे करायला कोणीतरी माणूस लागतोच; तो आपला असेल तर अधिक बरे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीची विचार प्रत्येकाने करायला हवा. याचा अर्थ तेच करत राहावे, असे नाही. तर त्यातही तोल साधता येऊ शकतो. आजच्या स्पर्धेच्या युगात माणूस नुसता धावत असतो. आपण नेमके कशाच्या मागे धावतो आहोत, हेदेखील अनेकदा त्याला कळत नाही. तो विचार प्रत्येकानेच शांतपणे करायला हवा. 

वर उल्लेख केलेल्या तरुणाची अपेक्षा चुकीची नाही. आपल्या आईवडिलांकडे बघायला कोणी जवळचे माणूस हवे, असे त्याला वाटणे चुकीचे नाही. पण अशी अपेक्षा करताना आपण एका मुलीला घरात डांबून तिच्यावर अन्याय करत आहोत याचा त्यानेही विचार करायला हवा. आपल्या आईवडिलांसाठी आपली नोकरी सांभाळून आपण स्वतः काय करू शकतो, याचीही विचार करायला हवा. येणाऱ्या स्थळाबरोबर आपले हे विचार बोलायला हवेत. त्यात त्या मुलीच्या आईवडिलांचा - तिच्यावरील जबाबदाऱ्यांचाही विचार व्हायला हवा, तर या परिस्थितीत काही फरक पडू शकतो. त्यामुळे प्रत्येकवेळी मुलींचेच चुकते ही मानसिकता बदलून स्वतःकडेही बघायला हवे. हा दृष्टिकोन केवळ मुले, मुली नाही; तर त्यांचे पालक, मित्रमंडळी, पर्यायाने सर्व समाजानेच करायला हवा. स्वतःबरोबरच प्रत्येकाने परस्परांचा विचार केला, फार अपेक्षा केल्या नाही, तर अनेक समस्या या समस्याच वाटणार नाहीत. टोकाची भूमिका घेण्याची त्यामुळे वेळच येणार नाही. 

संबंधित बातम्या