‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार हवा 

ऋता बावडेकर
सोमवार, 3 जून 2019

संपादकीय
 

मुलांचे (यात अर्थातच मुलीही आहेत) करिअर ही पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. मूल आठवीत जात नाही, तोच (खरे तर त्याही आधीपासूनच) त्याने कोणता अभ्यासक्रम निवडावा, त्यात कसा स्कोप आहे, त्यात मूल कसे यशस्वी होईल... वगैरे नियोजन सुरू होते. मुलांची आवड, कल, गती याकडे दरवेळी लक्ष दिले जातेच असे नाही. वास्तविक, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्याशिवाय मूल यशस्वी होणार कसे? आयुष्यात समाधानी होणार कसे? 

अभ्यासक्रम निवडणे, करिअर निवडणे म्हणजे नेमके काय? किती पालकांना हे माहिती असते? काही अपवाद वगळता, सध्या कोणत्या अभ्यासक्रमाची - क्षेत्राची चलती आहे, यावरूनच बरेचदा तो अभ्यासक्रम किंवा ते क्षेत्र निवडले जाताना दिसते. ते निवडताना आर्थिक लाभाला महत्त्व दिले जाते; म्हणजे कोणत्या क्षेत्रातून चांगला पैसा मिळू शकतो! त्यात गैरही नाही. पण केवळ पैसा हाच घटक महत्त्वाचा असतो का? सुरुवातीला मुले त्यात रमतीलही, कारण पैसा हा घटक परिणामकारक ठरू शकतो. पण त्या क्षेत्रात रस नसेल कालांतराने मुले वैतागतील, कंटाळतील.. ज्याला शक्‍य असेल ते पर्याय शोधतील, ज्यांना शक्‍य नसेल ते निराश होतील. त्यातून कुठली पायरी ते गाठतील, सांगता येत नाही. म्हणूनच ‘सकाळ साप्ताहिका’तर्फे ‘करिअर विशेषांक’ दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. त्यात विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आम्ही देतो. शिवाय विद्यार्थी - पालकांना मार्गदर्शक होतील असे तज्ज्ञांचे लेखही देतो. या वर्षीही असे लेखन या अंकात आहे. सध्याचे शैक्षणिक चित्र काय आहे? सध्या कोणते ट्रेंड्‌स आहेत? पारंपरिक पद्धती आता किती उपयुक्त राहिली आहे? या जगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी; खरे तर पालकांनी कसा विचार करायला हवा? चाकोरीबाहेर जाऊन हा विचार कसा आहे, कसा करावा? असे उपयुक्त मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले आहे. 

पालकांनी मुलांवर आपली मते लादू नयेत; तसेच विद्यार्थ्यांनीही मोबाईल, टॅब वगैरेचा वापर केवळ गेम्स खेळण्यासाठी न करता, त्यात असलेली अवाढव्य माहिती घ्यावी. करिअर निवडताना या माहितीचा वापर करावा, असेही हे तज्ज्ञ म्हणतात. 

जागतिकीकरणाच्या या सतत बदलत राहणाऱ्या जमान्यात आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात विविध आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याकडे दुर्लक्ष न करता, ती आव्हाने समजून घेऊन आपली प्रगती साधायला हवी. शिक्षण क्षेत्रही अर्थातच याला अपवाद नाही. आमच्या पाल्याने अमुक शिक्षण घेतले आहे, पण त्याला नोकरी नाही किंवा त्याच्या शिक्षणाच्या तुलनेत पगार नाही... वगैरे बऱ्याच तक्रारी असतात. या तक्रारींत तथ्य किती, अशाप्रकारच्या विविध तक्रारींकडे पालक-पाल्यांनी कसे बघायला हवे याबद्दल डॉ. श्रीराम गीत यांचे मार्गदर्शन आहे. मुलांच्या करिअरकडे (नको इतके) लक्ष घालणाऱ्या पालकांचे त्यांच्या आरोग्याकडे मात्र बहुतांश वेळा दुर्लक्ष होत असते. वास्तविक ही गोष्टही कूप महत्त्वाची आहे. कारण पुढे करिअर कोणतेही असो, भरभक्कम तब्येतीचा पाया या मुलांना प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगांत साथ देईल, असे डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात. ‘यशस्वी करिअर म्हणजे काय?’ तर चांगले शिक्षण घेताना चांगले गुण आपल्यात विकसित करणे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते, ते सगळ्यात महत्त्वाचे असते, असे डॉ. विद्याधर बापट म्हणतात. स्पर्धा परीक्षांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो आहे. या विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी अभ्यासिका, वसतिगृहे उभी राहिलेली दिसतात. या संदर्भात उपलब्ध जागा आणि परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हे प्रमाण सतत व्यस्तच दिसते, तरीही या परीक्षेला मिळणारा प्रतिसाद कमी होताना दिसत नाही. ही परीक्षा नेमकी असते कशी? तिचे स्वरूप - वेगळेपण काय? त्यासाठी नेमका अभ्यास कसा करावा? मुलाखतीची वगैरे तयारी कशी करावी? अभ्यास आणि वेळेचे नियोजन कसे करावे? अशी सविस्तर आणि उपयुक्त माहिती युनिक ॲकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी दिली आहे. 

‘थ्री इडियट्‌स’ हा चित्रपट आपल्याकडे प्रचंड गाजला. त्यातील गमती, विनोद, गाणी वगैरे सोडली तर त्या चित्रपटाचा मुख्य उद्देश किंवा त्या चित्रपटाने दिलेला सांगावा काय होता? चाकोरीत अडकू नका. थिंक आउट ऑफ द बॉक्‍स. करिअरचा विचार करताना आपली आवड जपा... हा सांगावा हीच आजच्या काळाची गरज झाली आहे. समाजाला काय हवे आहे, हे जाणून घेऊन अनेकजण काम करताना दिसतात. अनेक ठिकाणी यंत्रमानवांनी माणसाची घेतली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढते आहे. अशावेळी आपण ‘जुनाट’च विचार करणार का? तंत्रज्ञान पुढेच जात राहणार, मग आपली मुले कोणते शिक्षण घेऊ शकतात, कोणकोणती करिअर्स करू शकतात याचा विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन नीलांबरी जोशी यांनी केले आहे. 

त्याचप्रमाणे काळाबरोबर सुसंगत राहण्याची निकड निर्माण झाली आहे. वास्तविक, ती प्रत्येक काळात असते, पण आताचा काळ कधी नव्हे इतका स्पर्धेचा काळ झाला आहे. अभ्यासक्रम कोणताही निवडा, त्यातील ज्ञान सतत अपडेट ठेवणे ही आजची गरज झाली आहे. उदाहरणार्थ, संगणक. एकदा घेतलेले शिक्षण इथे पुरेसे नाही. त्यात इतके बदल होत असतात, त्या बदलांची सतत माहिती घेत राहिलात तर ठीक, अन्यथा तुम्ही मागे पडू शकता. असे प्रत्येक क्षेत्राबद्दल म्हणता येईल. जगाच्या वेगाशी जुळवून घेताना सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचं कौशल्य आणि तयारी असणे आता आवश्‍यक ठरले आहे. 

..आणि यशस्वी होणे म्हणजे काय? वास्तविक ही गोष्ट सापेक्ष आहे. प्रत्येकाचे विचार, आवडी वेगळ्या. कोणी विचारही करणार नाही, असे ‘उद्योग’ आज कित्येक तरुण-तरुणी करत आहेत. त्यांना आपण यशस्वी म्हणणार नाही का? आपली ‘दृष्टी’ बदलायला हवी...   

संबंधित बातम्या