...यामुळे स्वप्ने कोमेजतात! 

ऋता बावडेकर
मंगळवार, 11 जून 2019

संपादकीय
 

कोणीही सदैव गंभीर राहू शकत नाही. थोडीफार चेष्टामस्करी सगळीकडेच सुरू असते. पण ही चेष्टामस्करी जेव्हा गंभीर रूप धारण करते, तेव्हा त्याचे रॅगिंग होते. आपल्या सहकाऱ्याची - सहाध्यायीची गंमत ठीक आहे, पण हा प्रकार अनेकदा कालांतराने गंभीर रूप धारण करतो. वेळप्रसंगी संबंधित व्यक्ती आपले जीवनदेखील संपवते. अशावेळी प्रत्येकाने कुठेतरी थांबणे आवश्‍यक आहे असे वाटते; नव्हे तसे थांबायला हवे. मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. दोन्हींतील ही अस्पष्ट रेषा समजून घेतली पाहिजे. शाळा-महाविद्यालयातील मुलांना कदाचित याची फार जाणीव नसेल, अर्थात तेही चूकच. पण अनेकदा मोठी माणसेही भान विसरल्यासारखी वागतात. त्यातून नाहक एखाद्याचा जीव जातो. डॉ. पायल तडवी हे त्यातील अलीकडचे उदाहरण आहे. 

जळगाव जिल्ह्यातील या तरुणीचे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न होते. एमबीबीएस होऊन तिने ते पूर्णही केले. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने मुंबईच्या नायर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती एम.डी. करत होती. मात्र येथे तिला मानसिक छळाला सामोरे जावे लागले. पायल ही आदिवासी तडवी समाजाची होती. तिला मागासवर्गीय राखीव जागेतून प्रवेश मिळाला होता. त्यावरून या महाविद्यालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या सिनियर तिला त्रास देऊ लागल्या. सतत जातिवाचक टोचून बोलू लागल्या. तसे मेसेज पाठवू लागल्या. त्यांच्याविरुद्ध तिने डीनकडेही तक्रार केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. तिचा त्रास वाढतच गेला. तिच्या आईनेही डीनना यासंदर्भात पत्र लिहिले होते. दरम्यान, या सगळ्या त्रासाला, छळाला कंटाळून पायलने आत्महत्या केली. पोलिसांनी यासंदर्भात तिला त्रास देणाऱ्या तिघींच्या विरोधात ॲट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पण त्या तिघीही फरारी झाल्या. काही दिवसांनी तिघींनाही पकडण्यात पोलिसांना यश आले.  

 मात्र, हे सगळे इथेच संपत नाही. या तिघींना पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर रीतसर कारवाईही होईल. पुढे काय? हे सगळे होणे आवश्‍यकच आहे. पण रॅगिंग, दुसऱ्याला हीन लेखणे, त्याला शारीरिक-मानसिक त्रास देणे असे सगळे प्रकार मुळातच नष्ट व्हायला हवेत. त्यासाठी कडक कायदे आवश्‍यक असतात आणि त्याहीपेक्षा आवश्‍यक असते ती या कायद्यांची कडक अंमलबजावणी. अनेकदा कायदे असतात, पण त्यांची अंमलबजावणी तेवढ्या गंभीरपणे होताना दिसत नाही. असा छळवाद करणारे कायद्यातील पळवाट शोधतच असतात. त्यांना त्यात यश आले, की पुढच्यांची धिटाई वाढते. हे चक्र असे सुरू राहते. 

अर्थात, फक्त कठोर कारवाई करून दरवेळी उपयोग नसतो. ही समस्या मुळातूनच नष्ट करायची असेल तर कठोर कारवाईला समजुतीचीही जोड द्यायला हवी. असे प्रकार करणाऱ्यांना त्यांची चूक किती गंभीर आहे, हे वेळीच निदर्शनाला आणून द्यायला हवे. त्यांनी केलेल्या छळामुळे एखादी व्यक्ती कशी आयुष्यातून उठू शकते, हे त्यांना कळायलाच हवे. आपल्या छळाचे असेही परिणाम होऊ शकतात आणि आपण त्यातून सहीसलामत सुटू शकत नाही, याची जाणीव त्यांना व्हायलाच हवी. केवळ शिक्षा होणे, त्यांचे शिक्षण रद्द करणे, त्यांना तो व्यवसाय-नोकरी करण्यास बंदी घालणे एवढ्यामुळे फार काही साध्य होणार नाही. तेवढ्यापुरते ते गप्प बसतील. पण मूळ प्रवृत्ती कधी ना कधी उफाळून येतेच. याचा अर्थ वर उल्लेखिलेल्या शिक्षा त्यांना होऊ नये असे नाही. पण त्याबरोबरच त्यांच्यातील त्या प्रवृत्ती कशा नष्ट होतील हे बघायला हवे. 
 मध्यंतरी ‘टेबल नं. २१’ हा परेश रावल यांचा या विषयावरील अतिशय प्रभावी चित्रपट आला होता. आपण दिलेला त्रास माणूस विसरून जातो, कारण प्रत्येकवेळी त्यामागे काही हेतू असतोच असे नाही. तर बरेचदा त्याच्या दृष्टीने त्याने केलेली ती एक ‘गंमत’ असते. ती किती काळ लक्षात ठेवायची? पण ती ‘गंमत’ सहन केलेल्याची त्यामुळे काय अवस्था होते, ही ‘गंमत’ सहन करताना तो कशा मानसिक-भावनिक परिस्थितीतून जातो, त्याने बघितलेल्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो.. असे वास्तववादी चित्रण यात होते. 

खरेच आहे, आपल्या काही क्षणांच्या मनोरंजनासाठी असे कोणाचे आयुष्य पणाला लावणे योग्य आहे काय? तेही कशासाठी, तर आपला ‘अहं’ सुखावण्यासाठी? आपले नैराश्‍य घालवण्यासाठी? आपले मोठेपण सिद्ध करण्यासाठी? आपली असुरक्षितता लपवण्यासाठी? अनेकदा तर भलत्या कोणाचा राग भलत्याच कोणावर निघत असतो. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला त्याची शिक्षा दुसऱ्याच निष्पाप व्यक्तीला का? 

या सगळ्या कारणांमुळेच रॅगिंग करणाऱ्यांना कडक शिक्षा तर व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर त्यांचे समुपदेशनही व्हायला हवे. चांगल्या-वाईटांची जाणीव त्यांना व्हायला हवी. आपण केलेली चूक, तिचे परिणाम त्यांना समजायलाच हवेत. कारण शिक्षा कधी ना कधी संपणारच. त्यामुळे त्यांचे वर्तन सुधारेलच याची काय खात्री? त्यासाठी शिक्षेच्या बरोबरीने त्यांचे समुपदेशन होणे आवश्‍यकच आहे. केवळ शिक्षा झालेल्यांचेच नव्हे, तर नव्याने प्रवेश घेतलेल्यांचेही समुपदेशन व्हायला हवे. त्यांच्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात, त्याबद्दल त्यांना कशी शिक्षा होऊ शकते, याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी. मुख्य म्हणजे, वरिष्ठांचे सर्वत्र लक्ष हवे. घटना घडून गेल्यावर जागे होण्यापेक्षा मुळात अशा घटनाच घडणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी. कारण मस्करीची कधी कुस्करी होईल, हे सांगता येत नाही...    

संबंधित बातम्या