मध्यममार्गातच यश 

ऋता बावडेकर
सोमवार, 24 जून 2019

संपादकीय
 

आपली संस्कृती, आपली कुटुंबव्यवस्था याबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलत असतो. या व्यवस्थेत परस्परांचा मान राखणे याला फार वरचे स्थान आहे. त्यातही व्यक्ती ज्येष्ठ असेल तर तिचा आदर करायलाच हवा, त्या व्यक्तीबरोबर प्रेमाने बोलायला हवे असे आपले काही अलिखित नियम आहेत. त्यात काही वावगेही नाही. लहान असो वा मोठा, माणसाने माणसाला आदर दिला तर त्यात चूक ते काय? पण काही घटनांत असे होताना दिसत नाही. कुठेतरी बदसूर ऐकू येतो आणि अस्वस्थ व्हायला होते. काय कारण असेल? 

आपण माणसे जगभर अनेक ‘डे’ अर्थात अनेक ‘दिवस’ साजरे करत असतो. तसाच ‘वर्ल्ड एल्डर ॲब्यूज अवेअरनेस डे’ अर्थात ज्येष्ठांच्या अवहेलनेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जाणारा (जागतिक) दिवस’ आहे. तो नुकताच झाला. त्या निमित्ताने भारतातील ‘हेल्पएज’ या स्वयंसेवी संस्थेने या संदर्भात एक सर्वेक्षण केले. घरातील ज्येष्ठांचा सांभाळ करताना तुम्ही आनंदी किंवा समाधानी असता का? असा प्रश्‍न यावेळी विचारण्यात आला होता. वीस शहरांतील ३० ते ५० वयोगटातील मुलगा, मुलगी, जावई, सून अशा २०५० जणांना हा प्रश्‍न विचारण्यात आला. या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी त्यांना जवळजवळ हो, खूपदा, कधीतरी, खूप क्वचित आणि कधीच नाही असे पाच पर्याय देण्यात आले होते. या सर्वेक्षणातून निघालेले तात्पर्य अतिशय धक्कादायक आहे. आपल्या मूल्यांचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ तर आली नाही ना, असेही अनेकांना त्यामुळे वाटू शकेल. जवळजवळ हो हा पर्याय २६.६ टक्के लोकांनी स्वीकारला आहे. खूपदा हा पर्याय ११.६ टक्के, कधीतरी हा पर्याय १२.९ टक्के लोकांनी स्वीकारला आहे. तर खूप क्वचित हा पर्याय १३.९ टक्के लोकांनी आणि कधीच किंवा अजिबात नाही हा पर्याय ३५ टक्के लोकांनी स्वीकारला आहे. ज्येष्ठांची सेवा करणे आवडत असलेले २६.६ टक्के लोक असले, तरी अशी सेवा आवडत नसलेल्यांचे प्रमाण १३.९ आणि ३५ टक्के असे लक्षणीय आहे. चिंतेची हीच बाब आहे. ज्या संस्कृतीत ज्येष्ठांना खूप वरचे, आदराचे स्थान आहे, तिथली आजची परिस्थिती आहे. सर्वेक्षणासाठी २०५० ही संख्या खूपच कमी आहे, हे मान्य केले तरी त्यातही नाराजीचा सूर निघणे हे कुठेतरी काळजी करायला लावण्यासारखेच आहे. 

आतापर्यंत अनेकदा कुटुंबीयांकडून होणारा ज्येष्ठांचा छळ, त्यांची अवहेलना याबाबतच्या बातम्या वाचत, बघत असतो. अनेक उदाहरणांत तर छळ करणाऱ्या संबंधितांना शिक्षाही झालेली आहे. पण ज्यांच्यावर ज्येष्ठांची जबाबदारी आहे, त्यांना याबद्दल काय वाटते, हे बघण्याचा प्रयत्न ‘हेल्पएज’ने यावेळी केला आहे. ज्येष्ठांना सांभाळणे हे अनेकांना ओझे वाटते. एका ज्येष्ठावर प्रत्येक कुटुंबाला साधारण किमान ४१२५ रुपये महिन्याला खर्च करावा लागतो. तेही यामागचे एक कारण आहे. तसेच संबंधित ज्येष्ठाबद्दल प्रेम, ममत्व न वाटणे हे आणखी एक कारण आहे. ज्येष्ठांबरोबर इतके निर्दयी किंवा माणुसकीशून्य वागण्याचे कारण सांगताना ‘त्यांची काळजी घेताना, त्यांची सेवा करताना थकून जायला होते, नैराश्‍य येते’ असे अनेकांनी सांगितले. 

सर्वेक्षणासाठी जो वयोगट निवडला आहे, त्या पिढीला ‘सॅंडविच पिढी’ म्हणता येईल, असे हेल्पएज म्हणते. हे वर्णन अगदी योग्यच म्हणायला हवे. कारण मुलांची आणि पालकांची जबाबदारी यात ही पिढी पूर्णपणे अडकली आहे. स्वतःसाठी त्यांना अगदी क्वचित वेळ काढता येतो. त्याचा राग मग कुठेतरी निघतो. अर्थात या पिढीच्या वागण्याचे हे समर्थन अजिबात नव्हे, पण त्यांचेही काही म्हणणे असेलच. यातूनच अनेकदा घरगुती हिंसाचार होतो. मात्र तरीही घर सोडून जायला ज्येष्ठ तयार नसतात. एकतर आपल्या संस्कृतीत ते बसत नाही हे कारण असावे किंवा कधीतरी त्यांना हवे ती आपुलकीही मिळत असावी. 

अमानुष किंवा टोकाचे वागणे गृहीत धरलेले नाही. अशा वागण्याला माफीच नाही. पण खरे पाहता, यात चूक कोणाचीच नाही. असेल तर ती परिस्थितीची आहे. जगण्याचा रेटा वाढतो आहे, महागाई वाढते आहे, त्या तुलनेत मिळकतीची साधने खूप कमी किंवा अनेकदा तुटपुंजी आहेत. अशा परिस्थितीने गांजलेले लोक घरातील जबाबदाऱ्यांनी अधिकच वैतागतात. मुले आणि ज्येष्ठांचे करण्यातच त्यांची सगळी ऊर्जा खर्च होते. त्यामुळे आलेल्या वैफल्यातून निर्माण झालेला राग कधी मुलांवर निघतो, तर कधी ज्येष्ठांवर.. मात्र अशा वागण्याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे याच पिढीने समजूतदारपणा स्वीकारणे आवश्‍यक आहे. कारण या वयोगटातील प्रत्येक पिढीची ही कथा आहे. ‘सांस भी कभी बहू थी’ ही परंपरा पुढच्या पिढीकडेही जाणार असते. त्यावेळी आपल्या घरातील ज्येष्ठांबरोबर आपण कसे वागतो, ते ही येणारी पिढी बघत असते. ती पिढी पुढे आपल्याबरोबरही अशीच कशावरून वागणार नाही, याचा विचार करायला हवा. 

परिस्थिती कशीही असो, मध्यममार्ग काढणे हे आपले वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मुलेही आपली आणि आईवडील किंवा सासूसासरेही आपलेच हे वास्तव स्वीकारायला हवे. त्यानुसार आपली वर्तणूक ठेवायला हवी. अर्थात या सर्वेक्षणात सगळेच नकारात्मक नाही. तर अनेक सुना आणि मुली आपल्या घरातील ज्येष्ठांचे मनापासून करतात. त्यात त्यांना आनंद मिळतो, असेही अनेकींनी सांगितले आहे. त्याचबरोबर शक्‍य असेल तिथे ज्येष्ठांनीही समजुतीने वागायला हवे. अर्थात हे सगळे सांगणे तिऱ्हाईताला सोपे असते. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, हे संबंधितांनाच माहिती असते. तरी त्यातूनही समजुतीचा मध्यममार्ग काढून घरातील वातावरण आनंदी, समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळेही अनेक तणाव निवळतात. प्रतिकूलतेतून मार्ग दिसू लागतो. आयुष्य जगायला बळ मिळते.

संबंधित बातम्या