‘त्यांना’ माणूस म्हणून जगू द्या

ऋता बावडेकर
सोमवार, 1 जुलै 2019

संपादकीय
 

आपल्याकडे अनेक परंपरा, प्रथा आहेत. काही प्रथा काळाच्या ओघात मागे पडल्या, तर काही अजूनही आढळतात. काही प्रथांचे तर पुनरुज्जीवन झाल्याचे दिसते. अर्थात प्रत्येक प्रथा, परंपरा वाईट नसते, पण काही मात्र समाजातील वैयक्तिक घटकांना जाचक असू शकतात. विधवांची सामाजिक परिस्थिती अशी अनेकींसाठी जाचक असू शकते. एकविसाव्या शतकातही अनेक विधवांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. 

पतीचे निधन झाल्यापासून विधवांचे हाल सुरू होतात. आजही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पूर्वी महिला सती जात किंवा त्यांना सती जाणे भाग पाडले जाई. राजाराममोहन राय यांनी सतीची ही क्रूर प्रथा बंद पाडली. पण नंतर तिच्या आयुष्यात विद्रुप जगणे आले. केशवपन होत असे. तिला गेरू रंगाचे वस्त्र परिधान करावे लागे. पण काळ बदलला, तशा या रुढीही मागे पडल्या. मात्र आजही अनेक ठिकाणी विधवेवर अलिखित अशी बंधने आहेत. हळदकुंकू लावायचे नाही, गजरा घालायचा नाही, मंगळसूत्र घालायचे नाही.. अशी अनेक बंधने आजही विधवांवर घातली जातात. मात्र ‘असे का?’ असा प्रश्‍न आता विचारला जाऊ लागला आहे. असा प्रश्‍न विचारणाऱ्यांपैकी लतादेवी बोराडे या एक आहेत. आवळाई (जि. सांगली) येथील बोराडे यांनी विधवांनी अहेवलेणी घालावीत यासाठी चळवळ सुरू केली आहे. आजच्या डिजिटल युगातही अनेक अनिष्ट रुढी-परंपरा आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विधवांना अवमानकारक वागणूक मिळते. त्यांना शुभकार्यात भाग घेतला जाऊ देत नाही.  डोहाळजेवणात किंवा बारशाला, हळदीकुंकू समारंभांत त्यांना लांब ठेवले जाते. कोणी बोलावले तरी त्यांना हळदीकुंकू लावले जात नाही. त्यांना त्या कार्यक्रमात भाग घेऊ दिला जात नाही. बोराडे यांच्या ‘विधवा महिला विकास संस्थे’ने या रूढी-परंपरांनाच आव्हान दिले आहे. लतादेवी स्वतः विधवा आहेत, तरी त्या सगळे सौभाग्यलंकार परिधान करतात. अनेक विधवांना त्यांनी त्यांचा हा हक्क मिळवून दिला आहे. 

लग्नानंतर पंचविसाव्या दिवशी लतादेवींच्या पतीचे निधन झाले. अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्या विधवा झाल्या. ‘पांढऱ्या पायांची’ असल्या दूषणांपासून अनेक अपमान-अवमान त्यांनी सहन केले. या धक्‍क्‍यातून थोडे सावरल्यावर त्यांनी बारावीची परीक्षा दिली. डी.एड. केले. शिक्षणाने फरक पडला आणि त्या कुंकू लावू लागल्या. घरात, गावात विरोध झाला. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी चळवळच सुरू केली. सुवासिनींनी विधवांना कुंकू लावण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. गावोगावच्या विधवांच्या मनातील न्यूनगंड दूर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. विधवांच्या परिस्थितीबद्दल जनजागृती केली. त्यांच्या या प्रयत्नांची आज दखल घेतली जात आहे. पण समाजाकडून त्यांना अधिक पाठिंबा मिळण्याची गरज आहे. 

विधवांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या आयुष्यातील नैराश्‍य दूर करण्याचे, त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक अनामी रॉय आणि त्यांच्या कन्या सौम्या रॉय करत आहेत. ‘वंदना फाउंडेशन’तर्फे गेल्या नऊ वर्षांत त्यांनी सुमारे दहा हजार महिलांना मदतीचा हात दिला आहे. गरज असो नसो, महिला सतत काही ना काही काम करत असतात. जमेल तसे त्या कधी शिलाई मशीन चालवतात, कधी चहा विकतात, मेस चालवतात, कपडे, बांगड्या, गंध, टिकल्या, भाजीपाला, फळे, स्टेशनरी विकतात. मात्र, आपल्या कामाच्या विस्तारासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्‍यकता असते. ‘वंदना फाउंडेशन’तर्फे संबंधित महिलांना त्यांच्या व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य दिले जाते. गरजेप्रमाणे बिनव्याजी कर्ज दिले जाते. आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, असे वाटेल तेव्हा त्यांनी कर्जफेड करावी, अशी अपेक्षा असते. आतापर्यंत दहा हजार महिलांना संस्थेतर्फे बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. संस्थेने मुंबई व विदर्भात काम केले असून, आता ते आपल्या कामाचा विस्तार नाशिकमध्येही करणार आहेत. 

विधवा, परित्यक्ता महिलांना समाजात मानहानी सहन करावी लागते. त्याचवेळी या महिलांना मदत करणारे असे अनेक हातही याच समाजातून पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. या प्रयत्नांत वाढ व्हायला हवी. 

आपण लिहितो, बोलतो त्यापेक्षा या महिलांच्या हालअपेष्टांची तीव्रता खूप मोठी असते. अनेकदा तर त्याची कल्पनाही करता येत नाही. आपल्याकडे आजही पुरुषाच्या आधाराशिवाय महिलेचे जगणे अशक्‍य मानले जाते. अशा महिलांना समाज नेहमीच कमी लेखत आला आहे. अनेकदा तर त्यांना ‘खासगी मालमत्ता’ म्हणूनही वागविण्याचे प्रयत्न होतात. ज्या महिला अशा अन्यायाविरुद्ध उभ्या राहतात, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, त्यांना बदनाम केले जाते. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांतदेखील महिलांना अशी वागणूक मिळत असल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी संघर्ष करीत पुढे जाण्याशिवाय त्या महिलेपुढे दुसरा पर्याय नसतो. काही वेळा ती एकटी असते, पण बरेचदा तिच्यावर प्रापंचिक जबाबदाऱ्या असतात. अशावेळी काही काम केल्याशिवाय इलाज नसतो. मग संघर्ष सुरू होतो. सगळा विरोध सहन करून ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी काम करू लागते. अशावेळी तिची मानहानी करण्यापेक्षा, तिला कमी लेखण्यापेक्षा तिला मदत करणे हे समाजाचे कर्तव्य असते. त्या महिलेच्या असहायतेचा फायदा न घेता, एकवेळ मदत राहू देत, पण त्रास दिला नाही तरी खूप असते. अनेकदा हेच होत नाही. तरीही हे सगळे सहन करून महिला धडपड करत राहतात. त्यांना मदत करणे, आधार देणे, त्यांच्या कामाला हातभार लावणे हे समाज म्हणून आपण केले तरी खूप गोष्टी सुलभ होतील.

संबंधित बातम्या