चूक कोणाचीच नाही

ऋता बावडेकर
सोमवार, 8 जुलै 2019

संपादकीय
 

वय कोणतेही असो - कितीही असो, माणसाला सोबतीची आवश्‍यकता असते. तरुणपणी ही गरज कदाचित कमी वाटत असेल, पण उतारवयात ही तीव्रता वाढते. लहानपणी वयामुळे काही न बोलता ही गरज भागत असते. वास्तविक सोबत हवी असे प्रत्येक वयात माणसाला वाटू शकते. कारण तो समाजप्रिय प्राणी आहे. पण उतारवयात गात्रे थकू लागल्यावर आजूबाजूला माणसे हवीत असे तीव्रतेने वाटू लागते. मात्र, अलीकडे मुले (मुलगे-मुली दोन्हीही) परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे हे उतारवय अधिक कातर होताना दिसते आहे. अर्थात यात कोणा एकाचीच चूक आहे, असे म्हणता येणार नाही. पण जवळजवळ घरटी ही समस्या दिसते आहे, एवढे मात्र खरे... 

अनिवासी भारतीय मुलांमागे भारतात राहिलेल्या आईवडिलांची अशी असंख्य उदाहरणे नागपूर येथील डॉ. संजय बजाज यांनी पाहिली. या ज्येष्ठ नागरिकांना किमान आरोग्यविषयक मदत करता यावी म्हणून त्यांनी ‘भारतीय जेरिॲट्रिक सोसायटी’ची नागपूर येथे स्थापना केली. उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात गेलेल्या मुलांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी, त्यांचा एकटेपणा काही अंशी दूर करण्यासाठी ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून काम करते आहे. पण ही काही केवळ नागपूर किंवा परिसराचीच समस्या नाही, तर जवळजवळ संपूर्ण देशाचीच समस्या झाली आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर वेगवेगळ्या शहरांत या गरजेतून अशा संस्था निर्माण झाल्या आहेत. पुण्यातही ‘नृपो’ किंवा अशा काही संस्था आहेत. अशा संस्थांच्या कार्यातून काही अंशी ज्येष्ठांचा एकटेपणा दूर होऊ शकतो. पण समस्या तशीच राहते. हिंडू-फिरू शकत असेपर्यंत तरी सगळे ठीक असते, समस्या तिथून सुरू होते. अशा ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्याही अनेक संस्था दिसतात. पण मोलाच्या या माणसांची ‘माया’ही तेवढीच असते. त्यांनी केलेल्या छळांच्या, फसवणुकीच्या बातम्याही आपण वाचतो-ऐकतो. पण सगळ्यांचाच नाईलाज असतो. त्यामुळे हे दुष्टचक्र सुरूच राहते. यात दोष कोणाला देणार? प्रत्येकाची आपली बाजू आहे आणि त्यांच्या परीने ती बरोबरही आहे. तरी यातून मार्ग तर काढायलाच हवा. तेच काम डॉ. संजय बजाज यांच्यासारखे लोक आपापल्या परीने करत असतात. हे प्रयत्न वाढायला हवेत. 

आपल्याकडे ‘वानप्रस्थाश्रम’ ही एक संकल्पना आहे. त्यामध्ये वार्धक्‍यात लोकांनी संसारात न रमता, वनांचा आश्रय घ्यावा, आपले उर्वरित आयुष्य तेथे व्यतीत करावे, असे अपेक्षित असते. पूर्वी तसे होतही असेल, पण आपल्या एकत्र कुटुंबपद्धतीत असे कोणाला वानप्रस्थाश्रमात जावे लागत नसे. एवढ्या मोठ्या कुटुंबांत ज्येष्ठ मंडळी सहज सामावली जात. पण कुटुंब पद्धती जशी बदलत गेली, तिचा विभक्त पद्धतीकडे जसा प्रवास सुरू झाला; तशी ज्येष्ठांची समस्या जाणवू लागली. बदलत्या कालाप्रमाणे, आधुनिक संशोधनामुळे आयुर्मानही वाढले. पुढे तर तरुण मंडळी शिक्षणासाठी परदेशी जाऊ लागली. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिकडेच स्थिरावू लागली. हळूहळू हे प्रमाण वाढू लागले. घरटी एकतरी मूल परदेशात असल्याची आजची स्थिती आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांच्या एकट्या राहणाऱ्या पालकांचा प्रश्‍न बिकट होऊ लागला. 

तसे बघितले तर केवळ अनिवासी मुलांच्या पालकांचा हा प्रश्‍न नाही. एकुणातच अशी परिस्थिती झाली आहे. छोट्या कुटुंबात ज्येष्ठांना अभावानेच स्थान आढळते; मग त्यांची मुले परदेशात असोत किंवा भारतात - ते राहतात, त्याच शहरात! यामुळे आपल्याकडील वृद्धाश्रमांची संख्याही वाढू लागली आहे. अलीकडे तर ‘रिटायरमेंट होम्स’ही सुरू झाली आहेत. निवृत्तीचा काळ ओळखून अनेकजण अशा ठिकाणी जागा, घरे घेतात. तिथे त्यांच्यासारखेच लोक असतात. त्यांच्या जेवण, राहणे, आरोग्य वगैरे सगळ्या गरजा इथे भागवल्या जातात. हे अर्थातच पैसे भरून. वृद्धाश्रमांत अनेकदा हे मोफत असते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या गरजा तिथेही पूर्ण होतात, पण दर्जाबद्दल खात्री नसते. 

आपल्याकडे हीच मोठी समस्या आहे.. सोयीसुविधा आपल्याकडेही आहेत. पण त्या तितक्‍या ममत्वाने मिळतील याची खात्री नाही. मात्र, याला अपवादही काही वृद्धांश्रम, संस्था आहेत. त्यापैकी काहींचा परिचय याच अंकात करून दिला आहे. त्यावरून माणूसकी अजून ही शिल्लक आहे यावर आणि सकारात्मकतेवर विश्‍वास बसतो. केवळ संस्था चालकच नव्हे, तर तेथे राहणारेही सकारात्मक वाटतात. हे प्रमाण वाढते असायला हवे. 

लहान मूल आणि ज्येष्ठ एकाअर्थी सारखेच असतात. त्यांचा सांभाळ करण्यासाठी इच्छाशक्ती तर लागतेच, पण जोडीला प्रचंड संयम लागतो. एकच वाक्‍य ते सारखे बोलत असतात, बरेचदा सतत तक्रारी करत असतात, गात्रांवरील त्यांचे नियंत्रण कमी होऊ लागलेले असते... अशा असंख्य गोष्टी असतात. अशावेळी आपल्या मनावर ताबा ठेवून, न चिडता या लोकांचे करायचे असते. काडी इथेच पडते. आज जगण्याचा रेटा प्रचंड वाढला आहे. प्रत्येकाला आपले आयुष्य, आपल्या समस्या आहेत. ज्येष्ठांसाठी वेळच नाही. त्यांनी तो काढायला हवा. पुढे त्यांनाही वृद्धत्व येणार आहे.. वगैरे गोष्टी ठीक; पण त्यांनाही हे एकच आयुष्य मिळालेले असते. त्यांच्याही काही इच्छा, हौसमौज असतात. त्या त्यांना पूर्ण करायच्या असतात. त्यात त्यांना ज्येष्ठांचा अडथळा वाटू शकतो. कोणी मुद्दाम वाईट वागत असेल तर तो वेगळाच मुद्दा आहे. 

त्यामुळे दोष कोणा एकाचा नसतो. प्रत्येकाला आपापले जग असते, आपापल्या समस्या असतात. त्यातून जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही जण ज्येष्ठांना घेऊन ही वाटचाल करतात, काहींना ते शक्‍य होत नाही. अशावेळी डॉ. संजय बजाज यांच्यासारख्यांची संख्या वाढायला हवी. हे प्रयत्न वाढायला हवेत. समाजाचीही काही जबाबदारी आहेच की!   

संबंधित बातम्या