स्मार्टफोनपलीकडचे सुंदर जग 

ऋता बावडेकर
सोमवार, 15 जुलै 2019

संपादकीय
 

हा  स्मार्टफोनचा काळ आहे. या फोनमुळे संपूर्ण जग तुमच्या अक्षरशः मुठीत आले आहे. आज एकही गोष्ट अशी नाही, जी या आयताकृती पेटीत सापडणार नाही. सर्च द्यायचा अवकाश इत्थंभूत माहिती तुमच्यासाठी सादर होते. कित्येकदा तर ‘वाचता किती वाचशील दो नयनांनी..’ अशी स्थिती होते. केवळ माहितीच नाही, तर इथे तुम्ही चित्रपट बघू शकता, पुस्तक वाचू शकता, वेगवेगळ्या गोष्टी मागवू शकता... या सगळ्यांचा कंटाळा आला, की गेम्सही खेळू शकता. वेगवेगळ्या गोष्टींच्या इतक्‍या भडिमारामुळेच या यंत्राला ‘आवरा रे...’ असं म्हणण्याची वेळ बहुधा आली आहे. 

या स्मार्टफोन्सनी केवळ मोठ्यांचाच ताबा घेतला आहे असे नाही, तर लहान- म्हणजे जी मुले अजून शाळेतही जात नाहीत अशा मुलांचाही ताबा घेतला आहे. त्यामुळेच हे कसे आवरायचे, असा प्रश्‍न सगळ्यांना पडला आहे. किमान मुलांच्या हातातला मोबाईल तरी जायला हवा, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. अमेरिकेत तर त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत. त्यानुसार स्मार्टफोनच्या आधीच्या युगात जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे काय, तर स्मार्टफोन येण्याआधी जसे आपले जीवन होते, तसे जगण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण वरवर बघता ही गोष्ट सोपी वाटली, तरी अमेरिकेत ती मोठी समस्या ठरत आहे. कारण त्यावेळचे आयुष्य कसे होते, हेच मुळी कोणाला फारसे आठवत नाही. त्यामुळे ते व्यावसायिकांची मदत घेत आहेत. परिणामी एका वेगळ्याच अर्थव्यवस्थेचा तिथे उदय झालेला बघायला मिळतो. या अर्थव्यवस्थेला ते ‘अ न्यू स्क्रीन-फ्री पेरेंटिंग कोच इकॉनॉमी’ म्हणतात. ही मंडळी त्यांच्या घरी, शाळांत, चर्च, सिनेगॉगमध्ये जाऊन पूर्वीचे पालकत्व कसे होते, याबद्दल आताच्या पालकांना मार्गदर्शन करतात. पण ही पालकमंडळीच स्मार्टफोनमध्ये इतकी अडकलेली असतात, त्यातूनच स्वतःचे मनोरंजन करून घेत असतात, की त्याशिवाय आपला वेळ कसा घालवायचा असा प्रश्‍न त्यांना पडतो. तसेच, या स्मार्टफोनशिवाय मुलांना तरी कसे वाढवायचे? त्यांच्याबरोबर वेळ कसा घालवायचा? असे अनेक विचित्र प्रश्‍न त्यांना पडतात. आपले बालपण ‘स्मार्टफोनशिवायच’ गेले आहे, हे ही मंडळी जवळजवळ विसरून गेली आहेत. मग ते या विषयावरील तज्ज्ञांची मते घेतात. हे तज्ज्ञ काय करतात, तर त्यांना त्यांचे लहानपण आठवायला सांगतात. त्यांना विचारतात, ‘लहानपणी तुम्हा तुमचा वेळ कसा घालवत होतात? काय काय करत होतात?’ मग आताच्या या पालकांना आठवते, आपण चित्रे काढत होतो. निरनिराळे खेळ खेळत होतो. मैदानावर जात होतो... काही तर केवळ चंद्राकडे बघत पडून राहात असतात... अशा विविध उत्तरांनंतर ‘आता तुमच्या मुलांनाही अशाच पद्धतीने मोठे करा,’ असा सल्ला तज्ज्ञ देतात. 

आपल्याला हे विचित्र वाटेल. एवढ्यासाठी ही ‘तज्ज्ञ’ मंडळी कशाला हवीत असे वाटेल. पण अमेरिकेत अशी परिस्थिती आहे, हे नक्की. आपल्या मुलांना (आणि ओघात स्वतःलाही) स्मार्टफोनच्या विळख्यातून कसे सोडवावे, हे त्यांना कळत नाही. कदाचित थोडा विचार केल्यावर त्यांची त्यांनाच उत्तरे मिळूही शकतील. पण जगण्याचा रेटाच इतका आहे, की तेवढा विचार करण्याइतकाही वेळ त्यांच्याकडे नाही किंवा त्यांची तशी मानसिकता नाही. जिथे पैसे दिले की सगळी सुखे मिळत असतील, तिथे विचार करण्यात वेळ कोण घालवणार, अशीही मानसिकता असू शकेल. पण यामुळे तिथे तथाकथित तज्ज्ञ वाढले आहेत. 

आज आपल्याकडे अशी परिस्थिती नसली, तरी स्मार्टफोनची समस्या आपल्यालाही भेडसावू लागली आहे. घरात बघा, सार्वजनिक ठिकाणी बघा.. प्रत्येकजण फोनमध्ये डोके घालून बसलेला दिसतो. साधा चहा प्यायला गेले, तरी गप्पा मारण्याऐवजी सगळे मोबाईलमध्ये डोकंघालून बसलेले दिसतात. घरातही जेवताना हेच चित्र दिसते. मोठ्यांचे अनुकरण लहान मुलेही करतात. त्यांना तर गेम्सचेही आकर्षण असते. एकतर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरांतील सदस्यांची संख्या कमी झाली आहे, त्यात मोबाईलमुळे उरलासुरला संवादही थांबतो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहात आहे. हे वेळीच थांबवायला हवे. 

विभक्त असली, तरी आपल्याकडे अजूनही कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे ‘स्मार्टफोनशिवाय आपण कसे वाढलो?’ हे न आठवण्याइतकी परिस्थिती निदान आपल्याकडे तरी अजून आलेली नाही. पण ती येणारच नाही, याची शाश्‍वती नाही. अर्थात स्वतःचेच बालपण आठवण्यासाठी आपल्याला भाडोत्री मदत घ्यावी लागणार नाही, हे खरे. कारण ती आठवण करून देण्यासाठी आपल्या कुटुंबातील मंडळी असतील आणि आपण स्वतःही तेवढे स्वतःला परके झालेले नसू. 

स्मार्टफोनमुळे माणसे माणसांना नाही, तर आपणही आपल्याला परके झालो आहोत- होत आहोत. केवळ एवढेच नाही, तर या फोनमुळे डोळे, मान, मेंदू वगैरे अनेक शारीरिक व्याधीही निर्माण होत आहेत. त्याही तितक्‍याच घातक ठरू शकतात. त्यामुळे इतर कोणासाठी नव्हे, तर स्वतःसाठीच आपण स्मार्टफोनपासून दूर राहायला हवे. आपल्या पुढच्या पिढीला - आपल्या मुलांना त्यापासून लांब ठेवायला हवे. कुठलेही तंत्रज्ञान वाईट नसते. त्यातून आपण एकप्रकारची प्रगतीच साधलेली असते. पण त्याचा अतिरेक वाईटच. स्मार्टफोनच्या बाबतीत नेमके हेच होऊ लागले आहे. या तंत्रज्ञानाइतकेच, त्या पलीकडेही एक खूप सुंदर जग आहे.. स्मार्टफोनमध्येच डोके घालून बसलो, तर ते आपण कधी बघणार? त्याचा आस्वाद कधी घेणार? तेव्हा वेळीच सावध होऊया... 

संबंधित बातम्या