पावसापाण्याचे जरा जपूनच! 

ऋता बावडेकर
सोमवार, 22 जुलै 2019

संपादकीय
 

पावसाळा हा अनेकांचा आवडीचा ऋतू आहे. पावसात भिजायला, फिरायला, खेळायला बहुतेकांना आवडते. या काळात सहलींचे बेत आखले जातात. ते पार पाडले जातात. शहरातून दूर कुठेतरी निसर्गसान्निध्यात भटकंती करायला कोणाला आवडणार नाही? पण त्यामुळेच काळजी घेतली पाहिजे. एकतर पावसामुळे हवेत बदल होतो, निसर्गात बदल होतो तो ओळखून आपले बेत आखले पाहिजेत. म्हणजे मग पावसाची मजा अधिक घेता येईल. 

महिना संपण्याआधीच आपल्याला पावसाचे वेध लागतात. पाऊस सुरू झाला की काय करायचे? कुठे जायचे? असे आपले बेत ठरू लागतात. त्यात पावसाळी लहानमोठ्या सहली प्रमुख असतात. बाकीचे कार्यक्रम ओघाने अचानक किंवा थोड्याफार नियोजनाने ठरतात. खरेच हा ऋतूच सगळ्यांना मोहून टाकणारा आहे. एका पावसाच्या सरीने सृष्टीचे रूपच पालटून जाते. ती सुस्नात दिसू लागते. आणखी पावसामुळे ती ताजीतवानी, टवटवीत दिसू लागते. सगळीकडे हिरवेगार होऊन जाते. पण अलीकडे पावसाचे आगमन लांबू लागले आहे. कधीकाळी ६-७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मोसमी पाऊस आता कधी येईल याचा नेम नसतो. अलीकडे साधारण जुलैपासून किंवा त्यानंतरच खऱ्या अर्थाने पाऊस सुरू होतो, असा अनुभव आहे. अर्थात त्यासाठीही आपणच जबाबदार आहोत. कसलाही मागचापुढचा विचार न करता आपण जंगलतोड करत आहोत. झाडे तोडत आहोत. टेकड्या फोडत आहोत. तिथे मोठमोठे सिमेंटचे टॉवर्स उभारत आहोत... नैसर्गिक जंगले नष्ट करून अशा निसर्गाच्या सान्निध्यात घरे बांधून विकत आहोत. एवढे करून पावसाने वेळेवर येण्याची, भरपूर येण्याची अपेक्षा करत आहोत. तेही त्या पावसासाठी पूरक असे काही न करता. एवढे असूनही पाऊस अजूनपर्यंततरी उशिरा का होईना पडतो, हे आपले भाग्यच म्हणायला हवे. 

तर अशा या पावसात चिंब भिजायला आपण आतुर असतो. ते स्वाभाविकही आहे. पण तसे करताना काही काळजी घ्यायला हवी. पाऊस, निसर्ग समजून घ्यायला हवा... 

पावसात फिरायला छान वाटत असले, तरी या काळात निसर्गात काही बदल होत असतात. एक म्हणजे, पावसामुळे शेवाळे साचते. सरळ जमिनीवर त्याचा तितकासा त्रास होत नाही. पण डोंगराचा, टेकडीचा किंवा कुठलाही चढ चढायला गेलात की पाय घसरायला लागतात. उंची कमी असते तेव्हा थोडे लागण्यापलीकडे फार त्रास होत नाही. पण उंची जास्त असेल आणि त्या उंचीवरून पाय घसरला तर हा अपघात जीवघेणा ठरू शकतो. सततच्या पावसामुळे कडे कोसळण्याचीही भीती असते. झाडे, फांद्या तुटण्याची शक्‍यता असते. 

शहराबाहेर नाही, काही दिवसांपूर्वी पुण्यात अशी एक घटना घडलेली आहे. चहा पिण्यासाठी म्हणून काही दिव्यांग एका टपरीवर गेले होते. ते झाडाखाली उभे होते. त्याचवेळी झाडाची एक फांदी त्यांच्यापैकी एका महिलेच्या बरोबर डोक्‍यात पडली आणि ती महिला त्यात दगावली. काही वर्षांपूर्वी या झाडाची फांदी तोडण्यात आली होती. त्याचा काही भाग शिल्लक होता. तो कुजून त्या दिवशी पडला, तो नेमका त्या महिलेच्या डोक्‍यावर. यात चूक कोणाची वगैरे गोष्टी तपासल्या जातील. पण असे अपघात पावसात होऊ शकतात. 

पाऊस सुरू झाल्यावर ‘मॉन्सून ट्रीप’ सुरू होतात, याची जाणीव असल्याने हवामान खात्याने आधीच दक्षतेचा इशारा दिला आहे. ‘मॉन्सून फुल ॲक्‍टिव्ह आहे. मस्त पाऊस पडतोय.. म्हणून कोणी वीकेंडला पावसात भिजण्यासाठी घाटमाथ्यावर किंवा डोंगरावर जाणार असेल, तर त्यांनी त्यांचा प्लॅन थांबवावा. कारण घाटमाथ्यावरील दरडी कोसळण्याची शक्‍यता आहे,’ असा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याबरोबरच ‘सतर्क’ या संस्थेनेही पुणे, सातारा, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन या संस्थांनी केले आहे. 

या काळात ट्रेकिंगचे जणू पेव फुटते. खरे बघता, ट्रेकिंगचे आपले असे शास्त्र असते. महागडे शूज, महागडी इतर साधने घेतली आणि निघाले ट्रेकिंगला इतके ते सोपे नसते. त्यासाठी प्रथम शारीरिक तयारी करावी लागते. स्टॅमिना वाढवावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. एखादा जिना चढावा इतके डोंगर चढणे सोपे नसते. मुख्य म्हणजे, एखाद्या ट्रेकच्या म्होरक्‍याला - आपण मुशाफिरी करणार आहोत त्या भागाची माहिती असावी लागते. नाहीतर जंगलात हरवायला होते, नदीत पाय निसटून वाहून जायला होते... मग सगळी यंत्रणा तुफान पावसात मदतकार्यासाठी जुंपली जाते. मदतकार्य व्हायलाच हवे, पण आपल्या हलगर्जीपणामुळे इतरांचा जीव का धोक्‍यात घालावा? 

लांब जायला नको.. पाऊस सुरू झाला की पुण्या-मुंबईपासून जवळ असलेल्या भुशी डॅमवर आबालवृद्धांची प्रचंड गर्दी होते. अक्षरशः चेंगराचेंगरी होते. तेवढ्यातही सेल्फी काढण्याचा उत्साह असतो. अलीकडे आपला आनंद आपण ‘पिण्या’शिवाय साजराच करू शकत नाही. त्यामुळे तो उपद्रव असतो तो वेगळा. या सगळ्याचा ताण प्रशासकीय सेवेवर येतो. याचा आपण कधीतरी विचार करणार आहोत का? की आपला आनंद (?) तेवढा महत्त्वाचा? 

पावसामुळे आरोग्यावरही परिणाम होत असतो. तेही जपायला हवे. त्यामुळे पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद जरूर घ्या.. पण त्यामुळे निसर्गाला, आपल्या सहकाऱ्यांना, यंत्रणांना त्याचा त्रास होणार नाही याचे भान बाळगून! असे करताना स्वतःलाही जपायलाच हवे, तरच पुढचे अनेक पावसाळे आपल्याला आनंद घेता येईल...

संबंधित बातम्या