नेमकी जबाबदारी कोणाची? 

ऋता बावडेकर
सोमवार, 29 जुलै 2019

संपादकीय
 

आपण खरेच एकविसाव्या शतकात आहोत ना? याचे उत्तर होकारार्थी असले, तरी अलीकडे असा प्रश्‍न वारंवार मनात येतो. तशा घटनाच घडतात. तशा बातम्याच ऐका-वाचायला मिळतात. आज आपण सर्व प्रकारची प्रगती केली आहे, पण ती प्रगती आता आपल्यालाच खुपू लागली आहे की काय असे वाटू लागले आहे. या प्रगतीत तंत्रज्ञानदेखील येते. काही लोक त्याचा दुरुपयोग करतात, हे मान्य पण म्हणून एका गटाला ते वापरण्याचा हक्कच नाकारणे हे कितपत योग्य आहे? 

गुजरातमधील दंतीवाडा (जि. बनासकांठा) तालुक्‍यातील बारा गावांच्या समुदायाने एक निर्णय घेतला. या निर्णयाला एकमताने मंजुरी मिळाली... आणि त्यांनी तो निर्णय जाहीर केला, की - गुजरातच्या ठाकोर समाजाच्या अविवाहित मुलींना यापुढे मोबाईल वापरता येणार नाही. मोबाईल बाळगल्याप्रकरणी पकडले गेल्यास संबंधित मुलीच्या वडिलांकडून दंड म्हणून तब्बल दीड लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत. मुलींचा सगळा वेळ मोबाईलमध्ये जातो. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, असे याचे कारण देण्यात आले आहे. मात्र हा नियम समाजातील अविवाहित मुलांसाठी नाही. तसेच आंतरजातीय विवाह करण्यासही मनाई करण्यात आली आहे. हा नियम मुलींप्रमाणे मुलांनाही लागू आहे. असा विवाह कोणी केला, तर संबंधित मुलाच्या (अर्थातच मुलीच्याही) पालकांना दंड करण्यात येणार आहे. हे नियम - निर्णय अजून अमलात आले नसले तरी जातपंचायतीमध्ये ते घेण्यात आल्याची माहिती आहे. 

काही दिवसांपूर्वी खाप पंचायतीनेही असेच निर्बंध मुलींवर आणले होते. त्याला समाजातील सर्व स्तरांतून प्रचंड विरोध झाला. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही त्याचे पडसाद उमटले. काही दिवसांनी पंचायतीला आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला. 

... तरी हे असे वारंवार का होते? का व्हावे? असे प्रश्‍न पडतातच. मुख्य म्हणजे, प्रत्येक वेळी सगळी बंधने मुलींवरच का लादली जातात? अर्थातच या प्रश्‍नांची उत्तरे कोणाला माहिती नाहीत अशातला भाग नाही. आपल्या समाजरचनेतच ती दडलेली आहेत. एकीकडे आपण बाईला उच्च दर्जा दिलेला आहे. उच्च म्हणजे अगदी देवीचा - देवतेचा दर्जा दिला आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून पहिला घावही तिच्यावरच पडतो. एखाद्याचा सूड घ्यायचा असेल, मानहानी करायची असेल; तर पहिला हात बाईच्या पदरावरच पडतो. तेव्हा ती देवी आहे, कोणाच्या ‘घरची इज्जत’ आहे हे विचारही डोक्‍यात येत नाही. आपला सूड आणि तो घेतल्याचे समाधान (?) मोठे असते. प्रामुख्याने या कारणावरूनच घरातील मुली - बायकांना घरातच डांबून ठेवण्याची गरज भासू लागते. ज्या मुली-बायका शिक्षण - नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात त्यांची टिंगल करणे, छेड काढणे, त्यांच्या चारित्र्याबद्दल वाईटसाईट बोलणे यातच मग धन्यता मानली जाते. यातलाही विरोधाभास म्हणजे, ज्या महिला स्वतःसाठी, घरासाठी प्रामाणिकपणे कष्ट करतात, पैसे कमवतात त्यांना चारित्र्यहीन, संस्कारशून्य म्हणून हिणवले जाते; पण त्यांची छेड काढणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुला-पुरुषांना मात्र कोणी काही बोलत नाही. त्यांच्यासाठी वेगळा न्याय असतो. अशी बहुतांश मुले चरितार्थासाठी काहीही करत नाहीत. आई, बहीण, बायको (असलेल्या बंधनांतून) जे काही कमवून आणेल त्यावर हा शिरजोरी करणार... आपल्या देशातील अनेक गावे, खेड्यांतील हे चित्र आहे. शहरांतही काही प्रमाणांत असे चित्र बघायला मिळते. 

असे सगळे ऐकल्यावर कोणीही म्हणेल, बायका हे सगळे का सहन करतात? विरोध का करत नाहीत? साहजिक आहे, कोणाच्याही मनात हेच येईल. अशावेळी प्रत्येकाने - अगदी बायकांनीही स्वतःलाच प्रश्‍न विचारावेत - आपल्या घरात बाईला स्वातंत्र्य आहे? तिच्या मनाप्रमाणे ती वागू शकते? आपण तिला तसे स्वातंत्र्य देतो? बहुतेकवेळा उत्तरे नकारार्थीच येतील. पण बाईच का, अनेकदा पुरुषदेखील इतके स्वातंत्र्य उपभोगू शकत नाहीत. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या बंधनात असतेच. वर दिलेली उदाहरणे सुदैवाने अपवादात्मक असतात. पण जी असतात, त्यात बाईच प्रामुख्याने भरडली जाते हे दुर्दैव आहे. 

ही परिस्थिती बदलायला हवी. त्यासाठी समाजाने म्हणजे त्यातील माणसांनी एकत्र येऊन विचार करायला हवा. स्त्री व पुरुष ही समाजरथाची दोन चाके मानली तर एका चाकावर सतत अन्याय करून, त्यावर बंधने घालून हा रथ पुढे कसा जायचा? दुसरे चाक कितीही भक्कम असले (किंवा तसे त्याला वाटले) तरी काही अंतरच ते एकट्याने पार करू शकेल. पुढे जायचे असेल तर दोघांत सौहार्दाचेच संबंध असायला हवेत. दोघांनीही परस्परांचा आदर करायला पाहिजे. तरच पुढे जाता येईल. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे सहकार्य मिळायला हवे. एक जण पुढे जात असेल तर कोणी त्याचा (किंवा तिचा) पाय ओढता कामा नये. त्यांना दूषणे देऊन घरात डांबून ठेवता कामा नये. 

मुली घराबाहेर पडल्या की बिघडतात, त्यांना त्रास होतो, हे सगळे समज मनातून काढून टाकले पाहिजेत. त्यांना बिघडवणारे, त्रास देणारे कोण असतात? आपल्यापैकीच ना? मग मुलींवर बंधने आणून त्यांना डांबून ठेवण्यापेक्षा त्रास देणाऱ्या या घटकांवर आपण बंधने का आणत नाही? समाज म्हणून त्यांच्यावर आपला वचक का नाही? आपल्यासमोरच ते आपल्या आयाबहिणींवर कसे हात उचलू शकतात?.. आपण हे करत नाही म्हणून त्या घटकांची हिंमत वाढते. त्यांचा उपद्रव वाढतो आणि त्याचा त्रास मुलींना-बायकांना सहन करावा लागतो; त्यांचा काहीही दोष नसताना. हे थांबणारच नाही का? उलट प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना जबाबदार धरतो आहोत. खरेतर ज्यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ येते त्यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. ज्याचे माप त्याच्या पदरात घालायला हवे.. आपणच ते करायला हवे...
 

संबंधित बातम्या