आपले वागणे सुधारेल? 

ऋता बावडेकर
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

संपादकीय
 

आपण जिथे जातो, तिथे आपले संस्कार, आपली संस्कृती घेऊन जात असतो. सगळीकडे त्याचे महत्त्व आहेच, पण परदेशात अधिक असते. कारण तिथे आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय? वगैरे गोष्टी तुलनेत कमी महत्त्वाच्या असतात. त्यापेक्षाही ‘तुम्ही कोणत्या देशाचे आहात?’ याला महत्त्व असते. त्यामुळेच कुठेही वावरताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचे भान असायला हवे. ते सुटले, की बाली(इंडोनेशिया)मध्ये निघाली तशी लाज निघू शकते. 

बाली येथील आलिशान रिसॉर्टमधील आपला मुक्काम संपवून एक भारतीय कुटुंब परत निघाले होते. ते प्रवेशद्वाराजवळही पोचले नसतील तेवढ्यात त्यांची गाडी थांबवण्यात आली. काही कळायच्या आत त्यांच्या सामानाची झडती सुरू झाली.. आणि एकामागोमाग एक त्यातून जणू खजिनाच बाहेर पडू लागला. चमचे, क्रोकरी, टॉवेल्स, साबण, शाम्पू, चादरी, हेअरड्रायर... किती वस्तू असाव्यात. एक महिला सातत्याने सॉरी सॉरी म्हणत होती, पण त्यात ‘सॉरी.. आता जाऊ दे आम्हाला...’ असाच अर्थ वाटत होता. बरोबरच्या दोन-तीन मुली, हे आपल्याबाबतीत घडतच नाही अशा स्थितप्रज्ञ बसल्या होत्या. दोन पुरुष ‘जाऊदे जाऊदे’ म्हणत होते. त्यातील एकजण ‘वी विल पे’ ‘वी विल पे’ म्हणत त्या अधिकाऱ्याबरोबर तोडपाणी करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या अधिकाऱ्याने जुमानले नाही. ‘येस वुई नो, यु आर व्हेरी रिच’ असे म्हणत त्याने पोलिसांना बोलवायला सांगितले. पण ‘ही फॅमिली टूर आहे.. पोलिसांना कशाला बोलावता? वी विल पे..’ असे तो माणूस परत म्हणू लागला. आम्हाला विमान पकडायचे आहे, असेही त्याने सांगितले. पण आपल्या हातून एवढा मोठा अपराध घडला, त्यात नाहक आपल्या देशाचे नाव बदनाम झाले, आपलीही इज्जत निघते आहे... याची कुठेही त्या कुटुंबाला पर्वा नव्हती. शरम नव्हती. 

अलीकडे पर्यटनाचे प्रमाण आपल्याकडे खूप वाढले आहे. केवळ देशातच नाही, तर परदेशातही प्रवास घडू लागले आहेत. पूर्वी सुट्यांपुरते मर्यादित असलेले हे पर्यटन आता कधीही होऊ लागले आहे. ट्रॅव्हल कंपन्यांच्या तशा जाहिराती येतात. मात्र, पर्यटनाचे काही अलिखित नियम असतात, काही अपेक्षा असतात, हे अनेकदा आपल्या गावीही नसते. कारण एंजॉयमेंटच्या आपल्यापैकी अनेकांच्या कल्पनाच वेगळ्या आणि अचाट आहेत. आरडाओरडा त्यात प्रामुख्याने येतो. आपला आनंद साजरा करायचा, तर तो आरडून ओरडूनच करायला हवा, अशी आपली ठाम समजूत आहे. मग मोठमोठ्याने हसणे, अंताक्षरी खेळणे - त्यात तारस्वरात गाणी म्हणणे; प्रसंगी नाचणे, गप्पा मारणे.. वगैरे गोष्टी आपण करतो. त्यामुळे इतर कोणाला त्रास होत असेल हे आपल्या गावीही नसते. घराबाहेर पडले, की मुलांना अक्षरशः सोडून दिलेले असते. ते ओरडत असतात, धपाधपा आवाज करत चालत-पळत असतात, गोळ्या-चॉकलेटे खाऊन कागद तिथेच टाकत असतात, कशालाही हात पुसत असतात... कोणाचेही त्याकडे लक्ष नसते. असे प्रकार जोपर्यंत आपल्याकडे होतात, तोपर्यंत (एकवेळ) ठीक; पण परदेशात ते कसे मान्य होतील? तिथे त्यांचे नियम मान्यच करावे लागतात. तिकडे गेले की आपण ते मान्य करतोही. पण प्रमाण खूप कमी असल्याचे आता लक्षात येते आहे. 

शरमेने मान खाली घालावी, असे प्रकार अनेकदा आपण परदेशी भूमीवर करत असतो. बेशिस्त वागणे, मोठमोठ्याने बोलणे वगैरे प्रकार तर असतातच; पण इतरही अनेक गोष्टी आपण करत असतो. परदेशात अनेक ठिकाणी टॉयलेटला जाण्यासाठी पैसे पडतात. त्याशिवाय दारच उघडत नाही. त्या नाण्याची किंमत भारतीय चलनात खूप होते, तेवढे पैसे या नैसर्गिक विधीसाठी घालवायला आपले लोक तयार नसतात. हॉटेलच्या मुक्कामात अनेकदा नाश्‍ता मोफत असतो. तो पोटभर करावा, हेच अभिप्रेत असते. पण म्हणून दुपारच्या जेवणाची सोय म्हणून पिशव्याच्या पिशव्या भरून घ्यायच्या नसतात, हे आपण कधी शिकणार? शिकणे लांबच, त्यातच आपल्याला शहाणपण वाटते.  

रांग हा विषय तर आपल्याकडे चेष्टेचाच आहे. ‘रांग, शिस्त म्हणजे काय रे भाऊ?’ अशी आपली परिस्थिती. ती मोडण्यातच आपण धन्यता मानतो. अगदी विमानात चढतानाही आपण आपली ही सवय मोडायला तयार नसतो. जागा पकडण्याचे झंझट नसते. पण तरी आपली धावपळ सुरू असते. का, तर आपल्या हॅंडबॅगेला जागा करायची असते. विमान लॅंड झाल्या झाल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून बॅगा काढण्याची धडपड सुरू होते. दाराशी जाऊन लोक उभे राहतात. जागतिक पातळीवर हे सगळे फारच हास्यास्पद असते. पण आपल्याकडे शिस्त पाळणारा हास्यास्पद ठरतो. 

हे चित्र बदलायला हवे. केवळ जागतिक पातळीवर नाही. तर देशपातळीवरदेखील बदलायला हवे. आपला देश आहे, म्हणून कसेही वागणे, कुठेही कचरा करणे, थुंकणे हे प्रकार थांबायला हवेत. काही दिवसांपूर्वी सरकारने विमानाच्या सोयीसुविधा ट्रेनमध्ये दिल्या. त्याची चित्रे सर्वत्र झळकली.. पाठोपाठ या ट्रेनच्या झालेल्या दूरवस्थेचीही छायाचित्रे झळकली. ईयरफोन्स गायब, पंखे तोडलेले, सीटला लावलेले स्क्रीन्स उखडलेले, टॉयलेटमधील नळ तोडलेले, सीट फाडलेल्या... आपल्याच पैशातून घेतलेल्या या मालमत्तेचे ‘सार्वजनिक’ म्हणून नुकसान. बरे, हे करणारे कोणी गरीब किंवा तसे लोक नव्हते; तर स्वतःला उच्चभ्रू समजणारे, त्या ट्रेनचे भाडे परवडणारे लोकच होते. घरात गडगंज असताना फुकटच्या वस्तूंचा इतका मोह? बाली येथील घटनेतही ‘आय विल पे’ म्हणणाऱ्याला जर हे सगळे परवडू शकते, तर मुळात पळवापळवी करायचीच कशाला? 

ही वृत्ती बदलायला हवी. स्वतःच्या इभ्रतीचा, देशाच्या प्रतिष्ठेचा विचार केला तरच असे प्रकार थांबू शकतील.

संबंधित बातम्या