...पाऊस आला मोठ्ठा! 

ऋता बावडेकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

संपादकीय
 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यासारखा काही भाग कोरडा राहिला, तरी अनेक धरणांतून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे या भागांनाही दिलासा मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधारण जूनपासून पावसाचे दिवस सुरू होतात. पण अलीकडे त्याचे हे वेळापत्रक बदलले आहे. तो उशिरा येऊ लागला आहे. पण गेल्या काही वर्षांत त्याने आपला कोटा बऱ्यापैकी पूर्ण केला आहे. यंदाही त्याने असेच मनावर घेतलेले दिसते. 

सोमवार-मंगळवारपर्यंत पावसाने अगदी कहर केला. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र भिजून चिंब झाला आहे. या भागातील महत्त्वाची धरणे अक्षरशः ओव्हर फ्लो झाली आहेत. कोयना, खडकवासला, गंगापूर वगैरे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने संपूर्ण राज्यातच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अभूतपूर्व असे वातावरण या काळात होते. 

इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पावसाळ्याचे आकर्षण आपल्याला अधिक असते. पावसात भिजणे, फिरणे, चमचमीत पदार्थ करून खाणे, पर्यटनाला जाणे, ट्रेकिंगला जाणे... असे अनेक बेत या दिवसांत केले जातात. बरोबरच आहे. रुटीनमधून बदल हवाच; मात्र असा बदल करताना, वेगवेगळे बेत आखताना काही काळजी घेतलीच पाहिजे. निसर्गापुढे उन्माद करता कामा नये. त्याच्याबरोबर स्पर्धा करता कामा नये. एरवी शांत असलेला निसर्ग कधी रौद्र रूप धारण करेल सांगता येत नाही. 

पाऊस सुरू झाला, की बहुतेकांना ट्रेकिंगसाठी, पर्यटनासाठी बाहेर पडण्याची हुक्की येते. मग गडावर जा, धरणावर जा, निसर्गाच्या सान्निध्यात कुठेही जा... असे बेत सुरू होतात. असे बेत करायलाही हरकत नाही, पण ते करताना काही काळजी घ्यायलाच हवी. सर्वप्रथम आपण कुठे जाणार आहोत त्या भागाची माहिती नीट घ्यायला हवी. आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाला ती द्यायला हवी. अशा ट्रेकिंग किंवा पर्यटनात भलते धाडस करायला नको. कारण हा भाग अपरिचित असतो. पावसामुळे वातावरण बदललेले असते. रस्ते निसरडे झालेले असतात. जंगल, गडांवरचे रस्ते चकवा देऊ शकतात. आपण रस्ते चुकू शकतो. हे सगळे लक्षात घेऊन नियोजन करावे. 

पाण्याचे आकर्षण असल्याने नदीकाठ, धरण परिसर या भागात फिरायला जाण्याचे प्रमाणही वाढते असते. लोणावळा भागातील भुशी डॅम तर अशा पर्यटनासाठी विशेष लोकप्रिय आहे. शनिवार-रविवारी तर या भागात पाऊल ठेवायलाही जागा नसते. केवळ तरुणच नाही, तर सर्व वयोगटातील नागरिक या गर्दीत असतात. अनेकदा अतिरिक्त पाणी सोडल्याची सूचनाही अनेकांना कळत नाही किंवा त्यांचे लक्ष नसते. प्रत्येक हंगामात असा काही दुर्घटना होत असतात, पण त्यापासून कोणी धडा घेत नाही. अशा अभूतपूर्व परिस्थितीत अडकून पडण्याचे प्रमाणही खूप असते. मग या नागरिकांच्या बचावासाठी प्रशासनाला वेठीस धरले जाते. त्यांना त्यांच्या प्राणांची बाजी लावावी लागते. एवढे होऊनही त्यातून शिकत कोणीच नाही. पुन्हा आपले पहिले पाढे पंचावन्न! 

‘एंजॉयमेंट’च्या आपल्या कल्पनाही अफाट असतात. आरडाओरडा, नाचगाणी, धिंगाणा.. या बरोबरच मद्यपान हा एक आवडीचा विषय झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊन खाणेपिणे हा आवडता कार्यक्रम आहे. नंतर तो सगळा कचरा तिथेच टाकायचा. बाटल्या तशाच ठेवायच्या किंवा फोडायच्या. आपलाच परिसर आपण घाण करत आहोत, याचे भान नाही. त्याची पर्वाही नाही. जणू तो आपला अधिकारच आहे. 

धरणे  ओव्हर फ्लो झाली, की पाण्याचा विसर्ग करावा लागतो. पाणी सोडले की शहरात, गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशावेळी शांतपणे घरात बसावे, तर ते पाणी बघायला सर्व वयोगटातील माणसांचे लोंढेच्या लोंढे घराबाहेर पडतात. फोटो घे, व्हिडिओ काढ.. हल्ली ‘सेल्फी’चे प्रमाण आणि स्तोम वाढले आहे. सेल्फी घेताना अनेक अपघात झाले, पण त्यातूनही काही शिकायला आपण तयार नाही. आपल्या अशा वागण्यामुळे प्रशासनावर, वेगवेगळ्या यंत्रणांवर किती ताण येऊ शकतो हा विचार तर कोणाच्या गावीही नसतो. मी, माझा आनंद तेवढा महत्त्वाचा! 

अलीकडे पाऊस सुरू व्हायला उशीर होतो आहे. पण गेल्या काही हंगामात, उशिरा का असेना त्याने आपले काम चोख केलेले आहे. त्या बदल्यात कृतज्ञ न राहता, आपण आपली मनमानी सुरूच ठेवतो. जंगले उद्ध्वस्त करतो, टेकड्या फोडतो, डोंगर पोखरतो, झाडे तोडतो... पावसाला पोषक ते सगळे वातावरण बिघडवून टाकतो. एवढे नुकसान करून परत त्याची भरपाईही करत नाही. किंबहुना तसे काही आपल्या डोक्यातही येत नाही... तरीही पावसाने-निसर्गाने आजपर्यंत तरी आपल्याला फारसा दगा दिलेला नाही. उशिरा का असेना तो येतो, आपल्या परीने सगळा परिसर आबादीआबाद करण्याचा प्रयत्न करतो. तो गेल्यावर मात्र आपण काहीही करत नाही. तो परत येईल या खात्रीने पुन्हा मोडतोड सुरू करतो. पावसाचे पाणी साठवत नाही, तसे प्रयत्नही करत नाही. पुढच्या वर्षी तो नाही आला किंवा उशिरा आला, की त्याच्या नावाने खडे फोडू लागतो. हे योग्य आहे का? 

या वर्षी तर पाऊस मोठा आला आहे, पण आपण असेच हातावर हात धरून बसलोत तर पुढच्या वर्षी पुन्हा ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत त्याला ‘पैशा’ची लालूच दाखवावी लागेल... आणि त्याही वर्षी आपला ‘पैसा’ खोटा झाला, तर पाऊस ‘मोठ्ठा’ येईल का? परत परत तो किती वेळा फसेल? विचार करायला हवा...   

संबंधित बातम्या