निसर्गाचा कोप

ऋता बावडेकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

संपादकीय
 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भाग वगळता इतर सर्वत्र पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. काही दिवसांपासून त्याचा जोर काहीसा ओसरला असला, तरी अधूनमधून मोठमोठ्या सरी येतच आहेत. मोठमोठ्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस नसलेल्या भागांतील धरणेही भरत आहेत व त्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी तरी कमी झाली, असे म्हणता येऊ शकते. केवळ पुण्याचाच विचार केला तर टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळीतून आतापर्यंत किमान एक वर्षाचा विसर्ग करण्यात आला आहे. यावरून पावसाचे प्रमाण लक्षात यावे. नाशिक परिसरात तर गोदेला दोन वेळा पूर आला. 

धरणांची पातळी जेव्हा पाणी गाठते, तेव्हा त्यातील पाण्याचा विसर्ग करण्याशिवाय पर्याय राहात नाही. पुण्यात किंवा अन्यत्र तसा विसर्ग यावेळी अनेकवेळा करावा लागला. अजूनही काही ठिकाणी हा विसर्ग सुरूच आहे. अशावेळी हे पाणी वाहून जाण्यासाठी मोकळी वाट हवी. यावेळी काय किंवा जेव्हा जोरदार पाऊस होतो तेव्हा काय; पाणी वाहायला नेहमी अडथळा येत असल्याचे आपण पाहतो आहोत. यावर्षी या प्रकाराचा अतिरेक झाला. पाणी वाहून जाण्याला वाटच मिळेना. साहजिकच कोल्हापूर, सांगली परिसरात महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. शिरोळसारखी गावे तर पाण्याने वेढली गेली. त्यांना बाहेर येता येईन, बाहेरच्या लोकांना तिथे जाईना अशी अभूतपूर्व, चिंताजनक परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारच्या मदतीसाठी न थांबता स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले होते. पण ते अर्थातच पुरेसे नव्हते. दरम्यान सरकारने भारतीय लष्कर, एनडीआरएफ सहित विविध यंत्रणा मदतीसाठी बोलावली आणि लोकांची हळूहळू का असेना सुटका होऊ लागली. जनावरांचे मात्र प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी आपली जनावरे सोडून यायला लोक तयार नव्हते. पण त्यांना कसेबसे तयार करून त्यांची सुटका करण्यात लष्करी जवानांना यश आले. हे जवान किती तास पाण्यात होते, लोकांना सोडवण्यासाठी छोट्या छोट्या बोटींतून त्यांनी किती फेऱ्या मारल्या असतील तेच जाणे. पण न कंटाळता, त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले. यासाठी अभिनंदनास आणि कौतुकास नक्कीच पात्र आहेत. दरम्यान राज्यांतील कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला. ज्याला जसे सुचेल तशी मदत जो तो करू लागला. पण त्यात सुसूत्रता येण्याची आवश्‍यकता होती. त्यानुसार अनेक ग्रुप्सनी नेमकी काय मदत द्यावी याची यादी केली आणि ती समाजमाध्यमांवर सादर केली. समाजमाध्यमांचा उपयोग नक्कीच मोठा म्हणायला हवा. मात्र त्याच वेळी या माध्यमांवर अनेक अफवा पसरत होता. परस्परांची बदनामी करण्यासाठीही हे माध्यम वापरले गेले. माध्यम चुकीचे नसते. आपण ते कसे वापरतो, यावर सगळे अवलंबून असते. 

अशा प्रतिकूल, कसोटीच्या प्रसंगांत लोकांनी दाखवलेले धैर्य, एकोपा, माणुसकी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. मात्र ही परिस्थिती निर्माणच कशी झाली, यावरही विचार व्हायला हवा. ‘सकाळ साप्ताहिक’च्या या अंकात ‘अक्षम्य बेपर्वाईची शिक्षा’ हा डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याची मानवनिर्मित कारणे सांगण्यात आली आहेत. त्यातून मार्ग कसा काढता येईल, हेही सुचविले आहे. 

हे अस्मानी संकट खरेच; पण खरेच इतकी भीषण परिस्थिती व्हावी इतके हे मोठे संकट होते, की माणसामुळे ही परिस्थिती ओढवली?  

सामान्यपणे पूररेषेत होणारी वाढ काही सेंमी इतकीच असते. त्यादृष्टीने पाहता यावर्षीचे संकट मोठेच होते यात शंका नाही. पण त्याची तीव्रता इतर अनेक मानवनिर्मित गोष्टींमुळे  वाढली हेही तितकेच खरे आहे. अतिवृष्टी हे या पुरामागचे मुख्य कारण असले तरी अनेक तज्ज्ञांच्या मते इतका मोठा प्रलय हा इतर अनेक घटनांचा परिपाक आहे . अतिवृष्टी, अतिशय चुकीचे व्यवस्थापन, अनियोजित व अनिर्बंध शहरीकरण, गाफील प्रशासन अशा अनेक गोष्टी या आपत्तीनंतर प्रकाशात आल्या आहेत. कोयना, राधानगरी आणि वारणा ही धरणे ५ ऑगस्टलाच जवळपास शंभर टक्के भरली होती. तरीही आणि मोठा पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने पुरेसा आधी देऊनही धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचे प्रयत्न वेळेत झाले नाहीत हेही एक कारण आहेच. 

तसेच पंचगंगा आणि कृष्णा कोयना नदीच्या खोऱ्यातील या आपत्तीच्या तीव्रतेत भर पडली त्यात नदीपर्यावरणात झालेला अनिर्बंध मानवी हस्तक्षेप महत्त्वाचा आहेच. अशा तऱ्हेच्या समस्यांचे खरे तर तेच मूळ कारण आहे. या प्रदेशांच्या उपग्रह प्रतिमांवरून असे लक्षात येते, की नद्यांच्या खोऱ्यातील मोठ्या प्रदेशावर माणसाचे अतिक्रमण झाले आहे. डोंगरउतारावर चुकीच्या ठिकाणी घरबांधणी, नदीखोऱ्याच्या वरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड या सर्व कारणांमुळे गाळाने भरून गेलेल्या नदीनाल्यांची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता हे पर्यावरणातील हस्तक्षेपाचे परिणाम इथेही आहेतच. 

अशा सर्व कारणांचा परिपाक म्हणजे निर्माण झालेली पूरस्थिती होय. या अनुभवांतून आपण काही शिकणार, की अशाच चुका करत राहणार हे येता काळच सांगेल. पण प्रत्येकाने या अनुभवातून शिकावे. क्षणिक फायद्यासाठी आपल्यालाच वेठीस धरू नये. कारण आज पूर कोल्हापूर, मिरज, सांगलीत आला; उद्या तुमच्या-आमच्या गावातही येऊ शकतो. वेळीच शहाणे झालेले चांगले.   

संबंधित बातम्या