...आता बसही चालविणार!

ऋता बावडेकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

संपादकीय
 

चहूबाजूंनी निराशाजनक बातम्या कानावर येत असताना वाऱ्याची हलकीशी झुळुक अंगावर यावी तशी एक बातमी आली.. आदिवासी महिला लवकरच एसटी बस चालवणार. यवतमाळ येथे त्यांचे याविषयीचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्यांना ‘लर्निंग लायसन्स’ही मिळाले आहे. महिनाभरात त्यांच्या हातात पक्के म्हणजेच पर्मनंट लायसन्सही असेल. त्यानंतर काही काळातच त्यांची लालपरी अर्थात लाल एसटी बस त्यांच्या सारथ्याखाली रस्त्यावर पळताना दिसेल. 

केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठीच ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ज्या मुली फारशा कधी घराबाहेर पडल्या नव्हत्या, समाजात मिसळल्या नव्हत्या, त्या आज अगदी आत्मविश्‍वासाने बोलत आहेत. वाहन चालविण्याचे आपले कौशल्य अजमावत आहेत... या मुलींचे कौतुक करावे तेवढे थोडेच! यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील या मुलींना परिवहन महामंडळात नियुक्ती देण्यात येणार आहे. महिलांना परिवहन महामंडळात वाहनचालक म्हणून समाविष्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील महिलांना एसटी चालक म्हणून संधी द्यावी, अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती लगेच मान्य केली आणि यवतमाळ येथे प्रशिक्षण सुरूही झाले. आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यातील किमान शंभर मुलींची भरती करण्याचे उद्दिष्ट होते. पण केवळ २५ मुलीच पुढे आल्या. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या स्थानिक पातळीवरील प्रशिक्षणास सुरुवात झाली. हलक्या आणि अवजड वाहनांचे त्यांचे परवाने काढण्यात आले. विविध तांत्रिक बाबी-अडचणी पार करत एक वर्षानंतर यापैकी २१ मुलींचे चालकपूर्व प्रशिक्षण सुरू झाले आहे. लवकरच त्या बस चालवण्यास तयार होतील. 

ज्या वातावरणातून या मुली आल्या आहेत, त्याचा विचार करता त्यांच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच ठरेल. अनुसूया मडवी म्हणते, ‘माजे काही स्वप्न नव्हते, काही ध्येय नव्हते. एक दिवस ‘तुला मोठेपणी काय व्हायचे होते?’ असा प्रश्‍न मला माझ्या मुलाने विचारला. माझ्याकडे उत्तरच नव्हते, किंबहुना मी असा विचारच कधी केला नव्हता. एवढेच नाही, मला रस्ता ओलांडायचीही भीती वाटायची... आणि आता मी बस चालवू शकणार आहे. मी खूप मन लावून प्रशिक्षणात भाग घेते आहे.’ 

अनुसूयाच काय या एकवीस मुलींपैकी एकही जण आतापर्यंत ड्रायव्हरच्या सीटवर बसलेली नाही.. आणि आज त्यांच्याकडे लर्निंग लायसन्स आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे थिअरीचे प्रशिक्षण सुरू आहे. या महिन्यापासून त्यांचे रस्त्यावरील प्रशिक्षण सुरू झाले आहे. उंचसखल भाग, घाटरस्ते, जंगलातील काही भाग.. असे साधारण ७५० किलोमीटर अंतर या कालावधीत त्या कापणार आहेत. महिनाभरात त्या पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकतील. सहा महिन्यांपूर्वी हे प्रशिक्षण सुरू झाले तेव्हा पूजा तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला बरोबर घेऊन यायची. ‘मला दोन मुले आहेत. त्यामुळे हे काम करू शकीन असा मला विश्‍वासच नव्हता. पण माझ्या नवऱ्याने मला धीर दिला. मला आधार दिला. मी जेव्हा ही भलीमोठी बस चालवीन, तो क्षण माझ्या कुटुंबीयांसाठी खूप आनंदाचा क्षण असेल,’ पूजाने सांगितले. 

मात्र, प्रत्येक मुलगीच इतकी भाग्यवान नव्हती. काहींना गरातून विरोध झाला. ज्योत्स्नाला तिच्या आईवडिलांची खूप समजूत काढावी लागली. वास्तविक ज्योत्स्ना राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अशा दोन विषयांत पदवीधारक आहे. पण तिला हे काम खूप आवडले, पण आईवडिलांची तयारी नव्हती. तिने त्यांची समजूत काढली. एवढेच नव्हे हे काम करू देण्यास तयार नसलेली दोन स्थळे तिने आतापर्यंत नाकारली आहेत. शीतलच्या आईचाही विरोधच होता. तिच्या सासरची मंडळीही अनुकूल नव्हती. पण तिने सगळ्यांची समजूत काढली. ती म्हणते, ‘बायका घर चालवू शकतात, तर हे काम का नाही करू शकते? इतकेही ते अवघड नाही..’ 

या मुलींइतकीच बोलकी, पण मजेशीर प्रतिक्रिया त्यांचे प्रशिक्षक राजेंद्र मडवी यांची आहे. तब्बल तीस वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पण त्यांनी अद्याप एकाही महिलेला ट्रेनिंग दिलेले नव्हते. ‘या मुली खूप मन लावून शिकत आहेत, मी खूप समाधानी आहे. मी आतापर्यंत केवळ पुरुषांनाच प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे या मुलींना शिकवताना भाषेवर ताबा ठेवायला हवा, हे मी स्वतःलाच सतत समजावत होतो,’ ते गमतीने म्हणतात. 

काही दिवसांनंतर या मुली मोठ्या आत्मविश्‍वासाने एसटी बस चालवताना आपल्याला दिसतील. महिलांना काय किंवा कोणालाच कधीच कमी लेखू नये. समाजाने थोडा धीर दिला, आधार दिला, की कुठल्याही यशाला त्या गवसणी घालू शकतात. रस्ताही ओलांडायला घाबरणारी मुलगी आज आत्मविश्‍वासाने बस चालवण्याच्या गोष्टी करते. दोन दोन पदव्या असतानाही बसचालक होण्याचे स्वप्न दुसरी मुलगी बघते.. कधीकाळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात येण्याचीच ही सुरुवात नव्हे का? 

महिलांच्या नशिबी सतत छळ, अत्याचारच का यावेत? बौद्धिक क्षमतेत, कष्टात त्या कुठेही कमी नसतात. सुदैवाने आज शिकणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या मुलींची संख्या वाढते आहे. पण अजूनही खूप मोठी संख्या अशी आहे, ज्यांना काही करायचे आहे.. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, घरासाठी... त्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नाउमेद न करता, त्यांना घरातच डांबून न ठेवता, त्यांचे गुण ओळखायला हवेत, त्या गुणांना वाव द्यायला हवा. त्यांच्या घरचे करतील म्हणून जबाबदारी न झटकता, समाज म्हणून आपणही आपला वाटा उचलायलाच हवा...   

संबंधित बातम्या