टॅलेंट ‘रिअल’ किती? 

ऋता बावडेकर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

संपादकीय
 

सध्या टीव्हीवर रिॲलिटी शोजचे अक्षरशः पेव फुटलेले दिसते. नवीन टॅलेंट शोधण्याच्या नावाखाली तिथे जे जे घडताना आपण बघतो, ते पाहून हे टॅलेंट ‘रिअल’ किती आणि त्याचा ‘शो’ किती असा प्रश्‍न नक्कीच पडतो. ‘या कार्यक्रमांत गायकांचे अक्षरशः शोषण केले जाते. त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या निष्पापपणाचा या कार्यक्रमांत गैरफायदा घेतला जातो,’ असे परखड मत प्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांनी नुकतेच ट्विटरवर व्यक्त केले आणि या मताचे हजारो जण व्यक्त होऊ लागले. रेखा भारद्वाज यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमांबद्दल हे मत प्रामुख्याने व्यक्त केले असले, तरी ते अशा पद्धतीच्या कोणत्याही कार्यक्रमाला लागू होते. 

असे रिॲलिटी शोज खूप असतात. कधी ते नृत्यासंबंधी असतात, तर कधी गायनासंबंधी. सहसा एकावेळी एकाच पद्धतीचे शोज सगळीकडे दिसतात. पण सध्या नृत्य आणि गायन असे संमिश्र चित्र विविध वाहिन्यांवर दिसते. त्यात नावीन्य काहीच दिसत नाही. डान्स शोमध्ये स्पर्धक करत असलेल्या कसरती, अंगाला झटके देऊन केलेल्या हिडीस हालचाली पाहून याला डान्स - नृत्य का म्हणायचे कळत नाही. जी अभिनयापेक्षा तिच्या डान्सेससाठीच अधिक ओळखली जाते, ती माधुरी दीक्षित जेव्हा अशा नृत्याचे तोंड दुखेस्तोवर कौतुक करते तेव्हा कुठे बघावे कळतच नाही. तिच्या किंवा समोर बसलेल्या कोणत्याही ‘जज’पेक्षा आपल्याला जास्त कळत नाही, असे गृहीत धरले तरी समोर जे चालले आहे ते चांगले की वाईट एवढे तर आपल्याला नक्कीच कळते. त्यातील बारकावे न का कळेना... आणि जे वाईटच आहे, त्यात बारकावे काय असणार? पण हे सगळे जजेस ते बारकावे मोठ्या हिरिरीने सांगत असतात. स्पर्धक आणि असेल तर त्यांचा ‘गुरू’ अगदी नम्रपणे त्यांचे आभार मानत असतात. हे पाहून हे कार्यक्रम आपल्यासाठी नाहीतच असे समजून टीव्ही बंद करण्याकडे किंवा दुसरी वाहिनी लावण्याकडे कल वाढतो. तिथे तरी काय, हे अशाच प्रकारचे काहीतरी सुरू असते. 

सध्या तरी फॉरमॅटच ठरून गेलेला दिसतो आहे. अशा कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद बघून तसेच कार्यक्रम सगळीकडे दिसणार हे स्वाभाविक आहे. पण त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. लहान मुलांच्या अशा कार्यक्रमांना लोक उचलून धरतात, हे लक्षात आल्यावर तशाप्रकारच्या कार्यक्रमांचे प्रमाण वाढले. त्यात अगदी ४-५ वर्षांची मुलेही सहभाग घेताना आणि स्पर्धा जिंकताना दिसतात. 

लहान मुलांच्या स्पर्धांत त्यांचा हुरूप वाढावा, त्यांना उत्साह मिळावा म्हणून थोडे जास्त कौतुक केले तर ठीक; पण अनेकदा ‘ओरिजिनलसे भी अच्छा गाया।’ ‘बेटा, असा सूर भल्याभल्यांना लावता येत नाही’ ‘भगवानकी बहोत बडी कृपा आपपे है।’... वगैरे वगैरे; अशी कौतुकं केली जातात. भल्याभल्यांना कौतुक पेलता येत नाही, ही तर मुलेच असतात. पुढच्या वेळी ते आणखी जीव तोडून गाऊ लागतात किंवा डान्स करू लागतात. पुन्हा तीच कौतुकं, तीच तारीफ! यामुळे आपण या मुलांच्या भावविश्‍वाशी खेळत आहोत हे कोणी लक्षातच घेत नाही. ना हे जजेस, ना निर्माते, ना चॅनेलवाले, ना या मुलांचे पालक! थोड्याशा कौतुकाने तेही बेभान होतात. कौतुकाच्या शिट्या मारायला लागतात. 

या रिॲलिटी शोजनी खरे टॅलेंट किती शोधले, हा संशोधनाचा भाग आहे; पण स्पर्धकांच्या, प्रेक्षकांच्या भावनांशी खेळायला नक्कीच शिकवले. येथे येणारा स्पर्धक त्याच्या नृत्य किंवा गायनकलेऐवजी वेगळ्याच गोष्टींसाठी फेमस होताना दिसतो. विचित्र, विनोदी बोलणे वगैरे त्यातला एक बाग. सध्या एका वाहिनीवर सुरू असलेला लहानसा स्पर्धक त्याचा गुरू असलेल्यालाच आव्हान देताना दिसत होता. त्याचे कौतुकही होत होते. त्यामुळे तो अधिक चेव आल्यासारखे करत होता. सुदैवाने लवकरच हा प्रकार थांबला. गंमत म्हणजे, राहत फतेह अली खान यांचे चाहते असलेले हे दोघेही त्यांच्यासारखा गाण्याचा प्रयत्न करताना उगाचंच किंचाळताना दिसतात. पण त्यातला ‘गुरू’ विजेता आहे. काय बोलणार? 

दुसरा प्रकार म्हणजे, या स्पर्धकांची गरीबी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते कसे प्रयत्न करतात वगैरे. वास्तविक यात चुकीचे काहीच नाही. पण त्याचाही अतिरेक होताना दिसतो आहे. आपली आई कशी धुणीभांडी करते, वडील कसे रिक्षा चालवतात, मी मोठा/मोठी होऊन घर कसे चालवणार वगैरे स्टोऱ्या येऊ लागतात. त्यातही गैर काही नाही. पण तुम्ही तुमचे टॅलेंट दाखवायला आलात ना, मग हे काय? अशावेळी सुस्थितीतील मुले उगाचंच ‘गरीब’ वाटू लागतात. But it sales. जे विकले जाते, त्यालाच महत्त्व मिळणार, हे साधे सूत्र इथे दिसते. 

वास्तविक, ‘सारेगमप’ (हिंदी, मराठी), ‘इंडियन आयडॉल’ असे दर्जेदार कार्यक्रम आपणच या वाहिन्यांवर बघितले आहेत. पुढे वाहिन्या वाढल्या. या कार्यक्रमांच्या लोकप्रियतेमुळे अनेक ठिकाणी असे 
कार्यक्रम होऊ लागले. स्पर्धा वाढली, बाजाराचे लक्ष गेले आणि ते अधिक वेधण्यासाठी सध्या सुरू असलेले प्रकार वाढू लागले. एखादा स्पर्धक सामान्य असला, तरी त्याची लोकप्रियता बघून त्याचा कार्यक्रमातील ‘मुक्काम’ वाढू लागला. कार्यक्रमाच्या विश्‍वासार्हतेला इथेच छेद गेला. कार्यक्रमाशी संबंधित लोकांचे व प्रेक्षकांचे अंदाज व्यस्त येऊ लागले. प्रेक्षकांना परत मिळवण्यासाठी त्यांच्या भावनेलाच मग हात घातला जाऊ लागला. या सगळ्यात बालस्पर्धकांचे बालपण, निष्पापपणच आपण ओरबाडतो आहोत, हे कोणाच्याच ध्यानी आले नाही. त्यांनी ते येऊ दिले नाही. पण असे किती दिवस चालणार? आज रेखा भारद्वाज यांना पडलेला प्रश्‍न सगळीकडून विचारला जाऊ शकेल. म्हणजे विचारला जावा, तरच परत एकदा गुणवत्तेला महत्त्व येईल. 

संबंधित बातम्या